पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते हवामान बदल विषयक  कॉप 27 मधील भारतीय पॅव्हेलियनचे उदघाटन


लाईफ (LiFE)- पर्यावरणासाठी जीवनशैली,ही भारतीय पॅव्हेलियनची आहे संकल्पना

भारत हा समस्येचा  नव्हे तर समस्या निराकरणाचा भाग,: भूपेंद्र यादव यांचे कॉप 27 मधे प्रतिपादन

Posted On: 06 NOV 2022 9:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज इजिप्तमधील शर्म अल-शेख येथील यूएनएफसीसीसी- कॉप 27 (UNFCCC -COP 27) मधे सहभागी होणाऱ्या विविध देशांच्या  27 व्या अधिवेशनात इंडिया पॅव्हेलियनचे उदघाटन केले. कॉप 27 ही परिषद येत्या 6-18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार  आहे.

सर्व देशांतील प्रतिनिधींचे भारतीय पॅव्हेलियनमध्ये स्वागत करताना यादव म्हणाले की,भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलाच्या जटील समस्येवर एक सुलभ उपाय सुचविला आहे. हवामानबदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी  कृती तळागाळापासून, वैयक्तिक स्तरापासून सुरू होते यावर भारताचा विश्वास आहे,म्हणूनच लाईफ (LiFE)- पर्यावरणासाठी जीवनशैली,या संकल्पनेवर आधारीत भारतीय पॅव्हेलियनची रचना केली आहे,असे यादव म्हणाले.यावेळी यादव यांनी सकारात्मक हवामान बदल उपायांसाठी काम करणाऱ्या भारतातील कॉप यंग स्कॉलर्सचाही सत्कार केला.

"मला विश्वास आहे की परिषदेच्या संपूर्ण कालावधीत, भारतीय पॅव्हेलियन उपस्थित प्रतिनिधींना याचे स्मरण करून देत राहील की निसर्गाशी निगडीत साधी जीवनशैली आणि वैयक्तिक सवयी या आपल्या पृथ्वी मातेचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री यादव म्हणाले.

हवामान बदलाच्या दुष्परीणामाना तोंड देण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यासंदर्भातल्या चर्चेतून ठोस प्रगती होईल अशी अपेक्षा भारत करत आहे. आम्ही नवीन तंत्रज्ञानाशी परिचय आणि तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करण्यासाठी नवनवीन सहयोगांची देखील अपेक्षा करत आहोत,” असेही यादव पुढे म्हणाले.

मिशन लाईफ ( LiFE) ही मोहीम आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी जन शक्ती  जोडत आहे आणि त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करण्यास शिकवत आहे.मिशन लाईफ हवामान बदलाविरुद्धचा लढा लोकशाही बनवते,ज्यामध्ये प्रत्येकजण यथाशक्ती योगदान देऊ शकतो.मिशन लाइफचा असा विश्वास आहे, की छोट्या  प्रयत्नांचा परीणाम देखील भव्य होऊ शकतो,”असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात.

शर्म अल-शेख, इजिप्त येथील UNFCCC च्या COP 27 मधील भारत पॅव्हेलियन.

 

LiFE @ इंडिया पॅव्हेलियन, कॉप 27 मध्ये

भारत कॉप -27मध्ये लाईफ-, (LiFE- Lifestyle for Environment) पर्यावरणासाठी जीवनशैली या संकल्पनेवर आधारीत भारताचे पॅव्हेलियन आहे.विविध प्रकारची दृकश्राव्य सादरीकरणे (ऑडिओ-व्हिज्युअल्स), लोगो, थ्री डी मॉडेल्स,मंचसजावट, सुशोभित वातावरण आणि त्याला जोडून सादर होणारे उपक्रम याद्वारे लाईफचा संदेश देण्यासाठी या पॅव्हेलियनची विशिष्ट रचना करण्यात आली आहे.

