पंतप्रधान कार्यालय

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे राज्यसभेत स्वागत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 07 DEC 2022 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 डिसेंबर 2022

 

आदरणीय सभापती महोदय,

आदरणीय सर्व सन्माननीय वरिष्ठ  संसद सदस्य,

मी सर्वात आधी संपूर्ण सभागृहातर्फे आणि संपूर्ण देशाच्या वतीनं आपले खूप खूप अभिनंदन करतो. आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून येत, संघर्ष करत, आपल्या जीवनाचा प्रवास पुढे नेत आज ज्या स्थानी पोहोचले आहात, हा आपला प्रवास, देशातील अनेकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.  या वरिष्ठ सभागृहात, या प्रतिष्ठित स्थानी आसनस्थ होऊन आपण हे स्थान सुशोभित केले आहे आणि मी तर असेही म्हणेन की किठाणाच्या सुपुत्राची गौरवास्पद कामगिरी देश बघतो आहे, ती  देशासाठी अत्यंत आनंददायी आहे.

आदरणीय सभापती महोदय,

हा एक सुखद योगायोग आहे, की आज सशस्त्र सैन्यदल ध्वज दिनही आहे.

आदरणीय सभापति महोदय,

झुंझुनू ही आपली मायभूमी आहे. झुंझुनू ही वीरांची भूमी आहे. ह्या गावातील क्वचितच असे कोणते कुटुंब असेल, ज्याने देशसेवेत अग्रगण्य भूमिका पार पाडली नसेल. आणि हे तर सोन्याहून पिवळे आहे, की आपण स्वतःही, सैनिकी शाळेचे विद्यार्थी होतात. म्हणजे आपण शेतकरी पुत्र आहात आणि सैनिकी शाळेचे विद्यार्थी अशा दोन्ही रूपात आपणाला मी बघतो आहे. आपल्यामध्ये किसान आणि जवान अशी दोन्ही व्यक्तिमत्वे आपल्यात सामावलेली आहेत.

मी आपल्या अध्यक्षतेखालील या सभागृहातून, सर्व देशबांधवांना सशस्त्र सैन्यदल ध्वज दिनाच्याही शुभेच्छा देतो. मी या सभागृहाच्या सर्व आदरणीय सदस्यांच्या वतीने, देशाच्या सैन्यदलांना सलाम करतो.

सभापती महोदय,

आज संसदेचे हे वरिष्ठ सभागृह अशा वेळी आपले स्वागत करत आहे, जेव्हा संपूर्ण देश दोन महत्वाच्या प्रसंगाचा साक्षीदार ठरतो आहे.आता काही दिवसांपूर्वीच, जगाने, भारताकडे जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचसोबत, आता आपल्या देशाचा अमृतकाळही सुरु झाला आहे. हा अमृतकाळ नव्या विकसित भारताच्या उभारणीचा कालखंड तर असेलच, त्याशिवाय, भारत या काळात, जगाच्या भविष्याची दिशा निश्चित करण्यात एक महत्वाची भूमिकाही पार पडणार आहे.

आदरणीय सभापती महोदय,

भारताच्या या प्रवासात,आपली लोकशाही, आपली संसद, आपली संसदीय व्यवस्था या सगळ्यांची आणखी महत्वाची भूमिका ठरणार आहे. मला अतिशय आनंद आहे, की या महत्वाच्या कालखंडात, उच्च सभागृहाला आपल्यासारखे सक्षम आणि प्रभावी नेतृत्व मिळाले आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य, आपाआपल्या कर्तव्याचे प्रभावी पालन करतील . देशाच्या संकल्पांची पूर्तता करण्याचे एक प्रभावी व्यासपीठ ठरेल.

आदरणीय सभापती महोदय,

आज आपण संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाचे प्रमुख म्हणून आपल्या नव्या  जबाबदारीचा  औपचारिक प्रारंभ करत आहात. या उच्च सभागृहाच्या खांद्यावर जी जबाबदारी आहे, त्याचाही सर्वात जवळचा संबंध, समाजातील, सर्वात खालच्या पायरीवर उभे असलेल्या सर्वसामान्य मानवाच्या हिताशी जोडलेला आहे. या कालखंडात, देश आपली जबाबदारी लक्षात घेऊन, त्याचे पूर्ण जबाबदारीने पालन करत आहे.

आज पहिल्यांदाच महामाहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने, देशाच्या  गौरवास्पद आदिवासी परंपरेचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे याआधीही श्री रामनाथ कोविंद यांच्यासारख्या वंचित समाजाचे प्रतिनिधी, देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले होते आणि आता एका शेतकरी पुत्राच्या रूपाने आपणही कोट्यवधी देशबांधव, गावातील गरीब जनता आणि शेतकऱ्यांच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करत आहात.

