माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘‘जय भीम’ हा केवळ एक शब्द नसून ती एक भावना आहे: दिग्दर्शक था. से. ज्ञानवेल
“जेव्हा सर्व शोषितांना शिक्षणाद्वारे सक्षम होता येईल, तेव्हाच माझ्या चित्रपटाचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होईल : था. से. ज्ञानवेल
‘जय भीम’चा पुढचा भाग (सिक्वेल) लवकरच येईल : सह-निर्माते राजसेकर के
गोवा/मुंबई, 28 नोव्हेंबर 2022
गेले आठ दिवस सिनेरसिक प्रेक्षक आणि प्रतिनिधींना भरभरून आनंद देणाऱ्या 53 व्या इफ्फीचा आजचा शेवटचा दिवसही, त्यांना नेहमीचा निरोप देणारा नाही, तर ज्याच्यापासून प्रेरणा घेता येईल अशा भावनेने ओतप्रोत भरलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा ठरला.आमच्यावर विश्वास नाही? मात्र, ‘जय भीम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, ज्यांनी आपल्या चित्रपटातून, देशातील कायद्याची अंमलबजावणी आणि न्यायव्यवस्था यातील त्रुटींवर मर्मभेदक धाडसी भाष्य केले आहे, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा, तर ‘जय भीम’ हे केवळ दोन शब्द नाहीत, तर ती एक भावना आहे; प्रेरणा आहे.
53 व्या इफ्फीदरम्यान पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या टेबल टॉक्स मध्ये बोलतांना, आपला तामिळ चित्रपट ‘जय भीम’ विषयी दिग्दर्शक था. से. ज्ञानवेल यांनी हे मत व्यक्त केले. हा चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा आहे, जे योग्य आहे, त्याच्यासाठी बोलण्याची, त्याच्या बाजूने उभे राहण्याची प्रेरणा आणि हिंमत देणारा आहे.
आपल्या चित्रपटासाठी ‘जय भीम’ हे शीर्षक का निवडले याविषयी बोलतांना, ज्ञानवेल यांनी सांगितले, “माझ्यासाठी ‘जय भीम’ हा शब्द, दलित,शोषित आणि उपेक्षित समाजासाठीचा प्रतिशब्द आहे, असा समाज ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायम उभे राहिले.
समाजाच्या सर्व स्तरातून ह्या चित्रपटाला मिळालेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आनंददायी आहे, असे सांगत ज्ञानवेल म्हणाले की, सगळ्यांना हा चित्रपट यासाठी आवडला,कारण त्यातला विषय सार्वत्रिक आहे. जय भीम नंतर, जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या, आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे पीडितांवर झालेल्या अन्यायाच्या अनेक कथा मी ऐकल्या.” असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपले संविधान हेच आपले खरे शस्त्र आहे, हे दाखवायचे होते, असेही दिग्दर्शकांनी सांगितले.
‘जय भीम’ चित्रपटात, राजकन्नू आणि सेनगेनी या गरीब आदिवासी जोडप्याचे जीवन आणि संघर्ष चित्रित करण्यात आला आहे.उच्चवर्णीय लोकांच्या सेवेत असलेल्या, त्यांच्यासाठी हलकी कामे करणाऱ्या या जोडप्याला ज्या ज्वलंत समस्यांचा सामना करावा लागला, त्याचं तसंच्या तसं, वास्तव चित्रण यात करण्यात आलं आहे. जेव्हा या चित्रपटात, राजकन्नूला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी अटक केली जाते त्या प्रसंगापासून चित्रपट नेहमीच्या चित्रपट शैलीपासून, वेगळे वळण घेतो. सत्तेत असलेल्या लोकांकडून वंचितांना होणारा अत्याचार आणि अपमान, त्यांना सोसावी लागणारी अवहेलना याचे विदारक पण प्रभावी चित्रण यात दाखवण्यात आले आहे.
