माहिती आणि प्रसारण मंत्रालय
संस्कृत भाषेतील यानम् मध्ये भारताचे ड्रीम प्रोजेक्ट मंगलयान चित्रित करण्यात आले आहे
संस्कृत भाषा ही कोणत्याही एका धर्माची किंवा समाजाची नाही
गोवा/मुंबई, 28 नोव्हेंबर 2022
यानम हा गोवा येथील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील इंडियन पॅनोमा विभागा अंतर्गत प्रदर्शित झालेला नॉन-फीचर चित्रपट आहे. हा चित्रपट, माजी अंतराळ मोहीम अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन यांच्या "माय ओडिसी: मेमोयर्स ऑफ द मॅन बिहाइंड द मंगलयान मिशन" या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर आधारित आहे.
यानम चित्रपटात भारताचा ड्रीम प्रोजेक्ट मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) दाखवला आहे. जागतिक सिनेमाच्या इतिहासातील विज्ञान विषयावरील, संस्कृत भाषेतील हा पहिला माहितीपट आहे. हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ची क्षमता आणि कौशल्य, अंतराळ शास्त्रज्ञांचे उत्कृष्ट योगदान आणि संस्कृत भाषेचे महत्त्व दाखवतो. तसेच भारताने पहिल्याच प्रयत्नात कठीण आंतरग्रहीय प्रवासाचा विजय कसा संपादन केला, हे दाखवतो.

चित्रपटाचे निर्माते एव्ही अनूप म्हणाले, “मला आनंद आहे की मी इफ्फी मधील इंडियन पॅनोमा विभागात सर्व श्रेणीतील चित्रपट सादर केले आहेत. गेल्या वेळी मी एक फीचर फिल्म आणि एक शॉर्ट फिल्म सादर केली. यावर्षी मी हा नॉन फीचर चित्रपट सादर करत आहे.”
इस्रोसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले, इस्रो ही भारताची शान आहे. आम्ही इस्रोची परवानगी मागण्यासाठी पत्रे लिहिली. सध्याचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी पत्रे पाहिली आणि “होय. आपण हे करत आहोत”, हे सांगण्यासाठी आम्हाला दूरध्वनी केला.

आम्ही भाग्यवान आहोत की इस्रोने आमची विनंती मान्य केली. हे अतीशय गोपनीय आणि उच्च सुरक्षा क्षेत्र आहे. आम्ही दक्षिणेकडील 4 राज्यांमध्ये - केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा, कर्नाटकातील इस्रो मुख्यालय आणि तामिळनाडूमधील सर्वात जुनी वेधशाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. आम्हाला सर्वत्र चित्रीकरण करण्याची परवानगी होती. प्रक्षेपणाच्या वेळी वापरलेले सर्व साहित्य त्यांनी आम्हाला दिले, असेही ते म्हणाले.
आयआयटीसह अनेक विज्ञान महाविद्यालयांकडून आम्हाला आमंत्रित केले जात आहे. भारतात आता संस्कृत शिकवणारी 500 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. ते सर्व आम्हाला आमंत्रित करत आहेत. केवळ संस्कृतमध्येच चित्रपट बनवण्याचा निर्णय का घेतला, असे विचारल्यावर निर्मात्याने उत्तर दिले, “संस्कृत ही सर्वात जुनी भाषा आहे. तसेच ही भाषा फक्त एकाच धर्माची, एकाच समाजाची आहे असा गैरसमज आहे. तो समज आम्हाला मोडायचा होता.”
"जवळजवळ दर आठवड्याला, जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शनासाठी आमची निवड होत आहे", असे सांगून त्यांनी समारोप केला.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879673)