माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53व्या इफ्फी महोत्सवात साजरी होणार मणिपुरी चित्रपटसृष्टीची 50 वर्षांची गौरवशाली कारकीर्द

Posted On: 19 NOV 2022 10:20PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 19 नोव्‍हेंबर 2022

 

ईशान्य भारतातील अष्ट भगिनींपैकी एक असलेले आणि ‘भारताचे मौल्यवान शहर’ म्हणून प्रख्यात, मणिपूर राज्य 53 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ईशान्य भारतात निर्मित चित्रपटांच्या सादरीकरणात आघाडीवर असणार आहे.   

मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी आशियातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव असलेल्या इफ्फीच्या या 53व्या वर्षीच्या महोत्सवात भारतीय चित्रपटांच्या विभागामध्ये मणिपूर राज्य चित्रपट विकास सोसायटीतर्फे पाच फिचर आणि पाच नॉन-फिचर प्रकारचे चित्रपट सादर केले होणार आहेत.

पद्मश्री पुरस्कार विजेते दिग्दर्शन अरिबाम श्याम शर्मा आणि रतन थियम यांच्या ‘ईशानाऊ’ या फिचर चित्रपटाने तसेच नॉन-फिचर विभागात ‘द मॅन ऑफ थियेटर’ या चित्रपटासह इतर  मणिपुरी चित्रपटांच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. सिनेमाप्रेमींना या चित्रपटांतून मणिपूर राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा,  कथाकथन, नृत्य, संगीत, परंपरा आणि नाटक यांचा अनुभव घेता येईल.

गोवा येथे होत असलेल्या 53व्या इफ्फीमध्ये अरिबाम श्याम शर्मा, ओकेन अमाकचाम, निर्मला चानू, बोरुन थोकचॉम,रोमी मेईती यांच्यासारख्या मणिपुरी चित्रपट सृष्टीतील अग्रेसर व्यक्तिमत्वांसह इतर अनेक निर्माते दिग्दर्शक, मणिपुरी चित्रपटांच्या 50 वर्षांच्या सौंदर्यपूर्ण प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित राहतील.  

ईशानाऊ

अरिबाम श्याम शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला, ईशानाऊ हा चित्रपट ताम्फा हे प्रमुख स्त्री पात्र, तिचा नवरा आणि मुले यांच्याभोवती फिरतो. मैबी गुरूंच्या शोधार्थ ताम्फा तिच्या कुटुंबाला सोडून जाते तेव्हा अचानक झालेल्या या बदलामुळे त्या सर्वांचीच आयुष्ये बदलून जातात.मैबी गुरूंनी आपल्याला मैबींच्या मातृसत्ताक धार्मिक पंथामध्ये समाविष्ट होण्यासाठी निवडले आहे अशी ताम्फाची समजूत झालेली असते. यानंतर काय होते ते आपल्याला चित्रपटात दाखविले आहे.

ब्रोजेन्द्रागी लुहोन्गबा

एस.एन.चांद सजाती यांनी दिग्दर्शित केलेला, ब्रोजेन्द्रागी हा चित्रपट आपल्याला एका डॉक्टरची गोष्ट सांगतो. या डॉक्टरने त्याच्या आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले आहे, मात्र लग्नानंतर देखील तो तिच्याकडे पाहण्यास नकार देतो. नंतर, एका सांगीतिक कार्यक्रमात, त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी दिसते, तो तिच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकत राहतो. स्वतःच्या या वागणुकीबद्दल अपराधी भावना घेऊन तो घरी परततो आणि तीच मुलगी आपली पत्नी आहे हे दिसल्यावर अत्यंत आश्चर्यचकित होतो. डॉक्टरच्या या मनोवस्थेचे वर्णन आपल्याला चित्रपटात दिसते.

लोकताक लैरेंबी

काव्याचा उत्सव साजरा करणारा हा चित्रपट लोकताक तलावाच्या परिसरातील ध्यानधारणेच्या वातावरणात राहणाऱ्या स्थानिकांचे दर्शन घडवितो. मणिपूरमधील तरंगता तलाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तलावामध्ये एका मच्छिमाराला अपघाताने एक शस्त्र गवसते. त्या शस्त्रामुळे त्याच्यात निर्माण झालेला आत्मविश्वास नंतरच्या काळात हिंसेला कारणीभूत ठरतो. हाओबाम पबन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, रसिकांना एका वेगळ्या विषयाचे दर्शन घडवतो.

