पंतप्रधान कार्यालय
बेंगलुरू इथल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी केलेले संबोधन
Posted On:
11 NOV 2022 10:27PM by PIB Mumbai
भारत माता की जय!
भारत माता की जय!
कर्नाटकदा समस्थ जनतगे,
नन्ना कोटि-कोटि नमस्कारगलु!
व्यासपीठावर विराजमान पूज्य स्वामी जी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत जी, लोकप्रिय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी, माजी मुख्यमंत्री श्रीमान येदियुरप्पा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू - भगिनींनो,
बेंगळुरूमध्ये एका विशेष दिवशी येण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. आज कर्नाटकच्या, देशाच्या 2 महान संतांची जयंती आहे. संत कनकदास जी यांनी आपल्या समाजाला मार्गदर्शन केले तर ओनके ओबव्वा जी यांनी आपला अभिमान, आपल्या संस्कृती रक्षणासाठी योगदान दिले. या दोन्ही महान विभुतींना मी पुन्हा एकदा नमन करतो.
मित्रहो,
आज या महान संतांप्रती आदरभाव व्यक्त करत बेंगळुरूचा, कर्नाटकचा विकास आणि वारसा दोन्ही आपण बळकट करत आहोत. आज कर्नाटकला पहिली मेड इन इंडिया वंदे भारत रेल्वे मिळाली आहे. ही गाडी चेन्नई, देशाची स्टार्ट अप्सची राजधानी बेंगळुरू आणि वारसा स्थळांचे शहर मैसूर यांना जोडते. कर्नाटकच्या लोकांना अयोध्या, प्रयाग राज आणि काशी यांचे दर्शन घडवणारी भारत गौरव काशी दर्शन रेल्वेचीही आज सुरुवात झाली आहे. आज केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलचेही उद्घाटन झाले आहे. सोशल मीडियावर नव्या विमानतळाची काही छायाचित्रे मी पोस्ट केली होती. आज तिथे गेल्यावर वाटले की नवे टर्मिनल, छायाचित्रात जितके सुंदर दिसते, त्यापेक्षाही जास्त भव्य आहे, आधुनिक आहे. बेंगळुरूच्या लोकांची ही खूप जुनी मागणी होती, ज्याची पूर्तता आता आमचे सरकार करत आहे.
मित्रहो,
नाडप्रभू केम्पेगौडाजी यांच्या 108 फूट पुतळ्याचे अनावरण आणि जलाभिषेक करण्याची संधीही मला मिळाली. नाडप्रभु केम्पेगौडा यांचा हा विशाल पुतळा भविष्यातले बेंगळुरू, भविष्यातल्या भारतासाठी अखंड, समर्पित भावनेने मेहनत करण्याची प्रेरणा देईल.
बंधू आणि भगिनींनो,
आज पूज्य स्वामीजीनी ज्या प्रकारे आशीर्वाद दिले, ज्या प्रकारे भावना व्यक्त केल्या, त्यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मित्रहो,
आज संपूर्ण जगात स्टार्ट अप्स ही भारताची ओळख झाली आहे. भारताची ही ओळख अधिक दृढ करण्यामध्ये मोठी भूमिका आपल्या बेंगळुरूची आहे. स्टार्ट अप म्हणजे केवळ एक कंपनी नव्हे तर स्टार्ट अप म्हणजे उत्साह. काही नवे करण्याची ओढ, काही वेगळा विचार करण्याची उमेद. स्टार्ट अप असतो एक विश्वास, देशासमोरच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा. म्हणूनच बेंगळूरू स्टार्ट अप या भावनेचे प्रतिनिधित्व करते. स्टार्ट अपची ही भावना आज जगात भारताला एका वेगळ्या स्थानावर नेणारी आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज या ठिकाणी जो कार्यक्रम होतो आहे, त्यातही बेंगळुरूच्या या युवा भावनेचे प्रतिबिंब आहे. आज सुरु झालेली वंदे भारत ही गाडी केवळ एक नवी रेल्वे गाडी नाही तर नव भारताची ही नवी ओळख आहे. 21 व्या शतकात भारताची रेल्वे कशी असेल, याची ही झलक आहे. थांबत-रखडत चालण्याचे दिवस भारताने आता मागे टाकले आहेत. भारताला आता वेगाने धावायचे आहे आणि त्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
मित्रहो,
येत्या 8-10 वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याचे लक्ष्य निर्धारित करून आम्ही वाटचाल करत आहोत. 400 पेक्षा जास्त वंदे भारत गाड्या, विस्टा डोम डबे ही भारतीय रेल्वेची नवी ओळख ठरणार आहेत. मालगाड्यांसाठी समर्पित मालवाहतूक कॉरीडॉर, वाहतुकीचा वेगही वाढवेल आणि वेळेची बचतही करेल. ब्रॉड गेजचे झपाट्याने होणारे काम नवनव्या क्षेत्रांना रेल्वेच्या नकाशावर आणत आहे. याशिवाय आज देश आपली रेल्वे स्थानकेही आधुनिक करत आहे. आज आपण बेंगळूरूच्या ‘सर एम विश्वेश्वरैया जी’ रेल्वे स्थानकावर गेलो, तर आपल्याला वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते. अशाच प्रकारे देशातली महत्वाची रेल्वे स्थानके आधुनिक बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याच विचारातून कर्नाटक मध्येही बेंगळूरू छावणी, यशवंतपूर रेल्वे स्थानकांचाही विकास करण्यात येत आहे.
