माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताला चित्रीकरण आणि चित्रपटनिर्मितीनंतरच्या प्रक्रियेचं सर्वात पसंतीचे केंद्र बनवणार: अनुराग ठाकूर


इफ्फीच्या आयोजनामागचा दृष्टिकोन आणि मूल्ये “वसुधैव कुटुंबकम” मध्ये सामावलेली आहेत

‘भारतीय चित्रपटसृष्टीतील यंदाचे उल्लेखनीय व्यक्तिमत्व’ पुरस्कार तेलुगु अभिनेते चिरंजीवी यांना जाहीर

Posted On: 20 NOV 2022 8:56PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 20 नोव्‍हेंबर 2022

 

“भारताला, चित्रीकरण आणि चित्रपट निर्मितीनंतरच्या प्रक्रियांचे जगभरातले सर्वात पसंतीचे केंद्र बनवण्याचा आपला प्रयत्न आहे, असं सांगत, त्यासाठी, भारतातील कलाकारांची गुणवत्ता आणि या उद्योगक्षेत्रातील धुरीणाचे अभिनव कौशल्य उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले आहे. 53 व्या इफ्फी म्हणजे, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या समारंभाला अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती तसेच, प्रेरणादायी भाषणं आणि दर्जेदार कार्यक्रमांनी ह्या महोत्सवाची पणजीत शानदार सुरुवात झाली.

“इफ्फी हा केवळ काही दिवसांचा महोत्सव म्हणून मर्यादित राहू नये, अशी माझी अपेक्षा आहे. ज्यावेळी आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करु, या अमृतमहोत्सपासून सुरु झालेल्या अमृत काळाच्या 25 वर्षांत इफ्फी सुरु राहावा, अशी आमची दृष्टी आहे. भारताला सिनेमा आशयनिर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी, विशेषतः देशातील प्रादेशिक सिनेमातील आशय निर्मिती अधिक संपन्न करण्यासाठी, प्रादेशिक महोत्सवाची व्याप्ती वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.” असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

अनुराग ठाकूर यांचीच संकल्पना असलेल्या, “उद्याचे 75 सृजनशील कलावंत’ या उपक्रमाविषयी विस्तृत  माहिती देतांना त्यांनी घोषणा केली, “की 75 कलावंतांची संख्या ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाशी संबंधित आहे. देशाच्या स्वातंत्र्यमहोत्सवात, युवा कलावंतांच्या कल्पना आणि प्रतिभाशक्तीला नवे पंख देण्यासाठी, देशी कल्पनांना मंच उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने, गेल्या वर्षी या उपक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृतकाळापर्यंत सुरु राहणार असून, दरवर्षी यात एका कलावंताची भर पडत राहणार आहे.”

इफ्फीची मूलतत्वे ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारलेली

आशियातील या सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाच्या जुन्या स्मृतींना उजाळा, देत अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, या महोत्सवाच्या सुरुवातीपासून म्हणजे,1952 पासून आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामागची दृष्टी आणि मूल्ये, “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेशी घट्ट जुळलेली आहेत. ही संकल्पना, संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून, शांततामय सहजीवनाचे तत्व मांडणारी आहे. “जागतिक मंचावर भारताचा वाढता प्रभाव आणि जी-20 चं भारताला मिळालेले अध्यक्षपद, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य” याच संकल्पनेमागचा संकल्प अधिक दृढ करणारे आहे.

इफ्फीमध्ये, भारतीय पॅनोरामा, वर्ल्ड ऑफ सिनेमा, आदरांजली, आणि रेट्रोस्पेकटीव्ह असे पारंपरिक विभाग यंदाही असणार आहेत, त्याशिवाय 53 व्या इफ्फीमध्ये, अनेक सुप्रसिद्ध भारतीय चित्रपटांचे, परदेशी चित्रपटाचे, ओटीटी सिरिजचे, भव्य प्रीमियर शो होणार आहेत. त्यावेळी, सिनेसृष्टितील, दिग्गजही उपस्थित राहणार आहेत. इस्राइलचे प्रसिद्ध कलाकार यावेळी उपस्थित राहतील. एनएफडीसीच्या पव्हेलियनमध्ये फिल्म बाजार, केंद्रीय संपर्क ब्युरोचे मल्टीमिडिया  प्रदर्शन, आणि “उद्याचे 75 सृजनशील व्यक्तिमत्वे ” साठीचे 53-तास आव्हान, अशा अनेक उपक्रमांचा या महोत्सवात समावेश असेल, असे ठाकूर यांनी सांगितले.

