अंतराळ विभाग
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज विक्रम सबऑर्बिटल या भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेटचे अंतराळात प्रक्षेपण करून इतिहास घडवला
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आंध्रप्रदेशात श्रीहरिकोटा येथील अविस्मरणीय प्रसंगाचे वैयक्तिक साक्षीदार ठरले. ही भारताची अवकाश प्रवासातील नवी सुरुवात, भारताच्या स्टार्ट अप चळवळीतील निर्णायक टप्पा असल्याचे जितेंद्र सिंह यांचे गौरवोद्गार
Posted On:
18 NOV 2022 7:27PM by PIB Mumbai
भारताच्या पहिल्या वहिल्या खासगी रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर लगेचच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जे स्वतः या प्रक्षेपण स्थळी उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली, " अभिनंदन, भारताचे ! भारताच्या अवकाश प्रवासात नवीन सुरुवात! अवकाश क्षेत्र खासगी- सार्वजनिक भागीदारीसाठी खुले करून हे प्रयत्न यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार! भारताच्या स्टार्ट अप चळवळीतील निर्णायक टप्पा! अनेक बहुमानांनी सन्मानित असलेल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन"
मंत्रीमहोदय म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली अवकाश क्षेत्र खासगी भागीदारांसाठी खुले केल्यानंतर इस्रोच्या प्रवासातील हा मोठा मैलाचा दगड ठरला आहे.
इस्रोने म्हटले आहे " मिशन प्रारंभ यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे" तर स्कायरूट एअरोस्पेसने म्हटले आहे " अवकाशाची शोभा वाढवणाऱ्या विक्रम-एस या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटने इतिहास घडवला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विक्रम सबऑर्बिटल या भारताच्या पहिल्या वहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास घडवला आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आंध्रप्रदेशात श्रीहरिकोटा येथे स्वतः उपस्थित राहून हा क्षण अनुभवला.
टीम इस्रो आणि स्कायरूट एअरोस्पेसचे आपल्या संक्षिप्त भाषणात अभिनंदन करताना डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा हा ऐतिहासिक क्षण! भारतीय स्टार्ट अप्ससाठी निर्णायक टप्पा! पहिलेवहिले खासगी रॉकेट विक्रम -एस अंतराळात पोहोचल्याने इस्रो साठी नवी सुरुवात.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात नवीन मैलाचा दगड गाठून इस्रोने आपल्या वैभवशाली अंतराळ सफरीत आणखी एक तुरा खोवला आहे. या प्रक्षेपणामुळे जगाच्या प्रमुख अंतराळ शक्तींमध्ये भारताने स्थान मिळवले आहे आणि अनेक महत्त्वाकांक्षी देश याची दखल घेऊन भारताच्या या क्षमतेचा फायदा घेतील, असे मंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी अवकाश क्षेत्र खासगी भागीदारांसाठी खुले केल्यानंतर हा मोठा मैलाचा दगड गाठला आहे, असे वर्णन त्यांनी केले.
विक्रम-एस हे सिंगल स्टेज इंधन असलेले रॉकेट असून विक्रम-1 या रॉकेटच्या पुढच्या वर्षीच्या नियोजित प्रक्षेपणाआधी स्कायरूट एरोस्पेसच्या प्रकल्पांतील बहुतांश प्रणाली आणि प्रक्रिया यांच्या तपासणीचे काम विक्रम-एस करेल अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिली. ते म्हणाले की हे रॉकेट जमिनीपासून 81.5 किलोमीटर उंचीवर जाते आणि त्यानंतर समुद्रात कोसळते. या प्रक्रियेचा एकूण कालावधी केवळ 300 सेकंद इतकाच आहे.
स्वतःच्या रॉकेट्सचे प्रक्षेपण करण्यासाठी इस्रोशी सामंजस्य करार करणारे स्कायरूट हे पहिले स्टार्ट-अप होते असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, खासगी रॉकेटचे हे देशातील पहिले प्रक्षेपण आहेच, पण त्याचबरोबर “प्रारंभ” असे नाव असलेली स्कायरूट एरोस्पेस या कंपनीची ही पहिलीच अंतराळ मोहीम आहे.
इस्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रारंभ मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली आहे, तर स्कायरूट एरोस्पेसने म्हटले आहे की, विक्रम-एस हे अवकाशात झेपावणारे भारताचे पहिले खासगी रॉकेट असल्याने त्याने इतिहास घडवला आहे. या रॉकेटने परदेशी ग्राहक कंपनीच्या एका पेलोडसह एकूण तीन पेलोड अवकाशात वाहून नेले.
प्रक्षेपणानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, इस्रोचे पहिले अध्यक्ष आणि भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे संस्थापक डॉ.विक्रम साराभाई यांनी त्यांच्या अत्यंत प्राथमिक शास्त्रीय प्रयोगशाळेत बसून भारतासाठी जे महत्वाकांक्षी स्वप्न पाहिले ते आज तेजस्वीपणे प्रत्यक्षात उतरले आहे.
इस्रोने राष्ट्रीय पातळीवर अर्थपूर्ण भूमिका बजावावी असा आग्रह डॉ.विक्रम साराभाई यांनी नेहमीच धरला याचे स्मरण करून देत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आविष्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतातील युवा प्रतिभेला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आठ वर्षांच्या कायर्काळात नवे धुमारे फुटले आणि त्यांच्यातील तेजोमय आवेश संपूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात साकारला. ते म्हणाले की भारताकडे नेहमीच प्रतिभेचा प्रचंड साठा आणि मोठी स्वप्ने पाहण्याची जिगीषा होती, पण शेवटी पंतप्रधान मोदी यांनी त्याला योग्य मार्ग दाखविला.
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की अवकाश क्षेत्रातील सुधारणांनी स्टार्ट-अप उद्योगांच्या अभिनव संशोधन क्षमता खुल्या केल्या आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी देशात केवळ दोन-तीन स्टार्ट-अप सुरु झाले होते आणि आता अत्यंत थोड्या काळात त्यांची संख्या 102 वर पोहोचली आहे. हे स्टार्ट-अप उद्योग आज अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन, नॅनो-उपग्रह, प्रक्षेपक वाहन,जमिनीवरील यंत्रणा, संशोधन, इत्यादी अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष क्षमता यांच्या बाबतीत जागतिक पातळीवर मान्यता मिळविण्यासाठी भारताला सक्षम केले आहे आणि आपले स्टार्ट-अप उद्योग त्याच दिशेने कार्य करत आहेत. भारत आज जगातील होतकरू देशांना क्षमता निर्मिती आणि नॅनो-उपग्रहासह इतर उपग्रह निर्मितीसाठी मदत करत असल्यामुळे आज संपूर्ण जग भारताकडे प्रेरणास्थान म्हणून पाहत आहे असे ते म्हणाले.
***
S.Patil/N.Mature/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877137)
Visitor Counter : 742