मित्रहो,
विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या शहरांमध्ये कनेक्टीव्हिटीचीही मोठी भूमिका असेल. देशात हवाई मारागाने कनेक्टीव्हिटीचा जास्तीत जास्त विस्तार व्हावा, आपल्या विमानतळांचा विस्तार व्हावा ही आज काळाची गरज आहे. बेंगळूरू विमानतळाचे हे नवे टर्मिनल, प्रवाश्यांसाठी नव्या सुविधा घेऊन येईल. आज भारत जगातल्या वेगाने वाढणाऱ्या हवाई प्रवास बाजारपेठेपैकी एक आहे. ज्या प्रकारे देश आगेकूच करत आहे, त्याच प्रमाणात विमानतळावर प्रवाश्यांची संख्याही वाढत आहे. म्हणूनच आमचे सरकार देशात नवे विमानतळ उभारत आहेत. 2014 च्या पूर्वी देशात सुमारे 70 विमानतळ होते. आता ही संख्या 140 पेक्षा जास्त म्हणजे दुप्पट झाली आहे. विमानतळांची ही वाढती संख्या आपल्या शहरांच्या व्यापार संधी वाढवत आहे, युवकांसाठी नव्या संधीही निर्माण करत आहे.
मित्रहो,
आज संपूर्ण जगभरात भारतात गुंतवणुकीविषयी जो अभूतपूर्व विश्वास निर्माण झाला आहे त्याचा मोठा लाभ कर्नाटकलाही होत आहे. तुम्ही कल्पना करा, गेल्या 3 वर्षात संपूर्ण जगाला कोविडचे परिणाम सोसावे लागत असताना कर्नाटकमध्ये सुमारे 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. गेल्या वर्षी थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये कर्नाटक, देशात अग्रेसर राहिले आहे. ही जी गुंतवणूक होते आहे, ती केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापुरतीच मर्यादित नाहीत. देशात एअरक्राफ्ट आणि स्पेसक्राफ्ट उद्योगात 25 टक्के वाटा आपल्या कर्नाटकचा आहे. देशाच्या सैन्यदलांसाठी ज्या विमानांची आणि हेलिकॉप्टरची निर्मिती आपण करत आहोत, त्यापैकी सुमारे 70 टक्के इथे तयार होतात. देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतही कर्नाटक खूपच पुढे आहे. आज फॉर्च्यून 500 कंपन्यांपैकी 400 पेक्षा जास्त कंपन्या कर्नाटकमध्ये काम करत आहेत. ही यादी सातत्याने वाढत आहे. हे सर्व होते आहे कारण कर्नाटक दुहेरी इंजिनची ताकद घेऊन चालत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज विषय प्रशासनाचा असो किंवा भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्मितीचा, भारत एका वेगळ्याच स्तरावर काम करत आहे. भारताच्या डिजिटल पेमेंट भीम युपीआय विषयी आज जग ऐकते तेव्हा आश्चर्यचकित होते. 8 वर्षापूर्वी ही कल्पना तरी करणे शक्य होते का ? मेड इन इंडिया 5 जी तंत्रज्ञान, विचार तरी केला जाऊ शकत होता का ? या सगळ्यात बंगळुरूमधील युवकांची, इथल्या व्यावसायिकांची खूप मोठी भूमिका आहे. 2014 पूर्वीच्या भारतात या गोष्टी कल्पनेपलीकडच्या होत्या. याचे कारण तेव्हा अस्तित्वात असलेली सरकारे जुन्या विचारसरणीची होती. पूर्वीची सरकारे वेगाला चैन आणि व्याप्तीला जोखीम मानत. ही विचारसरणी आम्ही बदलली आहे. आम्ही वेगाला भारताची आकांक्षा मानतो आणि व्याप्ती ही भारताची ताकद मानतो. म्हणूनच, पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्या अंतर्गत आज भारत, देशभरात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. भूतकाळात समन्वयाचा अभाव, ही पायाभूत सुविधांच्या