53 व्या इफ्फीची सुरुवात ऑस्ट्रियन लेखक दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या अल्मा आणि ऑस्कर या उत्कृष्ट चित्रपटाने होत असल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांची उत्सुकता देखील व्यक्त केली. यावर्षीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळविल्याबद्दल स्पेनचे सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते कार्लोस सौरा यांचे केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदन केले. “सौरा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असून आता वयाच्या नव्वदीतदेखील ते त्यांच्या कॅमेऱ्यासह सक्रीयपणे काम करत आहेत. त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी खूप मोठ्या संख्येने पुरस्कार तसेच नामांकने मिळवली आहेत. यंदाच्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहोळ्यामध्ये ख्यातनाम चित्रपट निर्माते सौरा यांच्या वतीने त्यांची कन्या अॅना सौरा हा पुरस्कार स्वीकारत  आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे,” केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले.

2022 चा इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडेला यांना देण्यात येत असल्याची  घोषणा ठाकूर यांनी केली 
 
इफ्फीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या ‘चित्रपट बाजार’ या उपक्रमाचे महत्त्व देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विषद केले. “चित्रपट बाजार हा जागतिक चित्रपट निर्मिती उद्योग आणि आपली सर्जनशील अर्थव्यवस्था यांच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. याचाच अर्थ असा की, हा बाजार म्हणजे दक्षिण आशियाई चित्रपट साहित्याचा शोध, मदत आणि सादरीकरण तसेच चित्रपट निर्मिती, उत्पादन आणि वितरण या क्षेत्रांतील प्रतिभा यांवर लक्ष केंद्रित केलेले संपूर्ण जगभरातील चित्रपट विक्रेते आणि खरेदीदार यांच्या एकत्रीकरणाचे हे ठिकाण आहे. हा महोत्सव चित्रपट निर्मात्यांना त्यांनी तयार केलेले चित्रपट जगासमोर सादर करण्यासाठी आणि त्यांनी चित्रित केलेल्या विषयांबद्दल सखोलपणे चर्चा करण्यासाठी एक अनोखा मंच पुरवतो.” ते म्हणाले. “इफ्फीने यावर्षी प्रथमच देशांच्या दालनांची सुरुवात करून चित्रपट बाजाराची व्याप्ती वाढविली आहे. चित्रपट बाजार उपक्रमाच्या या 15 व्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांना यातील 40 दालनांना भेट देण्यासाठी आमंत्रित करतो.तसेच यावर्षी प्रथमच इफ्फीमध्ये चित्रपटांच्या जगातील अत्याधुनिक संशोधनांची माहिती सादर करणारे तंत्रज्ञान केंद्र देखील उभारण्यात येणार आहे,”केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी सांगितले.

महोत्सव अधिक सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी प्रवेश-योग्य बनावा म्हणून, दिव्यांगजनांसाठी चित्रपट प्रदर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे,असे  ठाकूर म्हणाले. “दिव्यांगजनांच्या प्रवेश-योग्यतेच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन, या विभागातले चित्रपट संवाद वर्णन आणि उप-शीर्षकांसह ऑडिओ-व्हिज्युअल-सुसज्ज असतील. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (FTII) दिव्यांगजनांसाठी दोन विशेष अभ्यासक्रम आयोजित करणार असून, यामध्ये  ‘स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ (ऑटिस्टिक व्यक्तींसाठी) आणि ‘पडद्यावरील अभिनय’ (व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी) या अभ्यासक्रमांचा समावेश असेल.” असेही  ते पुढे  म्हणाले.  


* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/Radhika/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1877584) Visitor Counter : 52