चित्रपट हा सामाजिक बदलाचे प्रभावी साधन कसा होऊ शकतो, हे सांगतांना, ज्ञानवेल म्हणाले की जरी या चित्रपटात, वंचित, दुर्बल घटकांसाठी काम करणारी, त्यांच्या मदतीला धावून जाणारी व्यक्तिरेखा असली, तरीही, हा चित्रपट असा संदेश देतो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, आपल्या दिलेली शिक्षण घेण्याची शिकवण हेच आपल्याला सक्षम करणारे सर्वात महत्वाचे साधन आहे. सिनेमासारखे खऱ्या आयुष्यात कोणी ‘हिरो’ आपल्या मदतीला येत नाहीत, त्यामुळे आपल्यालाच आपले नायक बनावे लागते.शिक्षण घेऊन सक्षम व्हावे लागते. या सिनेमातून मला जे साध्य करायचे आहे, ते उद्दिष्ट तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा सर्व पीडित लोक सक्षम होतील.”
हा चित्रपट न्यायमूर्ती के चंद्रू यांच्या एका वास्तव जीवनातील घटनेवर आधारित आहे, जेव्हा ते वकील होते आणि ख्यातनाम अभिनेता सूर्याने ही भूमिका साकारली आहे.
या चित्रपटातील आशय आणि संवाद हेच त्याचे खरे नायक कसे आहेत, हे सांगतांना ज्ञानवेल म्हणाले की जर तुमच्या आशयात खरा जीव असेल, तर चित्रपटातून निर्माता दिग्दर्शकाला जे सांगायचे असते, ते बरोबर सांगितले जाते आणि नंतरच्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात.
अभिनेता सूर्या यांच्या आगराम फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या स्थापनेमागे दिग्दर्शक ज्ञानवेल हेच मार्गदर्शक आहेत यावर प्रकाश टाकत, चित्रपटाचे सहनिर्माते राजसेकर के म्हणाले की पत्रकार आणि लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे ज्ञानवेल अनेक वर्षांपासून दीनदुबळ्यांच्या कामाशी निगडीत होते. . "सूर्याशी आम्ही चित्रपटाच्या निर्मितीसाठी केला होता होता, पण त्याने चित्रपटाची कथा ऐकली, आणि आम्हाला सांगितले की, त्याला या चित्रपटात काम करायचे आहे,"
चित्रपटासाठी इरुला जमातीतील कलाकारांसह कलाकारांनी घेतलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची माहिती देताना, राजसेकर म्हणाले की, अभिनेते मणिकंदन आणि लिजोमोल जोस यांनी राजकन्नू आणि सेंगेनीची भूमिका केली आहे, ते या व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी ते आदिवासी समुदायासोबत 45 दिवस राहिले.
‘जय भीम’ ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करतांना, राजसेकर म्हणाले, की जय भीमचा पुढचा भाग-सिक्वेलचे काम सुरु झाले असून, लवकरच हा चित्रपट येईल.
प्रसिद्ध मल्याळी अभिनेते लिजोमोल जोस, यांनी सांगितले की तमिळ भाषिक इरुला पात्र साकारणे हे त्यांच्यापुढचे खरे आव्हान होते. " आणि हे पात्र साकारण्यात आदिवासी समुदायासोबत राहण्याचा अनुभव खूप कामी आला, असे या अभिनेत्याने सांगितले.
यावेळी अभिनेता मणिकंदनही उपस्थित होते. त्यांनी सांगितले की हा चित्रपट त्यांना अगदी अनपेक्षितपणे मिळाला. या चित्रपटामुळे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची आणि विशेषतः आंतरिक बदलासाठी कशी मदत झाली, हे सांगतांना ते म्हणाले, "मी अशा लोकांना भेटलो आणि त्यांच्यासोबत राहिलो ज्यांच्याकडे आपल्या भौतिक जगातील कुठलीही सुखे-साधने नव्हती, तरीही ते पूर्ण समाधानी होते.”
IFFI च्या भारतीय पॅनोरमा फीचर फिल्म्स विभागाअंतर्गत जय भीमचे प्रदर्शन झाले.
दिग्दर्शक था से ज्ञानवेल हे तमिळ चित्रपट उद्योगातील भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहेत आणि ते जय भीमसाठी प्रसिद्ध आहेत. कूटाथिल ओरुथन (2017) हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पाहिला चित्रपट.
निर्माता 2D एंटरटेनमेंट ही एक पुरस्कारप्राप्त भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. तिची स्थापना अभिनेता, निर्माता आणि प्रस्तुतकर्ता सूर्या यांच्यासह राजसेकर पांडियन, ज्योतिका आणि कार्ती यांनी केली आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879583)
Visitor Counter : 288