संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदलाच्या भर समुद्रातील कार्यान्वयनाचे महाराष्ट्रातील विधीमंडळ सदस्य झाले साक्षीदार

Posted On: 11 NOV 2022 10:47AM by PIB Mumbai


मुंबईत  10 नोव्हेंबर 22 रोजी महाराष्ट्रातील खासदार , विधानसभा आणि  विधानपरिषदेचे  सदस्य आमदार  आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी  आयोजित करण्यात आलेल्या '‘ डे अॅट सी अर्थात एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमाअंतर्गत '  पश्चिम नौदल कमांडने आपल्या कार्यान्वयन क्षमतेची प्रात्यक्षिके सादर केली. समाजातील सर्व घटकांमध्ये विशेषतः किनारपट्टीवरच्या  राज्यांमध्ये  समुद्राविषयी अधिकाधिक  जाणीव  निर्माण करण्यासाठीच्या   माननीय पंतप्रधानांनी मांडलेल्या  दृष्टीकोनाला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

25 आमदारांसह 125 पाहुणे आणि अधिकाऱ्यांनी  पश्चिम ताफ्यातील ,आयएनएस चेन्नई,आयएनएस  विशाखापट्टणम आणि आयएनएस तेग  या आघाडीच्या युद्धनौकांवरून   नौसेनेच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. भारतीय नौदलाचे दैनंदिन नौदल कार्यान्वयन आणि   युद्धनौकांवरील  जीवन पाहण्याची चांगली संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहुण्यांना मिळाली.  

जलद हल्ला  युद्धनौकेद्वारे सिम्युलेटेड हल्ला, हवाई सामर्थ्याचे  प्रात्यक्षिक, चेतक हेलिकॉप्टरद्वारे शोध आणि बचाव कार्य , सी किंग हेलिकॉप्टरद्वारे सोनार डंक ऑपरेशन , एका युद्धनौकेवरुन दुसऱ्या युद्धनौकेवर जवानांचे किंवा युद्धसाहित्याचे स्थलांतर यांसारखी सर्व  प्रात्यक्षिके या दिवसाची ठळक वैशिष्ट्ये ठरली. समुद्रातील नौदलाच्या सर्व पैलूंबद्दल मान्यवरांना माहिती देण्यासाठी पाणबुडीचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते.
 
 विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि मंत्री  चंद्रकांत  पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी  युद्धनौकेवरून या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित  सर्व मान्यवरांशी संवाद साधला आणि  सागरी क्षेत्रात देशाला भेडसावणाऱ्या धोक्यांसंदर्भात  आणि आव्हानांवर मात  करण्यावर भर देऊन भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या मोहिमांची  माहिती त्यांना दिली.राष्ट्रीय सुरक्षा आणि देश  उभारणीत नौदलाची महत्त्वाची भूमिका  तसेच  समुद्रातील खडतर जीवन  आणि आव्हाने याबद्दल विधीमंडळ सदस्य  आणि सरकारी अधिकार्‍यांना अवगत करणे हा ‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमाचा उद्देश होता. 

***

Jaydevi PS/SBC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875107) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu