अंतराळ विभाग
भारत हा अंतराळ क्षेत्रातील प्रमुख जागतिक प्रबळ देश असून संयुक्त अरब अमिरातीसोबतचे अंतराळ सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत उत्सुक - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
05 DEC 2022 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2022
- "अबू धाबी स्पेस डिबेट" साठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेले डॉ जितेंद्र सिंह यांनी उद्घाटन समारंभात इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्यासह आपले विचार मांडले.
- भारतीय अंतराळ उद्योग आज जगभरात विश्वासार्हता आणि किफायतशीर या दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे -केंद्रीय मंत्री
- परदेशी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांना प्रवेश मिळावा यासाठी भारत अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या विकासालाही प्रोत्साहन देत आहे: डॉ जितेंद्र सिंह
अंतराळ क्षेत्रात भारत एक प्रमुख जागतिक प्रबळ देश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत संयुक्त अरब अमिरातीसोबतचे (युएई ) अंतराळ सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केला.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित "अबू धाबी स्पेस डिबेट", या शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह बोलत होते. या समारंभाला उपस्थित संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याकडे डॉ जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आणि संयुक्त अरब अमिरातीतील लोकांना दिलेल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित “अबू धाबी स्पेस डिबेट” या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ जितेंद्र सिंह हे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासह इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि अनेक देशांचे राजदूत उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती या उभय देशांच्या नेत्यांसाठी अंतराळ क्षेत्राचा विकास हे एक प्राधान्य क्षेत्र आहे . सात दशकांपूर्वी भारताने आपल्या अंतराळ क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती आणि भारत आज एक अंतराळ क्षेत्रातील अग्रगण्य प्रबळ देश म्हणून ओळखला जातो, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
भारताचे स्वदेशी विकसित अंतराळ क्षेत्र आणि संयुक्त अरब अमिरातीमधील वेगाने विकसित होणारे अंतराळ क्षेत्र हे परस्परांना बऱ्याच अंशी पूरक असून हे उपयुक्त ठरू शकते , असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. अंतराळ क्षेत्र हे आपल्या मानवतेची सामायिक सेवा करण्यासाठी असून अंतराळ क्षेत्रासंदर्भात चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी सर्व हितसंबंधितांना एकत्र आणणे महत्त्वाचे आहे आणि या संदर्भात, या व्यासपीठाच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्राचे भविष्य घडविण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.
विश्वासार्हता आणि किफायतशीर या दोन गोष्टींसाठी भारतीय अंतराळ उद्योग आज जगभर प्रसिद्ध आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक किंवा पीएसएलव्ही या पथदर्शी अंतराळ प्रक्षेपण प्रक्षेपकाच्या बाबतीत जगात अधिकाधिक यश मिळवल्याचा भारताला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
अंतराळ क्षेत्रातील भारताच्या उद्योगांच्या यशोगाथेची यादी बरीच मोठी आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आतापर्यंत 100 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि या संस्थेमध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि अंतराळ आधारित दिशादर्शक स्वदेशी प्रणाली निर्मितीची क्षमता आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. भारतीय प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह यंत्रणा किंवा आयआरएनएसएस ही स्वतःची जीपीएस यंत्रणा देखील भारताने विकसित केली आहे , असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
भारताच्या अन्य पथदर्शी अंतराळ कार्यक्रमांमध्ये ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर किंवा ज्याला आम्ही भारतात गगनयान प्रकल्प म्हणतो याचाही समावेश होतो या अंतर्गत आम्ही 2024 मध्ये आमचे पहिले मानवासह अंतराळ यान अंतराळात पाठवण्याची योजना आखत आहोत, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.
वसुधैव कुटुंबकम याचा अर्थ जग हे एक कुटुंब आहे हे भारतीय तत्त्वज्ञान अधोरेखित करत डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारताला अंतराळ क्षेत्राच्या विकासाचे लाभ सर्व देशांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि अंतराळ क्षेत्रामध्ये सरकार आणि खाजगी संस्था यांच्यातील सहकार्य वाढवायचे आहे .
भारतातील अंतराळ क्षेत्रात परदेशी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांचा प्रवेश सुलभ करण्यासाठी भारत अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या विकासालाही उत्सुकतेने प्रोत्साहन देत आहे, असे ते म्हणाले.
अंतराळ क्षेत्रातील उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या सक्षमीकरणासाठी सरकारची भूमिका अधोरेखित करण्यासाठी अबू धाबी स्पेस डिबेट परिषदेची डॉ जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली.
येत्या काही वर्षात अबुधाबी स्पेस डिबेटची व्यापकता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अंतराळाशी संबंधित विषयांवर चर्चेसाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ बनले असून याने भारत-संयुक्त अरब अमिरातीमधील अंतराळ सहकार्य आगळ्या आणि मोठ्या उंचीवर जाईल असे सांगत डॉ जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881019)
Visitor Counter : 247