वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात अभिजात आशयसंपन्न कलाकृती सादर करण्यासाठी स्वयंनियमन अत्यंत गरजेचे असून, ते नसेल तर समाज सरकारच्या हस्तशक्षेपाची मागणी करू शकतो- पीयूष गोयल


भारतामध्ये संपूर्ण जगासाठी अभिजात कलाकृतीचा निर्माता बनण्याची क्षमता आहे: पीयूष गोयल

Posted On: 17 NOV 2022 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात  अभिजात, आशयसंपन्न   कलाकृती सादर करण्यासाठी कोणत्याना कोणत्या प्रकारे स्वयंनियमन अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी केले . ते आज नवी दिल्लीत 11व्या सीआयआय बिग पिक्चर परिषदेमध्‍ये   समारोपाच्या  सत्राला मार्गदर्शन  करत होते.

आशयाच्या सादरीकरणासाठी आधुनिक, लक्षवेधक आणि मनोरंजक पद्धतीचे  स्वागतच आहे; मात्र  भारतीय संस्कृती, भारतीय कुटुंब आणि एकंदरीतच भारतीय समाजाचे चित्रण करताना एक विशिष्ट दर्जा  आणि सभ्यतेच्या  पातळीचे भान राखणे महत्वाचे आहे, याकडे या  उद्योगातील धुरिणांनी  लक्ष द्यावे, असे गोयल म्हणाले. आपल्या कलाकृतींमधून  जो संदेश दिला जातो त्याचा भारतातील वास्तव जीवनाशी असलेला  संबंध तोडता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारतात चित्रीकरणाचे नियम सुलभ करण्याच्या उद्देशाने यंत्रणेत योग्य ते बदल करून एक खिडकी चौकटीतून परवानग्या मिळू शकतीलयासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

भारतामध्ये जगासाठी अभिजात आशयाचे  निर्माते बनण्याची क्षमता असून  भारतात तुलनेने अत्यंत किफायतशीर किमतीत आशयसंपन्न  कार्यक्रम तयार केले जाऊ शकतात असे पीयूष गोयल यांनी मनोरंजन उद्योग प्रतिनिधींना  सांगितले.

मनोरंजन क्षेत्राकडे रोजगार निर्मितीची अफाट क्षमता असून कौशल्याधिष्ठित आणि संबंधित शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु केले जावेत, असे आवाहन त्यांनी केले. या क्षेत्राच्या यशोगाथेचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना न्याय्य वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्यसेवा इत्यादी सुविधा मिळायला हव्यात आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात गोयल यांच्या हस्ते सीआयआयने प्रसारणाबाबत तयार केलेले दोन अहवाल प्रसिद्ध झाले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1876840) Visitor Counter : 158


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil , Telugu