उभारणीतील सर्वात मोठी समस्या होती, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. जितके जास्त विभाग, जितक्या जास्त संस्थांचा सह्भाग तितकाच अधिक विलंब उभारणीला होत होता. त्यामुळे सर्वांना एका समान मंचावर आणण्याचे आम्ही ठरवले. आज, पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याअंतर्गत, 1500 पेक्षा जास्त स्तरांवरील डेटा विविध संस्थांना थेट उपलब्ध होत आहे. आज केंद्र आणि राज्य सरकारची डझनभर मंत्रालये, डझनभर विभाग या मंचाशी जोडले गेले आहेत. आज, राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन अंतर्गत देशातील पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी सुमारे 110 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य आपण ठेवले आहे. देशातील वाहतुकीची प्रत्येक साधने एकमेकांशी जोडली जावीत यासाठी देशाचा भर, संपूर्ण शक्ती, बहुविध पायाभूत सुविधा निर्मितीवर आहे. काही काळापूर्वीच, देशात राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. या धोरणामुळे देशातील वाहतुकीचा खर्च कमी होण्यास आणि वाहतूकीत नाविन्यपूर्ण बदल होण्यास मदत होईल.
मित्रहो,
भारताला विकसित करण्यासाठी भौतिक पायाभूत सुविधांसोबतच सामाजिक पायाभूत सुविधाही मजबूत होणे तितकेच आवश्यक आहे. कर्नाटकचे दुहेरी इंजिन सरकार, सामाजिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याकडे तितकेच लक्ष देत आहे, याचा मला आनंद वाटतो. गेल्या आठ वर्षांत देशातील गरीबांसाठी साडेतीन कोटी घरे बांधण्यात आली आहेत. इथे कर्नाटकातही गरीबांसाठी 8 लाखांपेक्षा जास्त पक्की घरे मंजूर झाली आहेत. 'जल जीवन मिशन' अंतर्गत, केवळ तीन वर्षांत देशातील 7 कोटींपेक्षा जास्त घरांना पाईपद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्यांदाच, कर्नाटकातील 30 लाखाहून अधिक ग्रामीण घरांमध्ये पाईपद्वारे पाणी पोहोचले आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील 4 कोटी गरीब रुग्णांना रुग्णालयात मोफत उपचार मिळाले आहेत. कर्नाटकातील 30 लाखांपेक्षा जास्त गरीब रुग्णांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. आपल्या माता, भगिनी, आपल्या मुली या सुविधांच्या सर्वात मोठ्या लाभार्थी असल्याचा मला आनंद होत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज देशातले छोटे शेतकरी असोत, छोटे व्यापारी असोत, मच्छीमार असोत, फेरीवाले, हातगाडीवाले असोत, असे कोट्यवधी लोक प्रथमच देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. 'पीएम किसान सन्मान निधी' अंतर्गत देशातील 10 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे सव्वा दोन लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. कर्नाटकातील 55 लाखांहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना सुमारे 11 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. पीएम स्वानिधी अंतर्गत, देशातील 40 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. याचा फायदा कर्नाटकातील 2 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना झाला आहे.
