पंतप्रधान कार्यालय

भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक


जी 20 अध्यक्षपद संपूर्ण राष्ट्राचे आहे!

जी 20 अध्यक्षपद ही जगाला भारताची ओळख करून देण्याची संधी

भारताबद्दल जागतिक स्तरावर कुतूहल आणि आकर्षण आहे.

जी 20 अध्यक्षतेमुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची संधी प्राप्त

Posted On: 05 DEC 2022 10:44PM by PIB Mumbai

भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्याच्या दृष्टीने 5 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संपूर्ण देशभरातील राजकीय नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

भारताचे जी 20 अध्यक्षपद संपूर्ण राष्ट्राचे आहे आणि भारताची बलस्थाने संपूर्ण जगाला दाखवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. सध्या भारताबद्दल जागतिक स्तरावर  कुतूहल आणि आकर्षण वाटत  असल्याने भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा वाव आणखी विस्तारत असल्याचे  त्यांनी सांगितले.

 सांघिक प्रयत्नांचे महत्त्व  विषद करून पंतप्रधानांनी जी 20 परिषदेनिमित्त देशात विविध ठिकाणी होणाऱ्या सर्व बैठका आणि कार्यक्रमांचे नियोजन करण्यात सर्व नेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. जी 20 अध्यक्षतेमुळे देशातील मोठ्या शहरांच्या पलीकडील भारत जगाला दाखवण्याची संधी मिळाली असून त्यायोगे देशाच्या सर्व भागांमधील वैशिष्ठ्ये  जगासमोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात परदेशातील  असंख्य निमंत्रित भारतात येणार असून  जी 20 बैठका आयोजित केल्या जातील त्या  ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी जे. पी. नड्डा, मल्लिकार्जुन खर्गे,  ममता बॅनर्जी, नवीन पटनायक,  अरविंद केजरीवाल,  वाय. एस. जगन मोहन रेड्डी, सीताराम येचुरी,  चंद्राबाबू नायडू,  एम. के. स्टॅलिन,  एडप्पाडी के. पलानीस्वामी,  पशुपतीनाथ पारस,  एकनाथ शिंदे आणि के.एम. कादर मोहिदीन  अशा विविध राजकीय नेत्यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षपदाविषयीचे  त्यांचे विचार व्यक्त केले.

 या बैठकीत गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी संक्षिप्त स्वरूपात  माहिती दिली. भारताच्या G20 प्राधान्यक्रमांच्या पैलूंचा समावेश असलेले  तपशीलवार सादरीकरण करण्यात आले.

 या बैठकीला केंद्रीय मंत्री  राजनाथ सिंह,  अमित शाह,  निर्मला सीतारामन, डॉ. एस. जयशंकर,  पीयूष गोयल,  प्रल्हाद जोशी,  भूपेंद्र यादव आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा उपस्थित होते.

 

***

Sonali K/B.Sontakke/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881088) Visitor Counter : 164