माहिती आणि प्रसारण मंत्रालय

युवा आणि आयकॉनिक स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांच्या जीवनावरील तेलुगू जीवनपट इफ्फी मध्ये प्रदर्शित


प्रत्येकानं खुदीरामला ओळखलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, स्वातंत्र्यलढ्याविषयी कमी ज्ञात असलेल्या घटनांचे चित्रपटात चित्रण: दिग्दर्शक विद्या सागर राजू

Posted On: 22 NOV 2022 9:20PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2022

 

युवा, आयकॉनिक स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात तरुण हुतात्म्यांपैकी एक खुदीराम बोस यांचे जीवन चरित्र उलगडून दाखवणारा तेलुगू चित्रपट आज ५३व्या इफ्फी चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक विद्या सागर राजू यांचा  दिग्दर्शक म्हणून तयार केलेला हा तिसरा चित्रपट आहे. प्रत्येकाला खुदीराम यांच्या बद्दल माहिती व्हावी या इच्छेतून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

इफ्फी दरम्यान आयोजीत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना विद्या सागर राजू यांनी चित्रपटाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं, “ स्क्रिप्ट तयार करण्यापूर्वी सखोल संशोधन केले. स्वातंत्र्य चळवळीतील बंगालची फाळणी या सारख्या महत्त्वाच्या घटना आणि रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, सिस्टर निवेदिता, बरेंद्रनाथ घोष आणि इतर व्यक्तिमत्त्वांशी खुदीराम यांचे जीवन आणि काळ जोडलेले होते.  स्वातंत्र्यलढ्याबद्दल काही कमी ज्ञात सत्य घटनाही चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. सहा वकिलांनी खुदीरामची केस लढवली होती. त्या काळातील नामांकित वकील नरेंद्र कुमार बसू यांनी खुदीराम यांच्या साठी खटला लढवला होता, तरीही ते जिंकू शकले नाहीत. 1906 मध्ये देशातील पहिले ध्वनीमुद्रण झाले ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं वंदे मातरम् हे गीत. ही आणखी एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना चित्रपटात दाखवली आहे. ” 

   

“आमची टीम खुदीराम यांच्या इतिहासात शिरली तेव्हा लक्षात आलं की दाखवण्यासारख्या खूप गोष्टी आहेत”, विद्या सागर राजू यांनी सांगितलं. “बंगालमधील फाळणीची भीषणता आपल्याला स्क्रिप्टमधून दिसते. अनेक ऐतिहासिक पात्रांचा सहभाग त्यात आहे आहे. मी चित्रपटाला थोडं अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला. ”, असं ते  म्हणाले.

कलाकार आणि क्रू यांना चित्रपट उत्तम प्रकारे साकारण्याचे श्रेय त्यांनी दिलं आहे. “यात काम केलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञांना स्क्रिप्ट कशी जिवंत करायची हे माहीत होते. ते चित्रपटात पडद्या मागे आहेत, पण माझ्यासाठी ते सर्वात पुढे आहेत”, हे त्यांनी आवर्जून सांगितलं.

नवोदित अभिनेता राकेश जगरलामुडी याने खुदीराम बोस यांची भूमिका केली आहे.  पहिल्याच चित्रपटात स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ऐतिहासिक आणि वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखा साकारणे थोडे आव्हानात्मक होते, असंही त्यानं सांगितलं. सगळ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भूमिका सहजतेने साकारण्यासाठी मदत झाली, असेही त्यानं नमूद केलं.. विवेक ओबेरॉय, अतुल कुलकर्णी, नसीर आणि इतर ज्येष्ठ अभिनेत्यांसोबत काम करणे हा माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला शिकण्यासाठीचा उत्तम अनुभव होता, असे राकेश म्हणाले. 

फाइन-ट्यूनिंग, परफेक्शन, सूक्ष्म तपशील, संस्कृती आणि पात्रांची योग्य निवड हे चित्रपट निर्मितीचे महत्त्वाचे घटक आहेत, असे विद्या सागर राजू यांनी सांगितले. प्रादेशिक चित्रपटांवर बोलताना ते म्हणाले, “जगभरातील सर्व भावना सारख्याच असतात. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटही आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करतात.”

देशात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यास सुरुवात झाली तेव्हा आदरणीय स्वातंत्र्यसैनिकांवर चित्रपट बनवण्याचा विचार केला. आणि मग सुरू झाला खुदीराम बोस यांच्यासोबतचा प्रवास”, असं राजू म्हणाले.

हा चित्रपट सात भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संसदेतील आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान हिंदी आवृत्ती प्रदर्शित करण्याचा विचार आहे, असे चित्रपट बनवणाऱ्या टीमने सांगितले.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878130) Visitor Counter : 179