संरक्षण मंत्रालय
हिंद प्रशांत क्षेत्राच्या आणि व्यापकरित्या जागतिक समुदायाच्या आर्थिक प्रगतीकरता अत्यंत महत्वपूर्ण अशा मुक्त आणि नियमाधारित हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारत वचनबद्ध : नवी दिल्लीत झालेल्या हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवादात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
"वाद विवादांचे निर्मूलन आणि जागतिक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी संवाद हीच एकमेव सुसंस्कृत यंत्रणा"
Posted On:
25 NOV 2022 3:48PM by PIB Mumbai
भारत मुक्त आणि नियमाधारित हिंद प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्ध असून ते केवळ हिंद प्रशांत क्षेत्राच्याच नव्हे तर व्यापकरित्या जागतिक समुदायाच्या आर्थिक प्रगतीकरता अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 25 नोव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवादादरम्यान (IPRD) बीजभाषण करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2018 मध्ये सिंगापूर येथे शांग्री-ला संवादादरम्यान केलेल्या विधानाचा उल्लेख करून राजनाथ सिंह यांनी हिंद प्रशांत क्षेत्रा विषयीच्या भारताच्या दृष्टीवर प्रकाश टाकला.
मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारत वचनबद्ध आहे, जो प्रगती आणि समृद्धीसाठी सुरु असलेल्या एकत्रित प्रयत्नांचा एक भाग आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. असा उल्लेख राजनाथ सिंह यांनी केला. संरक्षण मंत्र्यांनी या प्रदेशातील आसियान देशांच्या मध्यवर्ती भूमिकेची कल्पना मांडली आणि समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी आपल्याला संवादाद्वारे, एक समान तसेच नियम-आधारित क्रम विकसित करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
वाद विवाद आणि मतभेदांचे निर्मूलन आणि जागतिक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी संवाद हीच एकमेव सुसंस्कृत यंत्रणा असल्याचे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. अलीकडेच बाली येथे झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेल्या “युद्धाचे युग आता संपले आहे” या दृढ संदेशाचा त्यांनी उल्लेख केला. "आता युद्धाचा काळ संपला आहे' या संदेशाला G-20 मधील जागतिक नेत्यांनी अनुमोदन दिले असे सिंह यांनी सांगितले.
हिंद प्रशांत क्षेत्राच्या प्रगतीसाठी विधायक कार्यांमध्ये आपल्या भागीदार देशांबरोबर कार्य करण्याचा भारताचा कायम प्रयत्न राहिला आहे, त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये थायलंड येथे बँकॉक मध्ये झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेदरम्यान सुरू केलेल्या हिंद प्रशांत महासागर उपक्रमाविषयी माहिती दिली.
या सप्ताहाच्या प्रारंभी कंबोडिया येथे झालेल्या भारत- आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपक्रमांविषयी देखील सिंह यांनी माहिती दिली. सुरक्षित आणि न्याय्य जगाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. सर्वांसाठी लाभदायी अशा जागतिक सुव्यवस्थेच्या निर्मितीसाठी सुरक्षा हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा एक भाग असावा असे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले.
या दिशेनं जागतिक समुदाय विविध संस्था आणि व्यासपीठांच्या माध्यमातून कार्य करत असून त्यापैकी सर्वात आघाडीवर आहे संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद. मात्र सध्याच्या काळात सामूहिक सुरक्षेची व्याप्ती सर्वांसाठी सामायिक हितसंबंध आणि सुरक्षिततेच्या पातळीवर वाढवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
भारताची कोणतीही कृती ही मानवी समानता आणि प्रतिष्ठा या विचारधारेने प्रेरित असते, भारताच्या प्राचीन परंपरा आणि मजबूत नैतिक पायाचा तो एक अविभाज्य भाग आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवादाच्या समारोपाच्या दिवशी झालेल्या या विशेष सत्रात, ज्याला 'मार्गदर्शन' सत्र असे समर्पक संबोधले गेले, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी भारताच्या सर्वांगीण सागरी सुरक्षेला असलेल्या धोक्यांबद्दल आणि आव्हानांबद्दल सांगितले तसेच सागरी सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी भारतीय नौदलाच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठीचा नौदलाचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी, संरक्षण मंत्र्याच्या हस्ते नॅशनल मेरिटाइम फाउंडेशन (NMF) द्वारे प्रकाशित ‘कोस्टल सिक्युरिटी डायमेंशन ऑफ मेरीटाइम सिक्युरिटी’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
हिंद प्रशांत क्षेत्रीय संवाद ही भारतीय नौदलाची वार्षिक सर्वोच्च-स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद आहे, याद्वारे विचारांचे आदानप्रदान होते आणि भारताच्या पूर्वेकडील किनार्यापासून आफ्रिकेच्या विस्तीर्णपश्चिम किनार्यापर्यंत. पसरलेल्या सागरी सुरक्षेसह, हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित सागरी मुद्द्यांवर चर्चासत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो.
***
S.Tupe/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878827)
Visitor Counter : 198