शिक्षण मंत्रालय

काशी तमिळ संगम’च्या 5 व्या दिवशी तामिळ प्रतिनिधींच्या दुसऱ्या तुकडीने घेतला काशीची परंपरा, कला आणि संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव


‘हनुमान घाट’, सुब्रह्मण्य भारती यांचे निवासस्थान, व्यापार सुविधा केंद्रातील संग्रहालय, सारनाथ आणि बनारस हिंदू विद्यापीठातील अँफीथिएटरमधील सांस्कृतिक कार्यक्रम ही दिवसभरातील प्रमुख आकर्षणे आहेत

Posted On: 23 NOV 2022 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022

महिनाभर चालणाऱ्या ‘काशी तमिळ संगम’ महोत्सवात सहभागी होणाऱ्या तामिळनाडूच्या शिष्टमंडळाच्या दुसऱ्या तुकडीने गंगा नदीच्या काठावर स्थित ‘हनुमान घाट’ येथे पहाटे पवित्र स्नान केले. याआधी ‘रामेश्वरमघाट’ नावाने  ओळखला जाणारा ‘हनुमान घाट’ हा वाराणसीमधील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या घाटांपैकी एक आहे. आसपासच्या परिसरात  केरळ मठ, कांची मठ, शंकरा मठ, शृंगेरी मठ सारख्या दक्षिण भारतीय मठांची मोठी संख्या आहे.

पवित्र स्नानानंतर शिष्टमंडळाने  ‘हनुमान घाट’ येथील सुब्रह्मण्य भारती यांच्या निवासस्थानी भेट दिली. याठिकाणी त्यांच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती पाहून शिष्टमंडळातील सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

तामिळ शिष्टमंडळाच्या दुसऱ्या तुकडीत कारागीर आणि व्यापारी गटांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांनी व्यापार सुविधा केंद्राला भेट दिली. तिथे असलेले संग्रहालय प्रत्यक्ष पाहणे हा यामागचा उद्देश होता. संग्रहालयात, पूर्वांचल प्रदेशातील हातमाग उत्पादनांचे वैभव आणि सारनाथच्या पुरातत्व वस्तूंच्या प्रतिकृती पाहुण्यांना दाखवण्यात आल्या. व्यापार सुविधा केंद्राला भेट देणाऱ्या शिष्टमंडळासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते, यामध्ये काही सदस्यही उत्साहाने सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर त्यांना सारनाथची सैर घडवण्यात आली.

हे शिष्टमंडळ संध्याकाळी सारनाथहून बनारस हिंदू विद्यापीठातील अँफीथिएटरला पोहोचेल आणि तिथे सांस्कृतिक कार्यक्रमालाही उपस्थित राहील. ते त्या ठिकाणी विविध स्टॉल्सनाही भेट देतील. या 75 स्टॉल्समध्ये उत्तर आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही दुकानांचा  समावेश आहे, ज्यामध्ये कलाकृती, हातमाग, हस्तकला, पारंपारिक पोशाख, उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ इत्यादीची ओळख  प्रतिनिधी मंडळ तसेच वाराणसीच्या स्थानिक लोकांना पहायला मिळेल.

 

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1878263) Visitor Counter : 121