माताम्गी मणिपूर

हा चित्रपट म्हणजे एक निवृत्त गृहस्थ तोन्सा आणि त्याच्या तीन प्रौढ मुलांचा समावेश असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट आहे. समाजातील नव्या आणि जुन्या मूल्यांचे पुरस्कर्ते असलेले कुटुंबातील हे सर्व सदस्य लवकरच आपापल्या आयुष्यात विविध दिशांना पांगतात. त्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नशिबात एकमेकांपासून दुरावणे लिहिले आहे, असे वाटत असतानाच ते एकमेकांना अधिक उत्तम प्रकारे समजून घेऊ लागतात. आणि त्यानंतर ते सर्वजण एकमेकांसोबत आनंदाने राहू लागतात.

फिजिगी मणी

ओईनाम गौतम यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात फिजिगी मणी येथे राहणारे याईफाबी हे प्रमुख स्त्री पात्र, तिच्या कुटुंबाला एकत्र आणण्याच्या मोहिमेवर निघते. तिचे पालक आणि त्यांना सोडून निघून गेलेला सनाजाओबा हा तिचा भाऊ यांच्यातील तणावपूर्ण नातेसंबंधांमध्ये दुवा निर्माण करण्याचा ती प्रयत्न करते. हा चित्रपट याईफाबीच्या भूतकालीन आणि सद्यकालीन जीवनातील उतार चढावातून मणिपूरमधील सामाजिक-राजकीय परिस्थितीमधील बदलांचे दर्शन घडवतो.

रतन थियाम : रंगभूमीवरील अविष्कर्ता

ओकेन अमाकचाम आणि निर्मला चानू यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मणिपूरच्या कोरस रेपर्टरी रंगभूमीचे संस्थापक-दिग्दर्शक रतन थियाम यांचा जीवनपट सादर करतो. प्रख्यात मणिपुरी कवी, नाटककार, चित्रकार, संगीतकार, रंगभूमीचे मार्गदर्शक असलेले रतन थियाम यांनी वर्ष 2013 ते 17 या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्षपद भूषवले.

ल्लीषा अमागी महाओ

एन.कुंजमोहन यांच्या राष्ट्रीय अकादमी पारितोषिक विजेत्या लघुकथेवर आधारलेला हा चित्रपट नदीमध्ये मासेमारी करून कुटुंबाचे पोट भरण्यासाठी धडपडणाऱ्या चाओबा याची गोष्ट सांगतो. अनेक दिवसांच्या मासेमारीनंतर चाओबा आणि त्याच्या मुलाला हिल्सा मासा पकडण्यात यश येते. हिल्सा माशाची आमटी करण्यासाठी ते आनंदाने घरी येतात. पण दुर्दैवाने घरातला तांदूळ संपलेला असतो. चाओबाचा नाईलाज होतो आणि थोडा तांदूळ खरेदी करण्यासाठी हिल्सा विकून पैसे घ्यावे लागतात. निंगथाऊजा लांचा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  

लुक अॅट द स्काय

हाई हा 40 वर्षीय खेडूत त्याच्या कुटुंबासह मणिपूरच्या दुर्गम खेड्यात राहतो. निवडणुकीच्या काळात लोकप्रिय उमेदवाराला पाठींबा न दिल्याबद्दल गावकरी त्याला बहिष्कृत करतात. अनेक अडचणी येऊनही तो त्याच्या मतदान करण्याच्या व्यक्तिगत हक्कासाठी लढतो आणि त्याच्या उमेदवारांना निवडून आणतो. हा चित्रपट अशोक वेईलो यांनी दिग्दर्शित केला आहे.

द सायलेंट पोएट

बोरुन थोकचोम दिग्दर्शित दिग्दर्शित या चित्रपटात इरोम शर्मिला चानू या कार्यकर्तीच्या व्यक्तिमत्त्वाची काव्यात्मक बाजू दाखवण्यात आली आहे. ‘आत्महत्या करण्याचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी सक्त पहारा बसवलेल्या मणिपूरच्या रुग्णालय तुरुंगात दाखल केलेले असताना इरोम शर्मिला चानू यांनी त्यांच्या वहीत खरडलेल्या कवितांचे जग या चित्रपटात चित्रित केले आहे.

द टेंटेड मायनर

फुटबॉल प्रशिक्षकाने ‘चाओरेन’ या शाळकरी मुलाचा मित्र साना याची त्यांच्या संघाचा कप्तान म्हणून निवड केल्याबद्दल चाओरेनला मित्राबद्दल मत्सर वाटू लागतो. नंतर, चुकीच्या कृत्यात सहभागी होऊन तो सानाला रसायनाचा फवारा मारलेली भाजी खायला घालतो. परिणामी, दुसऱ्या दिवशी साना शाळेत येऊ शकत नाही. रोमी मेईती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitni/D.Rane



(Release ID: 1877489) Visitor Counter : 172