आयुष मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2022 रोजी तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे लोकार्पण करणार
तीन संस्थांचा शुभारंभ म्हणजे पारंपरिक वैद्यक शास्त्रामधील पायाभूत सुविधांचा विस्तार आणि संशोधनाला चालना देण्याच्या दिशेने पुढले पाऊल असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन
Posted On:
06 DEC 2022 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए), गोवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (एनआययुएम), गाझियाबाद आणि राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था (एनआयएच), दिल्ली या तीन राष्ट्रीय संस्थांचे लोकार्पण होणार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज घोषित केले. या दूरस्थ संस्था संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला बळकटी देतील आणि मोठ्या जनसमुदायाला आयुष अंतर्गतच्या परवडण्याजोग्या वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध करतील.
प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सर्बानंद सोनोवाल यांनी 9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस (डब्ल्यूएसी) ची माहिती दिली, गोव्यामध्ये पणजी इथं होणार्या या परिषदेच्या माध्यमातून, आयुष वैद्यकीय प्रणालीची वैज्ञानिकता, परिणामकारकता आणि सामर्थ्य जागतिक स्तरावर प्रदर्शित केले जाईल. आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांच्यासह आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आयुष मंत्रालयाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. 11 डिसेंबर रोजी गोव्यामध्ये होणार्या डब्ल्यूएसीच्या समापन समारंभाला पंतप्रधान देखील उपस्थित राहणार आहेत.
या संस्थांची स्थापना, पंतप्रधानांच्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालीमधील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा विस्तार आणि संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले. या संथांच्या माध्यमातून देशाचा प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक प्रदेशात परवडण्याजोग्या आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची भारत सरकारची क्षमता आणखी मजबूत होईल.
आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी उपचार पद्धतींच्या या तीन राष्ट्रीय आयुष संस्थांच्या स्थापनेमुळे पदवी पूर्व (युजी), पदव्युत्तर (पीजी) आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या 400 विद्यार्थ्यांसाठी 400 अतिरिक्त जागा निर्माण होतील आणि या तिन्ही शाखांसाठी 550 अतिरिक्त खाटाही उपलब्ध होतील.
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) आयुर्वेद चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून शिक्षण, संशोधन आणि रुग्ण सेवा या पैलूंबाबत युजी, पीजी आणि पोस्ट-डॉक्टरेट शाखेसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करेल. ही संस्था, परवडणाऱ्या वैद्यकीय पर्यटनाला (एमव्हीटी) ला प्रोत्साहन देणारे आयुर्वेदाचे वेलनेस हब (उपचार केंद्र) म्हणून विकसित केले जाईल आणि शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सहकार्यासाठी आदर्श केंद्र म्हणून काम करेल
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी (एनआयएच), दिल्ली ही होमिओपॅथिक औषध प्रणाली विकसित करण्यासाठी आणि आरोग्य सेवा सुविधा पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली उत्तर भारतामधील पहिलीच संस्था आहे. ही संस्था आयुष आरोग्य सेवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि आधुनिक औषधांबरोबर जोडण्याचे काम करेल, संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेष याला प्रोत्साहन देईल आणि एक प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्था म्हणून विकसित होईल.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (एनआययुएम) हे बंगळूरू येथील सध्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन, या संस्थेचे दूरस्थ केंद्र असेल. उत्तर भारतामधील ही अशा प्रकारची पहिलीच संस्था असेल आणि दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि भारतातील अन्य राज्यांसह एमव्हीटी अंतर्गत परदेशी रुग्णांनाही इथून उपचार सेवा घेता येतील.
आयुष मंत्रालय गोव्यामध्ये पणजी इथे 9 वी जागतिक आयुर्वेद परिषद (डब्ल्यूएसी) आयोजित करत असून, त्या माध्यमातून आयुष वैद्यकीय प्रणालीची वैज्ञानिकता, परिणामकारकता आणि सामर्थ्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करेल. यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार असून आयुष संबंधी विविध चर्चासत्रे आणि सादरीकरणही होणार आहे.
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881151)
Visitor Counter : 319