माहिती आणि प्रसारण मंत्रालय

"आपल्या कल्पना लोकांच्या रुचीनुसार नाही तर त्यांची अभिरुची सुधारण्यासाठी असाव्या"

Posted On: 14 NOV 2022 3:18PM by PIB Mumbai

मुंबई, 14 नोव्‍हेंबर 2022

 

त्रेपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अवघे सहा दिवस उरले आहेत. आता उत्साहाला उधाण येऊ लागले आहे आणि महोत्सवाचा रंग आपल्या अंतरंगावर चढू लागला आहे. अशात, आपण इफ्फीच्या इतिहासातील गतस्मृतींची पाने चाळत आपल्या रसिकतेला निखळ आनंद, खोली आणि व्यापक दृष्टिकोन का बरे देऊ नये? उगमाकडे पुन्हा परतुया, जेणेकरून आपण आपल्या मूळांशी जोडलेले राहू,  भूतकाळातील शहाणपण आपल्याला वर्तमान आणि भविष्याबद्दलची आपली दृष्टी समजून घेण्यास प्रेरणा देईल आणि आकार देईल, हो ना?

होय, आम्ही आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवांपैकी एकाच्या पहिल्या आवृत्तीचा गेल्या आठवड्यात येथे संक्षिप्त धांडोळा घेतला. आपण आज भूतकाळातील प्रवासात थोडे पुढे जाऊया, 1952 मधील पहिल्या आवृत्तीपासून ते 1961 मधील दुसरी आवृत्तीचा प्रवास. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे, दुसरा महोत्सव पहिल्या महोत्सवानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर, 27 ऑक्टोबर - 2 नोव्हेंबर 1961 दरम्यान नवी दिल्ली येथे, आयोजित करण्यात आला होता. 

 

#इफ्फी का?

तर, #इफ्फी का? तत्कालिक माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. बी. व्ही. केसकर यांचे इफ्फी सारख्या चित्रपट महोत्सवांच्या उद्दीष्टांबद्दल काय म्हणणे होते ते जाणून घेऊया.

"सहभागी देशांना कलात्मक आणि सांस्कृतिक मूल्यांचे आणि उच्च तांत्रिक दर्जाचे चित्रपट सादर करण्यासाठी एक मंच प्रदान करणे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचा उद्देश आहे. अशा सादरीकरणामुळे  चित्रपट उद्योगाच्या प्रगतीलाच मदत होत नाही तर सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नवनवीन कल्पनांच्या सृजनालाही वाव मिळतो. विविध सहभागी राष्ट्रांना आणि त्यांच्या चित्रपट उद्योगाला जवळ आणण्यात देखील मदत होते.”

नवी दिल्ली येथे 27 ऑक्टोबर 1961 रोजी दुसऱ्या इफ्फीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विविध देशांतील राष्ट्रीय चित्रपट निर्मात्या संघटनांनी सौंदर्य तसेच तांत्रिक उत्कृष्टतेच्या दृष्टिकोनातून दर्जेदार उत्पादन मूल्ये असणारे चांगले चित्रपट निवडण्यासाठी खूप कष्ट घेतले, याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.  

विविध देशांतील प्रतिनिधींचे स्वागत करत, “त्यांच्या भारत भेटीमुळे चित्रपटांच्या रूपाने सातत्याने अधिकाधिक सांस्कृतिक देवाणघेवाणीची नवीन प्रक्रिया सुरू होईल. इथे अधिक चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी, त्या देशांतील निर्मितीचा कल आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल,  अशी आशा केसकर यांनी व्यक्त केली. 

पहिल्या इफ्फीमुळे  कल्पना आणि कलात्मक मानकांची फलदायी देवाणघेवाण झाल्याचे स्मरण, माहीती आणि प्रसारण मंत्र्यांनी करुन दिली. 

"भारताने स्वातंत्र्यानंतर पहिला महोत्सव जानेवारी 1952 मध्ये आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात एकवीस देशांनी भाग घेतला. या महोत्सवामुळे विचार आणि सौंदर्यविषयक मानकांच्या अतिशय लाभदायी देवाणघेवाणीस मदत झाली हे महत्वाचे आणि आनंददायी होते. आपल्या देशातील चित्रपट निर्मितीवर याचा खूप उपयुक्त प्रभाव पडतो. तेव्हापासून अनेक भारतीय चित्रपट, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यापैकी अनेकांनी आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सन्मान मिळवला आहे.”

भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी दुसऱ्या इफ्फी महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात विचारांच्या परस्पर-सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व आणि त्यातून शिकण्याची आणि सुधारणेची क्षमता अधोरेखित केली होती.  

"भारताने, काही वर्षांपूर्वी या महोत्सवाच्या निमित्ताने, चित्रपट क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. मला माहिती मिळाली आहे की भारत,  जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. पडद्यावरील आमच्या काही ताऱ्यांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे, आमच्या काही चित्रपटांना जागतिक मान्यता मिळाली आहे. तरीही, आम्ही समाधानी आहोत असे आम्हाला वाटत नाही. आपल्याला खूप सुधारणा कराव्या लागतील. या महोत्सवाच्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्या लोकांना विचारांची देवाणघेवाण करता येईल आणि चित्रपट निर्मिती दर्जाबाबत खूपच पुढे असणाऱ्या दूरच्या देशांतून आलेल्या इतरांसोबतचे विचार जाणून घेता येतील.”

उपराष्ट्रपतींनी मानवतेसाठी योगदान देणाऱ्या बहुआयामी चित्रपटांच्या योगदानावर प्रकाश टाकला. 

