पंतप्रधान कार्यालय

“आदिवासी गौरव दिनाच्या माध्यमातून देशाच्या आदिवासी वारशाबद्दल अभिमान व्यक्त करणे आणि आदिवासी समुदायाच्या विकासाचा संकल्प करणे हा ‘पंच प्रण’ अर्थात पाच निश्चयांच्या उर्जेचा भाग आहे”


“भगवान बिरसा मुंडा हे केवळ आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचे नायक नव्हते तर ते आपल्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उर्जेचे संवाहक देखील होते”

“भारताने आदिवासींच्या उदात्त वारशापासून शिकवण घेऊन भविष्य घडविले पाहिजे. मला खात्री आहे की आदिवासी गौरव दिन हे यासाठीची उत्तम संधी आणि माध्यम ठरेल”

Posted On: 15 NOV 2022 9:04AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भगवान बिरसा मुंडा तसेच कोट्यवधी आदिवासी वीरांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी आपला देश ‘पंच प्रण’ अर्थात पाच निर्धारांच्या उर्जेसह वाटचाल करत आहे. “आदिवासी गौरव दिनाच्या माध्यमातून देशाच्या आदिवासी वारशाबद्दल अभिमान व्यक्त करणे आणि आदिवासी समुदायाच्या विकासाचा संकल्प  करणे हा त्याच उर्जेचा भाग आहे,” असे ते म्हणाले.

आदिवासी गौरव दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशाला केले .

पंतप्रधानांनी भगवान बिरसा मुंडा आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा हे केवळ आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचे  नायक नव्हते तर ते आपल्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उर्जेचे वाहक देखील होते आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त, 15 नोव्हेंबर या दिवशी आपण आदिवासी परंपरांचा उत्सव साजरा करत आहोत.

पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समुदायाने दिलेल्या योगदानाचे तसेच  स्वातंत्र्य प्राप्तीसाठी घडलेल्या महत्वपूर्ण आदिवासी चळवळी तसेच लढ्यांचेही स्मरण केले. याप्रसंगी त्यांनी तिलक मांझी  यांच्या नेतृत्वाखालील दामिन संग्राम, बुधू भगत यांनी चालविलेली लारका चळवळ, सिंधू-कान्हू क्रांती, ताना भगत चळवळ, वेगडा भील चळवळ, नायकडा चळवळ, संत जोरीया परमेश्वर आणि रूपसिंग नायक, लीमडी दाहोदचा लढा, मानगडचे गोविंद गुरुजी आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या नेतृत्वाखालील राम्पा चळवळीचे स्मरण केले.

आदिवासी समुदायाच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी या समुदायाने केलेल्या प्रयत्नांची माहिती  दिली.देशाच्या विविध भागांमध्ये उभारण्यात येत असलेली आदिवासी संग्रहालये तसेच आदिवासी समुदायाला मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणाऱ्या जन-धन, गोबरर्धन , वन-धन, स्वयंसहाय्यता बचत गट, स्वच्छ भारत, पंतप्रधान आवास योजना, मातृत्व वंदना योजना, ग्रामीण सेवक योजना, मोबाईल फोन सेवेची जोडणी, एकलव्य विद्यालये, 90% वन उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चिती, सिकल सेल अॅनिमिया जागरूकताविषयक उपक्रम, आदिवासी संशोधन संस्था, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोफत उपलब्ध करून देणे तसेच इंद्रधनुष अभियान यांसारख्या सरकारी उपक्रमांची माहिती दिली.  

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आदिवासी समाजाचे धैर्य, सामाजिक  जीवन तसेच समावेशकता यांवर भर दिला. “भारताने आदिवासी समुदायाच्या उदात्त वारशापासून शिकवण घेऊन भविष्य घडविले पाहिजे. मला खात्री आहे की आदिवासी गौरव हे यासाठीची उत्तम संधी आणि माध्यम ठरेल,” असे पंतप्रधान मोदी समारोप करताना म्हणाले.

***

Sushama K/Sanjana/CYadav  

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1876030) Visitor Counter : 232