अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) उद्या 65 वा स्थापना दिवस साजरा करणार
या प्रसंगी 8 वी प्रादेशिक सीमाशुल्क अंमलबजावणी बैठक (RCEM) होणार
Posted On:
04 DEC 2022 9:07AM by PIB Mumbai
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) यावर्षी 5-6 डिसेंबर 2022 रोजी आपला 65 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ही भारत सरकारच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (CBIC), अंतर्गत तस्करीविरोधी प्रकरणांवरील प्रमुख गुप्तचर आणि अंमलबजावणी संस्था आहे. हे संचालनालय 4 डिसेंबर 1957 रोजी अस्तित्वात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाचे नवी दिल्ली येथे मुख्यालय तसेच 12 विभागीय युनिट्स, 35 प्रादेशिक युनिट्स आणि 15 उप-प्रादेशिक युनिट्स असून यामध्ये सुमारे 800 अधिकारी कार्यरत आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालय सहा दशकांहून अधिक काळापासून संपूर्ण भारतात आणि परदेशात अंमली पदार्थ, सायकोट्रॉपिक पदार्थ, सोने, हिरे, मौल्यवान धातू, वन्यजीव वस्तू, सिगारेट, शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके, बनावट नोटा, विदेशी चलन, SCOMET वस्तू, घातक आणि पर्यावरणास संवेदनशील साहित्य, पुरातन वस्तू इत्यादी तस्करीची प्रकरणे रोखण्याचे आणि शोधण्याचे आणि त्यात गुंतलेल्या संघटित गुन्हेगारी गटांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे कार्य करत आहे. महसूल गुप्तचर संचालनालय व्यावसायिक फसवणूक आणि सीमाशुल्क चुकवेगिरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात देखील गुंतलेले आहे.
विविध देशांबरोबर स्वाक्षरी केलेल्या सीमाशुल्क परस्पर सहाय्य करारांतर्गत आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क सहकार्यामध्ये देखील महसूल गुप्तचर संचालनालय आघाडीवर आहे. या करारात माहितीची देवाणघेवाण करणे आणि इतर सीमाशुल्क प्रशासनाच्या सर्वोत्तम पद्धतींपासून शिकणे यावर जोर दिलेला आहे.
त्यानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयने आपल्या स्थापना दिवसाची संधी साधून अंमलबजावणीशी संबंधित समस्यांबाबत भागीदार सीमाशुल्क संस्था आणि जागतिक सीमाशुल्क संघटना, इंटरपोल सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी प्रभावी हातमिळवणी करण्यासाठी प्रादेशिक सीमाशुल्क अंमलबजावणी बैठक (RCEM) आयोजित केली आहे. या वर्षी या बैठकीला, जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO), इंटरपोल, संयुक्त राष्ट्र संघाचे गुन्हे आणि अंमली पदार्थ कार्यालय (UNODC) आणि प्रादेशिक गुप्तचर संपर्क कार्यालय - एशिया पॅसिफिक (RILO AP) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसह आशिया-पॅसिफिक प्रदेशातील 22 सीमाशुल्क प्रशासन संस्थांना आमंत्रित केले आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते “स्मगलिंग इन इंडिया रिपोर्ट 2021-22” च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येईल. या अहवालात तस्करी विरोधी आणि व्यावसायिक फसवणूक क्षेत्रातील ट्रेंड तसेच महसूल गुप्तचर संचालनालयाची कामगिरी आणि गेल्या आर्थिक वर्षातील अनुभव सादर केले जाणार आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालय हा दिवस भूतकाळातील कामगिरीला उजाळा देऊन त्याचा गौरव करण्यासाठी साजरा करते. हा दिवस केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तरुण अधिकाऱ्यांसाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. या बैठकीमुळे इतर देशांच्या सीमा शुल्क प्रशासनांशी आणि महत्त्वाच्या प्रादेशिक व्यापारी भागीदारांशी संवाद साधण्याची संधी मिळून विभागीय क्षेत्रात सीमा शुल्कासंबंधित बाबींमध्ये भारताच्या भूमिकेला बळकटी प्राप्त होते.
***
A.Chavan/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880791)
Visitor Counter : 285