“सामान्यत: चित्रपटाचा हेतू प्रेक्षकांचे मनोरंजन, प्रेक्षकांचे शिक्षण आणि त्यांचे उत्थान हा असतो.  माणसाची ही महत्त्वाची, बौद्धिक आणि आध्यात्मिक बाजू असते. या सर्व बाजूंची समाधानकारक पूर्तता झाली  तर उत्तम चित्रपट निर्माण होऊ शकतो."

उपराष्ट्रपतींनी चित्रपट निर्मात्यांना कलात्मक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यापेक्षाही फायद्याच्या मोहापासून सावध राहण्याचे आवाहन केले.  चित्रपटांचा विचार लोकांच्या रुचिनुसार नाही तर त्यांची अभिरुची सुधारण्यासाठी असायला हवा, असे परखड मत त्यांनी नोंदवले.

"सध्या कलात्मक उत्कृष्टतेपेक्षा नफेखोरीची प्रवृत्ती अधिक आहे, मला आशा आहे की आपले चित्रपट निर्माते त्या मोहाला बळी पडणार नाहीत. मला माहित आहे, आपल्याला नफाही पाहावा लागेल, त्यासाठी एक प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल. चित्रपट किती कमाई करू शकतो हे विचारात घेतले पाहिजे, तरीही आपली कल्पना लोकांच्या रुचीची पूर्तता करण्याची नाही तर त्यांची अभिरुची सुधारण्यासाठी असावी.

माझे असे मत आहे की आपले कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते खूप सक्षम, अत्यंत कुशल आहेत.  ते उत्स्फूर्त, साधे, यश डोक्यात गेलेले नाहीत, जगातील कोणत्याही चांगल्या कलाकारासारखे आहेत. कोणत्याही प्रकारची अभिरुची खालावण्यापासून आपण सावध राहणे आवश्यक आहे.  ही एक गोष्ट आहे ज्यापासून आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि मला वाटते की, आगामी काळात भारताला चित्रपट क्षेत्रात मोठे भविष्य असेल.

चित्रपट सृष्टीशी संबंधित असलेल्या सर्वांनी, मग ते दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते, अभिनेत्री असोत, त्यांनी असा निश्चय करणे आवश्यक आहे की ते त्यांचे ज्ञान, त्यांचे कौशल्य, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची कलात्मक क्षमता, स्वातंत्र्य, शांतता आणि सन्मान; न्यायाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापरणार नाहीत. केवळ काही विशिष्ट व्यक्तींच्या अशा कोणत्याही हेतूची पूर्तता करणार नाहीत, जे केवळ नफेखोरीच्या विवंचनेत मानवतेला भ्रष्ट करतात, मानवतेला अवनत करतात आणि त्यांची अभिरुची कमी करतात: हा एक धोका आहे जो आपण टाळला पाहिजे.  मला यात काही शंका नाही की जेव्हा आपण प्रत्यक्ष चित्रपट पाहू, तेव्हा त्यातून आपण आनंद मिळवू शकू आणि इतर देशांमध्ये कोणती उत्कृष्ट मानके साधली गेली आहेत हे आपल्याला कळू शकेल. या महोत्सवातून आपल्याला काही धडे शिकणे शक्य होईल." 

राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक एकता या दोन्हीसाठी चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

“हे लक्षात घेणे आनंदाची बाब आहे की जेव्हा राजकीय वातावरण निराशाजनक आहे, जेव्हा काळे ढग जमा होत आहेत, जेव्हा महान शक्ती एकमेकांवर आण्विक युद्धाच्या दिशेने ढकलल्याचा आरोप करत आहेत. अशा युद्धात आपण आकाश आणखी अंधारात लोटण्याचा, हवा विषारी करण्याचा आणि पृथ्वीला प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे मात्र जगातील महान देशांचे प्रतिनिधी कोणत्याही प्रकारच्या युद्धजन्य उपायांच्या उद्देशाने नाही तर परस्पर समंजसपणा वाढवण्याच्या उद्देशाने एकत्र येत आहेत. भय हा धोक्याचा सर्वात स्पष्ट स्त्रोत आहे आणि जर भीतीची जागा आत्मविश्वास आणि विश्वासाने घ्यायची असेल तर चित्रपटांमधे जागतिक समज आणि जागतिक शांततेसाठी आपण प्रभावी योगदान द्यायला हवे. आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक एकता या उद्देशाने चित्रपटांचा वापर केला जाऊ शकतो. या दोन्ही गोष्टी साध्य करता येऊ शकतात.”

उपराष्ट्रपतींनी महोत्सवातील प्रतिनिधींना वर्षभरासाठी दृष्य आणि संगीताची मेजवानी द्यावी, अशी इच्छा व्यक्त करून समारोप केला.

“हा चित्रपट महोत्सव खरोखर एक उत्सव असला पाहिजे, असा उत्सव, जो चित्रपटाच्या निर्मितीत गुंतलेल्या सर्व भिन्न कलांना एकत्र करण्यास सक्षम आहे. आपल्या डोळ्यांना अर्थात दृशांची आणि संगीताची वर्षभरासाठी मेजवानी देतो.. यात अनेक गोष्टी आहेत: नृत्य, नाटक, संवाद, संगीत, नाट्यरचना: या सर्व गोष्टी कोणत्याही उत्कृष्ट चित्रपटाच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक आहेत आणि मला यात शंका नाही की या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या लोकांना खूप फायदा होईल. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो."

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875777) Visitor Counter : 254