शतकानुशतके, भारतीय संस्कृतीने शाश्वत जीवनशैलीचा अंगिकार आणि नेतृत्व केलेले आहे, हा मार्गदर्शक विचार मंडपाच्या रचनेतून देण्यात आला आहे.भारतीय संस्कृतीमध्ये  पर्यावरणस्नेही सवयी अंतर्भूत  आहेत.दैनंदिन जीवनात नैसर्गिक पर्यावरणाबाबत आदर दर्शविणाऱ्या अनेक पद्धती रुजलेल्या आहेत. हवामान बदलाविरुद्धच्या आपल्या लढ्यात त्या बहुमोल ठरू शकतात.

हजार वर्षांपासून पिढ्यांनपिढ्या दिल्या  गेलेल्या शाश्वततेवरील या सखोल ज्ञानामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला LiFE हा मंत्र दिला आहे - ज्याचे उद्दिष्ट पृथ्वीच्या आरोग्यावर आणि कल्याणावर शाश्वत स्वरुपाचा महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणे हा आहे.लाइफ अभियान हे जागतिक हवामान संकट हाताळण्यासाठी भारताने दिलेले योगदान आहे.जे आधुनिक जगात शाश्वत जीवनशैली स्वीकारतील त्यांचे जीवन लाइफ मोहीमेद्वारे 'प्रो-प्लॅनेट पीपल' मध्ये बदलण्याचा हा एक उत्कृष्ट प्रयत्न आहे.  

 

LiFE

 

Pavilion

From The Past, For The Future

 

पॅव्हेलियन लोगोच्या संदर्भात सांगायचे तर, हरित पृथ्वी दर्शविणाऱ्या हिरव्या  रंगाची लक्षवेधी छटा वापरण्यात आली आहे. परिघावरील पान निसर्गाचे प्रतिनिधित्व करते आणि भारत सरकारच्या विविध उपक्रमांद्वारे निसर्गाशी समतोल आणि सुसंवाद कसा साधला जाऊ शकतो याचे प्रतीक दर्शविते. लोगोचा मध्य भाग सूर्यासह झाडे, पर्वत, पाणी आणि जैवविविधता असलेल्या संतुलित निसर्गाचे प्रतिनिधित्व करतो. या लोगोवरील घोषवाक्य हे जीवनाचे सार सांगणाऱ्या “सर्वे भवन्तु सुखिना” (प्रत्येकजण सुखी होवो) या मुख्य संदेशातून प्रेरित आहे.

भूपेंद्र यादव यांनी कॉप 27 परिषदेच्या उद्घाटनालाही हजेरी लावली, याच परिषदेमध्ये इजिप्तने ब्रिटन कडून या कॉप परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

मिशन लाइफ बाबतची माहिती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2021 मध्ये, ग्लासगो येथील कॉप 26 (COP 26) परिषदेमध्ये जगाला LiFE चा मंत्र दिला आणि तेव्हापासून या चळवळीला जागतिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. भारत,या मिशन लाइफ मोहिमेकडे एक जागतिक जनचळवळ म्हणून बघतो आहे, जी हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील वैयक्तिक आणि सामूहिक कृतीला बळकटी द्यायला प्रोत्साहित करते. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा बेसुमार वापर, जाणीवपूर्वक आणि सुयोग्य वापराकडे वळण्यास प्रोत्साहन देऊन मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील  संतुलनाचे पुनरुत्थान करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

वर्ष 2022 ते वर्ष 2027 या कालावधीत, किमान एक अब्ज भारतीय आणि जगभरातल्या नागरिकांना पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृती करण्यासाठी एकत्रित करण्याच्या उद्देशाने मिशन LiFE ची रचना करण्यात आली आहे.  भारतामध्ये या मोहिमेच्या माध्यमातून वर्ष 2028 पर्यंत भारता मधल्या एकूण खेड्यांपैकी किमान 80% भाग आणि  स्थानिक स्वराज्य संस्था पर्यावरणपूरक बनण्याचे उद्दिष्ट आहे.

 

अधिकचे संदर्भ:

मिशन लाइफ संबंधी दस्तऐवज येथे वाचा

 

अधिक माहितीसाठी:

आमच्याशी येथे संपर्क साधा: envforestpib[at]gmail[dot]com

***

N.Chitale/S.Patgaonkar/V.Yadav/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1874158) Visitor Counter : 607