पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जम्मू - काश्मीर येथील रोजगार मेळाव्याला केले संबोधित


"आता जुनी आव्हाने मागे टाकत नवीन शक्यतांचा पुरेपूर लाभ घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे"

" वेगवान विकासासाठी, आपल्याला नवे विचार आणि नवा दृष्टीकोन बाळगत कार्य करावे लागेल"

"पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि वाढत्या दळणवळण सुविधांमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे"

" समाजातले सर्व घटक आणि नागरिकांपर्यंत विकासाचा समान लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध "

"जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना भ्रष्टाचाराचा तिरस्कार, मला त्यांच्या वेदना नेहमीच जाणवतात"

“जम्मू आणि काश्मीर प्रत्येक भारतीयाची शान आहे. आपण सर्वांनी मिळून जम्मू-काश्मीरला नव्या शिखरांवर घेऊन जायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू -काश्मीर येथे झालेल्या रोजगार मेळाव्याला दृकश्राव्य माध्यमाद्वारे संबोधित केले.

Posted On: 30 OCT 2022 10:32AM by PIB Mumbai

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी आजचा दिवस जम्मू आणि काश्मीरमधील तेजस्वी युवा वर्गासाठी महत्त्वाचा दिवस म्हणून अधोरेखित केला आहे.जम्मू आणि काश्मीरमधील 20 वेगवेगळ्या ठिकाणी सरकारमध्ये काम करण्यासाठी नियुक्ती पत्र मिळालेल्या तीन हजार तरुणांचे त्यांनी अभिनंदन केले.या तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन, जलशक्ती, शिक्षण-संस्कृती अशा विविध विभागांमध्ये सेवा करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काही दिवसांत विविध विभागांमधील 700 हून अधिक नियुक्ती पत्रे देण्याची तयारी जोरात सुरू असल्याचे पंतप्रधानांनी पुढे नमूद केले.

21 व्या शतकातील जम्मू - काश्मीरच्या इतिहासातील या दशकाच्या महत्तेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले,“आता जुनी आव्हाने मागे टाकण्याची आणि नवीन शक्यतांचा पुरेपूर लाभ घेण्याची वेळ आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील तरुण त्यांच्या राज्याच्या आणि लोकांच्या विकासासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत,यांचा मला आनंद आहे. आमचे जम्मू आणि काश्मीरमधील तरुणच विकासाची नवीन गाथा लिहिणार आहेत आणि ते  राज्यातील रोजगार मेळाव्याचे  आयोजन वैशिष्ट्यपूर्ण ठरवतील ,असा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.

नित्यनूतन, पारदर्शी आणि संवेदनशील प्रशासनाद्वारे होत असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या निरंतर विकासावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले,"विकासाच्या वेगवान गतीसाठी,आपल्याला नवीन दृष्टिकोन,नवीन विचारांसह कार्य करावे लागेल." 2019 पासून सुमारे तीस हजार सरकारी पदांसाठी भरती करण्यात आली असून, त्यापैकी वीस हजार नोकऱ्या गेल्या दीड वर्षात देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि राज्य प्रशासनाच्या कार्याची प्रशंसा केली. “योग्यतेद्वारे रोजगार’ हा मंत्र राज्यातील तरुणाईमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे,” असे मोदी यांनी यावेळी सांगितले. 

रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या 8वर्षात उचललेल्या पावलांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि त्याचाच भाग म्हणून येत्या 22 ऑक्टोबरपासून देशाच्या विविध भागात ‘रोजगार मेळा’ आयोजित करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पुढील काही महिन्यांत केंद्र सरकारकडून 10 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रे दिली जातील,अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.”रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारने राज्यातील व्यवसाय वातावरणाची व्याप्ती वाढवली असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान पुढे म्हणाले की, नवीन औद्योगिक धोरण आणि व्यवसाय सुधारणा कृती आराखड्याने व्यवसाय सुलभतेचा मार्ग मोकळा केला आहे ज्यामुळे येथे गुंतवणुकीला जबरदस्त चालना मिळाली आहे. “विकासाशी संबंधित प्रकल्पांवर ज्या गतीने काम केले जात आहे त्यामुळे येथील संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कायापालट होईल”, असे पंतप्रधानांनी सांगितले. काश्मीरला रेल्वेपासून ते आंतरराष्ट्रीय उड्डाणांपर्यंतची कनेक्टिव्हिटी वाढवणाऱ्या प्रकल्पांची त्यांनी उदाहरणे दिली. श्रीनगर ते शारजाह अशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे आधीच सुरू झाली आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, या वाढलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे येथील शेतकर्‍यांनाही मोठा फायदा झाला आहे कारण आता जम्मू आणि काश्मीरमधील सफरचंदाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन राज्याबाहेर पाठवणे सोपे झाले आहे. ड्रोनच्या माध्यमातून वाहतुकीला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले की, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. “कोणताही भेदभाव न करता सरकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न आहे”, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. विकासाचे समान लाभ सर्व घटक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून 2 नवीन एम्स, 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालये, 2 राज्य कर्करोग संस्था आणि 15 परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालये सुरू केल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.

जम्मू आणि काश्मीरमधील लोकांनी नेहमीच पारदर्शकतेवर कसा भर दिला आहे आणि त्याचे कौतुक केले आहे यावर बोलताना पंतप्रधानांनी सरकारी सेवेत येणाऱ्या तरुणांना याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी आठवण करून दिली, “जेव्हा मी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना  आधी भेटायचो, तेव्हा मला त्यांच्या वेदना जाणवल्या. व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे ते दुखणे होते. जम्मू-काश्मीरमधील लोक भ्रष्टाचाराचा तिरस्कार करतात. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रशंसा केली.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, आज ज्या तरुणांना नियुक्ती पत्र मिळत आहे ते पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने आपली जबाबदारी पार पाडतील, असा मला विशवास आहे. “जम्मू आणि काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. आपल्याला सर्वांना मिळून जम्मू-काश्मीरला नव्या शिखरावर घेऊन जायचे आहे. वर्ष 2047 च्या विकसित भारताचे मोठे उद्दिष्टही आपल्याकडे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला दृढ निश्चयाने राष्ट्र उभारणीत सहभागी व्हावे लागेल”, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

***

NILIMA/ SAMPADAP/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1871981) Visitor Counter : 191