शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं ‘परीक्षा पे चर्चा 2023’ मध्ये व्यापक सहभाग नोंदवण्याचं आवाहन

Posted On: 06 DEC 2022 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्यविकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना ‘परीक्षा पे चर्चा 2023’ च्या सहाव्या सत्रात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी घेण्यासाठी निमंत्रित केलं आहे.

परस्परसुसंवाद साधणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे  देशविदेशातले  विद्यार्थी, पालक, शिक्षक पंतप्रधानांबरोबर संवाद साधून परीक्षांमुळे निर्माण होणाऱ्या ताण तणावाबाबत चर्चा करत त्यावर मात करूनआयुष्य हे उत्सव म्हणून साजरा करण्याची अनोखी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून गेली पाच वर्ष यशस्वीरित्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे.

इयत्ता नववी ते बारावी मधले शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड एका ऑनलाइन सर्जनशील लेखी स्पर्धेच्या मार्फत केली जाते. https://innovateindia.mygov.in/ppc-2023/

या पोर्टलवर याची प्रत्यक्ष नोंदणी 25 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली असून ती 30 डिसेंबर 2022 पर्यंत चालणार आहे. यात पुढील प्रमाणे अनेक भरघोस संकल्पना आहेत:-

I. विद्यार्थ्यांसाठी संकल्पना

1.    आपल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल जाणून घ्या

तुम्ही तुमच्या राज्यातल्या किंवा प्रदेशातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनगाथांबद्दल काय ऐकलं आहे? त्यांच्या आयुष्यातून तुम्ही काय प्रेरणा घेतली आहेतुम्हाला तुमच्या देशाची सेवा कशाप्रकारे करायची आहे?

2.आपली संस्कृती हा आपला अभिमान आहे               

 तुमच्या राज्याच्या संस्कृतीमध्ये काय विशेष आहे? या संस्कृतीमधील कोणत्या घटकांमुळे तुम्हाला तुमच्या देशाचा अभिमान वाटतो?

3.माझे पुस्तक माझी प्रेरणा

असं कोणतं पुस्तक आहे ज्याने तुमच्या जीवनाला आकार दिला आहे आणि का  ?

4.पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचं रक्षण                

शाश्वत विकासाबद्दल तुमच्या कल्पना काय आहेत? पर्यावरणीय बदलांबाबत पुढील पिढ्यांसाठी तुमच्यासमोर काय आव्हानं आणि काय अपेक्षा आहेत ? आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण काय उपाय योजले पाहिजेत ? एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शाश्वत विकासात काही योगदान देऊ शकता ?

5. माझं जीवन, माझं आरोग्य

आपलं उर्वरित निरोगी जीवन का महत्त्वाचं आहे ? तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय करता ?

6.माझं स्टार्टअप स्वप्न

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि स्वावलंबनासाठी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यायोग्य कार्यसंस्कृती राबवणे ही काळाची गरज आहे. तुमच्या स्वतःच्या स्टार्टअप बद्दल तुमची काय स्वप्न

आहेत ?

7.स्टेम शिक्षण / बंधनमुक्त शिक्षण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विद्यार्थ्यांसाठी विषय निवडीबाबत लवचिकतेची शिफारस केलीआहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य असेल, स्वतःचे मार्ग निवडणे आणि स्वतःच्या आवडीच्या व्यवसायाची कास धरणे याचा त्यात अंतर्भाव आहे. विज्ञान आणि गणिताशिवायही आयुष्य आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं ? अशा प्रकारच्या परिवर्तनशील शिफारसीबाबत मध्ये तुम्हाला काय आव्हानं दिसतात ? याबाबत तुमच्या काय सूचना आहेत?

8. शाळांमध्ये शिकण्यासाठी खेळणी आणि खेळ

खेळणी आणि खेळ हे देखील शिकण्याचे स्त्रोत, साधने असू शकतात. माध्यमिक स्तरावर खेळणी आणि खेळांद्वारे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल तुमचे मत लिहा.

II. शिक्षकांसाठी संकल्पना

1. आपला वारसा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक ‘भारतीय’ ज्ञान शिकवण्याचे सार काय आहे? तुम्ही शाळेत असलेल्या विषयांना एकत्रित करून तुम्ही हे शिकवण्याची योजना कशी आखाल?

2. शैक्षणिक वातावरण सक्षम करणे

चांगल्या शिक्षणासाठी आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी वर्गातील वातावरण निकोप आणि अनुकूल ठेवण्यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असावी? सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांना शिक्षणाची ग्वाही देण्यासाठी तुम्ही कृती रचना कशी कराल? 'पीअर लर्निंग'म्हणजे विद्यार्थ्यांचे सहअध्ययन याबद्दल तुमचे विचार आणि मत काय आहे?

3. कौशल्यासाठी शिक्षण

कौशल्य शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशात कौशल्य शिक्षण देण्यासाठी संपूर्ण शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक असले तरी माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. कारण अनेक विद्यार्थी शैक्षणिक/उच्च शिक्षण घेण्यास प्राधान्य देत नाहीत, उलट त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी विविध मार्ग शोधायचे आहेत. यावर तुमचे काय विचार आहेत?

4. अभ्यासक्रमाचा भार कमी करणे आणि परीक्षेची भीती नसणे

विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण आणि प्रकल्प-आधारित अभ्यासक्रमाद्वारे शिकावे; ते काय शिकतात आणि ते कसे शिकतात यावर आत्मविश्वास असणे, यामुळे परीक्षेचा दबाव आपोआप कमी होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनइपी) 2020 चा हा दृष्टीकोन अंमलात आणण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही काय पुढाकार घ्याल.

5. भविष्यातील शैक्षणिक आव्हाने

तुमच्या मते सध्याची शैक्षणिक आव्हाने काय आहेत? शैक्षणिक अपेक्षांमधील बदलांना तोंड देण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालकांनी मुलांसाठी कशी सोय करावी?

III. पालकांसाठी संकल्पना

1. माझे मूल, माझे शिक्षक

तुमच्या मुलाने तुम्हाला कोणती मनोरंजक गोष्ट शिकवली आहे? तुम्ही ती गोष्ट कशी शिकलात आणि त्याच्याशी जुळवून घेतले? आपल्या मुलांच्या आवडींशी जुळवून घेणे महत्त्वाचे का आहे.

2. प्रौढ शिक्षण- प्रत्येकाला साक्षर बनवणे

तुमच्या मते प्रौढ शिक्षणाचे महत्त्व काय आहे? त्यातून सशक्त राष्ट्र कसे निर्माण होऊ शकते? प्रौढांना आधुनिक समस्या समजाव्यात यासाठी मुले कशी योगदान देऊ शकतात?

3. एकत्र शिकणे आणि वाढणे

शाळेत शिकत असलेल्या तुमच्या मुलाचे तुम्ही घरी कौतुक कसे कराल? तुमच्या मुलाच्या निकोप शिक्षण प्रक्रियेत पालक म्हणून तुमची भूमिका काय आहे यावर एक सर्जनशील टीप लिहा.

MyGov वरील स्पर्धांद्वारे निवडलेल्या सुमारे 2050 विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना परीक्षा पे चर्चा (पीपीसी) किट्स आणि राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीइआरटी) संचालकांकडून प्रमाणपत्र मिळू शकतात.

 

 

 

 

R.Aghor/Sandesh/Prajna/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1881188)