संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आकाश शस्त्र प्रणालीचे (भारतीय लष्करी आवृत्ती) सीलबंद तपशील क्षेपणास्त्र प्रणाली गुणवत्ता आश्वासन संस्थेकडे सोपवले
Posted On:
04 DEC 2022 1:24PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) 03 डिसेंबर 2022 रोजी हैदराबादमधील क्षेपणास्त्र प्रणाली गुणवत्ता आश्वासन संस्थेकडे (MSQAA) आकाश शस्त्र प्रणालीचे सीलबंद तपशील (AHSP) सुपूर्द केले. हे हस्तांतरण संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL) येथे झाले. या प्रयोगशाळेने नोडल एजन्सी म्हणून काम करत आकाश शस्त्र प्रणालीची रचना आणि विकास केला आहे. तांत्रिक तपशील आणि गुणवत्ता दस्तऐवज आणि संपूर्ण शस्त्रास्त्र प्रणाली घटकांचे रेखाचित्र सीलबंद केले गेले आणि AHSP हस्तांतरणाचा भाग म्हणून क्षेपणास्त्र प्रणाली गुणवत्ता आश्वासन संस्थेकडे (MSQAA) प्रकल्प आकाशने सुपूर्द केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारतीय सैन्य आणि उद्योगसमूहाचे अभिनंदन केले असून, AHSP हस्तांतरण ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे. संरक्षण सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प खूपच मदतगार ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर .व्ही. कामत यांनी क्षेपणास्त्र समुहामधून क्षेपणास्त्र आणि अनेक भूप्रणालींचा समावेश असलेल्या जटिल प्रणालीचे पहिले AHSP क्षेपणास्त्र प्रणाली गुणवत्ता आश्वासन संस्थेकडे हस्तांतरित केल्याबद्दल प्रकल्प आकाश टीमचे अभिनंदन केले. या हस्तांतरण प्रक्रियेमुळे उत्पादन सुरू असलेल्या भविष्यातील क्षेपणास्त्र प्रणालींचा आराखडा आणखी सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आकाश ही पहिली अत्याधुनिक स्वदेशी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी भारतीय आकाशाचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुमारे एक दशकापासून सशस्त्र दलांसोबत कार्यरत आहे. ही प्रणाली भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने 30,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर मूल्यासह समाविष्ट केली आहे, जी स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीसाठी सर्वात मोठ्या सिंगल सिस्टम ऑर्डरपैकी एक आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL) व्यतिरिक्त संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इतर अनेक प्रयोगशाळा या प्रणालीच्या विकासामध्ये गुंतलेल्या आहेत. यामध्ये संशोधन केंद्र इमारत; इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार विकास आस्थापना; संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता); एकात्मिक चाचणी श्रेणी; शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास अस्थापना; उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा आणि वाहन संशोधन विकास आस्थापना यांचा समावेश आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बीईएमएल लिमिटेड तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि इतर उद्योग भागीदारांद्वारे या प्रणालींची निर्मिती केली जाते.
***
A.Chavan/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880795)
Visitor Counter : 638