मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

दमण येथे उद्या जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा होणार



शाश्वत साठा  आणि निरोगी परिसंस्था सुनिश्चित करण्यासाठी विश्व ज्या मार्गाने जागतिक मत्स्यव्यवसायाचे व्यवस्थापन करत आहे तो बदलण्यावर यानिमित्ताने भर देण्यात येणार

हा उपक्रम निरोगी महासागर परिसंस्था आणि शाश्वत मत्स्यव्यवसाय यांच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करेल

गेल्या तीन वर्षांत या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांचा केंद्र सरकारतर्फे पारितोषिक देऊन गौरव होणार

तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी प्रदर्शने आणि तांत्रिक सत्रांचे आयोजन

Posted On: 20 NOV 2022 4:38PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभाग आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने उद्या 21 नोव्हेंबर 2022 रोजी दमण येथील स्वामी विवेकानंद सभागृहात जागतिक मत्स्यव्यवसाय दिनसाजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात, केंद्र सरकारतर्फे वर्ष 20१९-20 ते 2021-22 या तीन वर्षांच्या कालावधीत उत्तम कामगिरी करणारी राज्ये तसेच जिल्हे, अंतर्गत, सागरी, डोंगराळ आणि ईशान्य प्रदेश, तसेच अंतर्गत, सागरी, डोंगराळ आणि ईशान्य प्रदेश भागातील जिल्हे यांच्यातील सर्वोत्कृष्ट क्वासी सरकारी संस्था/महासंघ/ सहकारी संस्था/ मंडळे यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर, सर्वोत्तम मत्स्यशेती करणारे शेतकरी (भूभाग , सागरी, डोंगराळ आणि ईशान्य प्रदेश भागातील), सर्वोत्कृष्ट उबवण केंद्र (मासे, कोळंबी आणि ट्राऊट यांची अंडी उबविण्यासाठी), उद्योग, सर्वोत्कृष्ट सहकारी मत्स्यव्यवसाय संस्था/ शेतकरी उत्पादक संघटना/स्वयंसहाय्यता गट, सर्वोत्कृष्ट व्यक्तिगत व्यावसायिक, सर्वोत्कृष्ट अभिनव संशोधन संकल्पना/ तंत्रज्ञान अंतर्भूत करणे या विभागांतील विजेत्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सागर परिक्रमेवर आधारित गीताचे गुजराथी भाषेतील संस्करण, एसएसएस:इंडिया@ 75   - भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील 100 सर्वोत्कृष्ट यशोगाथा, भित्तीचित्रे आणि इतर साहित्याचे देखील अनावरण करण्यात येईल.

विविध शैक्षणिक संस्था, सरकारी संघटना तसेच खासगी क्षेत्राने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानांचे हस्तांतरण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून ओळख मिळवून देण्यासाठी 20 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

दुपारच्या सत्रात, तंत्रज्ञान विषयक माहिती देणारी सत्रे आयोजित केली जातील. यामध्ये आयसीएआर-सीआयएफई मधील शास्त्रज्ञांकडून या क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान समाविष्ट करण्याच्या शक्यता तसेच समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येईल.भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रात गुंतवणुकीला असलेला  वाव स्पष्ट करण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या कंपनीतर्फे मार्गदर्शक सत्रे घेतली जातील. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

देशात नीलक्रांतीच्या माध्यमातून शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेती तसेच आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.मत्स्यशेतीचा अधिक प्रमाणात प्रसार आणि विस्तार, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनात सुधारणा, मत्स्यव्यवसाय तसेच मत्स्यशेती या क्षेत्रात अभिनव संशोधनाला प्रोत्साहन, दर्जात सुधारणा आणि कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न यांच्या माध्यमातून या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची संकल्पना सरकारने निश्चित केली आहे.

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्यासह  दादरा, नगर हवेली तसेच दमण आणि दीव यांच्या केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचे प्रशासक प्रफुल पटेल आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव जतींद्र नाथ स्वेन, एनएफडीबीचे मुख्य  कार्यकारी अधिकारी, मत्स्य विभागाचे संयुक्त सचिव उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभाग, दादरा, नगर हवेली तसेच दमण आणि दीव यांच्या केंद्रशासित प्रदेश प्रशासन,मत्स्यविभागातील विविध राज्य अधिकारी, एनएफडीबी आणि इतर संबंधित मंत्रालये तसेच विभाग यांतील अधिकाऱ्यांसह मत्स्यशेती करणारे शेतकरी, मच्छिमारउद्योजक, भागधारक, शिक्षणतज्ञ आणि संशोधक, व्यावसायिक, विविध राज्यांचे मत्स्य विभाग अधिकारी आणि देशातील वैज्ञानिक या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

 

पार्श्वभूमी

मत्स्य समुदायाशी संबंधित जनता, मत्स्य शेती करणारे तसेच इतर भागधारक यांच्याप्रती दृढ ऐक्याचे प्रदर्शन करण्यासाठी सर्व दर वर्षी 21 नोव्हेंबर या दिवशी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा केला जातो. वर्ष 1997 मध्ये नवी दिल्ली येथे मत्स्य शेती  करणारे आणि मत्स्य व्यावास्यातील इतर कामगार यांच्या जागतिक मंचाची बैठक झाली आणि त्यात जागतिक मत्स्यव्यवसाय मंचाची स्थापना करण्यात आली. जगभरातील 18 देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या मंचावर शाश्वत मासेमारी पद्धती आणि धोरणे यांच्या संदर्भात जागतिक पातळीवर नियमांविषयी सल्ला देणाऱ्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अति प्रमाणात मासेमारी, अधिवासांचा नाश आणि आपल्या सागरी तसेच गोड्या पाण्याच्या साधनसंपत्तीच्या शाश्वततेला असलेला धोका यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. शाश्वत स्टॉक आणि निरोगी परिसंस्था सुनिश्चित करण्यासाठी विश्व ज्या मार्गाने जागतिक मत्स्यव्यवसायाचे व्यवस्थापन करत आहे तो बदलण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा करण्यात येतो.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877525) Visitor Counter : 311