अंतराळ विभाग

महासागरांवर देखरेख ठेवणाऱ्या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट-6(ईओएस-6) असे नामकरण करण्यात आलेल्या तिसऱ्या पिढीतील भारतीय उपग्रहाचे आज भूविज्ञान मंत्रालयाच्या भागीदारीत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून(इस्रो) प्रक्षेपण करण्यात आले.

Posted On: 26 NOV 2022 8:18PM by PIB Mumbai

 

महासागरांवर देखरेख ठेवणाऱ्या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट-6 (ईओएस-6) असे नामकरण करण्यात आलेल्या तिसऱ्या पिढीतील भारतीय उपग्रहाचे आज भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) भूविज्ञान मंत्रालय आणि इतरांसोबत भागीदारीत प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून(एफएलपी) हे प्रक्षेपण करण्यात आले.

महासागर देखरेख  मोहीम ओशनसॅट-1 किंवा आयआरएस-पी4 आणि ओशनसॅट-2 या अनुक्रमे 1999 आणि 2009 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रह मोहीमांचा हा पुढचा टप्पा आहे. आपली क्षमता सिद्ध केलेल्या पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल) या प्रक्षेपकाच्या 56व्या (पीएसएलव्ही-एक्सएल आवृत्तीचे 24 वे उड्डाण) प्रक्षेपणांतर्गत हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही-सी54 अस नाव देण्यात आलेल्या आजच्या प्रक्षेपणांतर्गत ओशनसॅट-3 सोबत लहान उपग्रहांचे देखील प्रक्षेपण करण्यात आले. समुद्रसपाटीपासून 740 किलोमीटर उंचीवर ध्रुवीय कक्षेमध्ये ओशनसॅट-3 या उपग्रहाला सोडण्यात आले. या उपग्रहाचे वजन 1100 किलो असून ओशनसॅट-1 पेक्षा तो किंचित जड आहे. या मालिकेंतर्गत पहिल्यांदाच यामध्ये  महासागराची पाहणी करणारे तीन सेन्सर्स म्हणजे ओशन कलर मॉनिटर(ओसीएम-3), सी सर्फेस टेंपरेचर मॉनिटर(एसएसटीएम) आणि केयू-बँड स्कॅटरोमीटर(स्कॅट-3) बसवण्यात आले आहेत. यामधील 360एम स्पाशल रिजॉल्युशन आणि 1400 किमी स्वाथ असलेला 13 चॅनेल ओसीएम पृथ्वीवर दिवस असलेल्या भागाची पाहणी करेल आणि महासागरातील सागरी परिसंस्थेतील सजीवांच्या अन्नसाखळीचा मूलभूत घटक असलेल्या महासागरी शैवालाच्या वितरणाबाबतची महत्त्वाची माहिती पुरवेल.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मूमधून इस्रो आणि भूविज्ञान मंत्रालयाचे या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन करणारा संदेश पाठवला आणि त्यांचे आभार मानले.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879177) Visitor Counter : 134