आदरणीय सभापती महोदय,

आपले आयुष्य या गोष्टीचे प्रमाण आहे की सिद्धी केवळ साधनांनी नाही, तर साधनेतून मिळते.आपण तो ही काळ पाहिला आहे, जेव्हा आपण किती तरी किलोमीटर पायी प्रवास करत शाळेत जात होतात. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी आपण जी कामे केली आहेत, ती सामाजिक जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक उदाहरण आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्याकडे एक वरिष्ठ वकील म्हणून तीन दशकांचा अनुभव आहे. मी अगदी विश्वासाने आपल्याला सांगू शकतो की या सभागृहात आपल्याला कोर्टाची उणीव जाणवणार नाही, कारण राज्यसभेत, खूप मोठ्या प्रमाणात ते लोक आहेत,जे आपल्याला सर्वोच्च न्यायालयात भेटत असत. आणि इथला मूड आपल्याला न्यायालयाची आठवण करुन देत राहील.

आपण आमदारापासून खासदारापर्यंत आणि केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशा अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. या सर्व  भूमिकांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे, देशाचा विकास आणि लोकशाही मूल्यांप्रती आपली निष्ठा. आपले अनुभव देश आणि लोकशाहीसाठी निश्चितच महत्वाचे आहेत.

आदरणीय सभापती महोदय,  

आपण राजकारणात राहूनही, पक्षीय मर्यादांच्या पलीकडे जात, सर्वांना एकत्र जोडण्याचे काम कायम केले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या  निवडणुकीतही, आपल्याला सर्वांप्रती वाटणारी आत्मीयता आम्ही स्पष्टपणे पहिली आहे. या निवडणुकीत, आपण 75 टक्के मते मिळवलीत, ही देखील एक महत्वाची बाब आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्याकडे असे म्हटले जाते- नयति इति नायक:

म्हणजेच, जो आपल्याला पुढे घेऊन जाईल, तोच नायक आहे. पुढे घेऊन जाणे हीच खरेतर नेतृत्वाची एक खरी व्याख्या आहे. राज्यसभेच्या बाबतीत तर ही बाब अधिकच महत्वाची ठरते. कारण, या सभागृहावर लोकशाही निर्णयांना अधिकाधिक सुधारित स्वरुप देत, पुढे नेण्याची जबाबदारी आहे. यामुळेच, जेव्हा आपल्यासारखा नेता या सभागृहाला मिळणे, ही सभागृहासाठी सौभाग्याची गोष्ट आहे.

आदरणीय सभापती महोदय,

राज्‍यसभा देशाच्या महान लोकशाही परंपरेची वाहक आहे, आणि त्याचे बलस्थान देखील आहे. आपले अनेक पंतप्रधान असे होते, ज्यांनी कधी ना कधी राज्यसभा सदस्य म्हणून काम केले होते. अनेक उत्कृष्ट नेत्यांचा संसदीय प्रवासही राज्यसभेपासूनच सुरु झाला. म्हणूनच, या सभागृहाची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी, आणि वाढवण्यासाठी, एक भक्कम अशी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे.

आदरणीय सभापती महोदय,

मला पूर्ण विश्वास आहे, की आपल्या मार्गदर्शनाखाली, हे सभागृह, आपली परंपरा आणि प्रतिष्ठा अधिकच उज्ज्वल करेल, तिला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. सभागृहातील गंभीर चर्चा, लोकशाहीतील विचार विनिमय, लोकशाहीच्या जननीच्या रूपाने, आपल्या देशाचा गौरव अधिक वृद्धिंगत करेल.

आदरणीय सभापती महोदय,

गेल्या अधिवेशनापर्यंत, आपले माजी उपराष्ट्रपतीजी आणि माजी सभापतीजी, जेव्हा या सभागृहाला मार्गदर्शन करत, तेव्हा, त्यांची शब्दरचना, त्यांची विनोदबुद्धी, यामुळे सभागृहातील वातावरण नेहमी प्रसन्न राहत असे. इथे आनंदाने हसण्याचे अनेक प्रसंग येत. मला विश्वास आहे, की तुमचाही हजरजबाबी स्वभाव, आपल्याला आधीच्या सभापतींची उणीव भासू देणार नाही, आणि आपणही सभागृहाला तेच अनुभव देत राहाल.

याचसोबत, मी संपूर्ण सभागृहाच्या वतीने, देशाच्या वतीने, माझ्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. 

धन्‍यवाद!


* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881623) Visitor Counter : 214