माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उत्तम गीत रचनेसाठी चाल आणि शब्दरचना यांचा मेळ बसायला हवा : प्रसून जोशी
अस्सलपणा हा कोणत्याही गीतकाराचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2022
चांगल्या गीतरचनेसाठी कवीची शब्दरचना आणि संगीत संयोजकाची चाल यांचा उत्तम मेळ बसणे आवश्यक आहे, असे सुप्रसिध्द गीतरचनाकार प्रसून जोशी यांनी म्हटले आहे. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संभाषणात्मक सत्रात ते बोलत होते. “गीतकार आणि संगीत संयोजक यांच्यातील नाते नेहमीच परस्पर सहयोगी असले पाहिजे. या दोघांनी एकमेकांना पूरक ठरणे महत्त्वाचे आहे,” ते म्हणाले.
“गीत लेखनाची कला आणि कसब” या विषयावर आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रात उपस्थितांना संबोधित करताना ख्यातनाम कवी आणि गीतकार जोशी म्हणाले की, अस्सलपणा हा कोणत्याही गीतकाराचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. “तुमच्यासारखे दुसरे कोणीच असू शकत नाही, तुम्ही अद्वितीय आणि अतुलनीय आहात, हा विश्वास गीतकाराने बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक गीतकाराने स्वतःच्या विशिष्ट शैलीत, स्वतःचे शब्द वापरून गीते लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” त्यांनी पुढे सांगितले.
स्वतःच्या गीत लेखनाचे सार सांगताना प्रसून जोशी म्हणाले की त्यांची बहुतांश शब्दरचना त्यांच्या भूमीतून आणि संस्कृतीतून आलेली असते. “आपले संगोपन आणि संस्कृती यांचा आपल्या लिखाणावर खोलवर प्रभाव असतो. मी आपल्या प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीकडून माझे शब्द आणि रूपके उधार म्हणून घेत असतो. आपल्या प्रादेशिक भाषेतील शब्द आपण कधीच विस्मृतीत जाऊ देता कामा नये,” ते म्हणाले.
या संभाषणात्मक सत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनंत विजय यांनी केले.
सत्यजित रे फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टीटयूट (एसअरएफटीआय), एनएफडीसी, फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टीटयूट ऑफ इंडिया तसेच ईएसजी यांच्या संयुक्त विद्यमाने 53 व्या इफ्फीमध्ये मास्टरक्लासेस आणि संभाषणात्मक सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षीच्या इफ्फीदरम्यान या दोन्ही कार्यक्रमांची एकूण 23 सत्रे घेण्यात येणार आहेत. या विषयाचे विद्यार्थी तसेच चित्रपटाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या रसिकांना चित्रपट निर्मिती प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूची माहिती मिळावी या उद्देशाने इफ्फीमध्ये हे मास्टरक्लासेस आणि संभाषणात्मक सत्रे घेण्यात येत आहेत.
* * *
PIB Mumbai | U.Ujgare/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878199)
Visitor Counter : 269