मित्रहो,
या वर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या माझ्या भाषणात मी आपल्या देशाच्या समृद्ध वारशासंदर्भात गौरवोद्गार काढले होते. आपला हा वारसा सांस्कृतिकही आहे आणि आध्यात्मिकही आहे. आज भारत गौरव रेल्वे देशातील श्रद्धा आणि अध्यात्माच्या ठिकाणांना जोडत आहे, तसेच 'एक भारत-श्रेष्ठ भारत'ची संकल्पना मजबूत करत आहे. यावर्षी आतापर्यंत देशातील विविध भागांसाठी या गाडीच्या 9 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. शिर्डी मंदिर असो, श्री रामायण यात्रा असो, दिव्य काशी यात्रा असो, अशा सर्वच गाड्यांचा प्रवाशांना खूप आनंददायी अनुभव आला. आज कर्नाटक ते काशी, अयोध्या, प्रयागराज असा प्रवास सुरु झाला आहे. यामुळे कर्नाटकातील लोकांना काशी अयोध्येचे दर्शन करण्यास मदत होणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
समाजाला भगवत्-भक्ती आणि सामाजिक-शक्तीने कसे जोडता येईल, याची प्रेरणाही आपल्याला संत कनकदासजींकडून मिळते. एकीकडे त्यांनी कृष्णभक्तीचा मार्ग निवडला, तर दुसरीकडे 'कुल-कुल-कुल वेंदु होडेदाड़दिरी' म्हणत जातीपातीवर आधारित भेदभाव मिटविण्याचा संदेश दिला. आज जगभर भरड धान्याच्या पौष्टिक मूल्यांची चर्चा होत आहे. संत कनकदासजींनी त्या काळातच भरड धान्याचे महत्त्व पटवून दिले होते. राम धान्य चरिते या त्यांच्या रचनेत त्यांनी याचे वर्णन केले आहे. कर्नाटकातील सर्वाधिक पसंतीच्या भरडधान्याचे म्हणजेच नाचणीचे उदाहरण देत त्यांनी सामाजिक समानतेचा संदेश दिला होता.
बंधू आणि भगिनींनो,
आज आमचा प्रयत्न आहे की बंगळुरू शहराचा विकास हा नाडप्रभू केम्पेगौडाजी यांच्या कल्पनेप्रमाणे व्हावा. या शहराचा स्थापत्य आराखडा हा केम्पेगौडा जी यांचे येथील लोकांसाठी मोठे योगदान आहे. त्यांनी या स्थापत्य आराखड्यात ज्या छोट्या-छोट्या तपशिलाची काळजी घेतली आहे ती अद्भुत, अद्वितीय आहे. अनेक शतकांपूर्वी त्यांनी बंगळुरूच्या जनतेसाठी वाणिज्य, सांस्कृतिक आणि सोयी-सुविधाची योजना तयार केली होती. बंगळुरूच्या जनतेला आजही त्यांच्या दूरदृष्टीचा लाभ मिळत आहे. आज उद्योग-व्यवसायाचे स्वरूप बदलले असेल, पण 'पेटे' अजूनही बंगळुरूची व्यावसायिक जीवनरेखा आहे. बंगळुरूची संस्कृती समृद्ध करण्यातही नादप्रभू केम्पेगौडाजी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मग ते प्रसिद्ध गवी-गंगाधरेश्वर मंदिर असो वा बसवनगुडी परिसरातील मंदिर. याद्वारे केम्पेगौडाजी यांनी बंगळुरूचे सांस्कृतिक चैतन्य कायमस्वरूपी जिवंत ठेवले. या शहराच्या अशा अतुलनीय स्थापत्याबद्दल बंगळुरू शहरातील नागरिक केम्पेगौडाजींचे नेहमीच ऋणी राहतील.
मित्रहो,
बंगळुरू हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. आपल्या वारशाचे जतन करत, आधुनिक पायाभूत सुविधांनी समृद्ध करायचे आहे. हे केवळ सर्वांच्या प्रयत्नानेच शक्य आहे. पुन्हा एकदा मी नवीन प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. ज्या पूज्य संतांनी येऊन आशीर्वाद दिला, त्यांच्याप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आनंद आणि उत्साहात उपस्थित राहून कर्नाटकातील तरुण, माता, भगिनी, कर्नाटकातील शेतकरी आम्हाला आशीर्वाद देत आहेत. मी तुम्हां सर्वांचे मनापासून आभार मानतो.
धन्यवाद !
***
M.Pange/N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1875422)
Visitor Counter : 223
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam