वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वाणिज्य मंत्र्यांनी व्यापारी समुदायाला भारतात बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे केले आवाहन


जगातले विकसित देश आता भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यास इच्छुक आहेत: पीयूष गोयल

नवभारतामध्ये सामाजिक भेदभाव आणि फुटीरतावादी प्रवृत्तींना स्थान नाही: पीयूष गोयल

Posted On: 29 OCT 2022 10:10AM by PIB Mumbai

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील व्यापारी समुदायाला भारतात बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. हैदराबादमध्ये अखिल भारतीय वैश्य महासंघला ते संबोधित करत होते.

भारतात उद्योग आणि निर्मितीला चालना देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की यामुळे रोजगार वाढण्यास आणि आपल्या नागरिकांच्या जीवनात समृद्धी आणण्यास मदत होईल. प्रवासी आणि पर्यटकांना त्यांच्या प्रवासाच्या एकूण खर्चापैकी किमान 5 टक्के स्थानिक उत्पादनांवर खर्च करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला दुजोरा देत ते म्हणाले की आपले प्रतिभावान कारागीर, हस्तशिल्पकार आणि उद्योजक मदत आणि प्रोत्साहन मिळण्यास पात्र आहेत.

गेल्या 30 वर्षांत भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन दर (जीडीपी) 11.8 पटीने वाढला याकडे गोयल यांनी लक्ष वेधले. त्यांनी आठवण करून दिली की एक काळ असा होता की जेव्हा लोकसंख्येचा एक मोठा भाग अन्न, वस्त्र आणि निवारा सारख्या जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यावर भर देत होता. सरकारने रचनात्मक सुधारणांवर व्यापक लक्ष केंद्रित केल्यामुळे लोकांची जीवनावश्यक गरजांसाठी सातत्याने झगडण्यापासून सुटका झाली आहे असे ते म्हणाले.

ते म्हणाले की सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत अन्नधान्य तसेच प्रति व्यक्ती प्रति महिना अतिरिक्त 5 किलो अन्नधान्याचा पुरवठा करून सुमारे 80 कोटी नागरिकांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली आहे.

आपली लोकसंख्या, विशेषत: आपल्या युवकांना वृद्धी आणि विकासाला चालना देणारे उपक्रम हाती घेता येतील आणि त्यातून आपल्या मोठ्या युवा लोकसंख्येचा लाभ मिळू शकेल हे सुनिश्चित करण्याचा पाया रचणारे हे उपक्रम आहेत असे त्यांनी नमूद केले. “आपले युवक आता गरजांसाठीच्या संघर्षांतून मुक्त झाले आहेत आणि खूप महत्त्वाकांक्षी आहेत . नवोन्मेषक व उद्योजक बनण्याची आणि विकासाला चालना देण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे "असे ते म्हणाले.

महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या विविध पैलूंबाबत शिक्षित करण्यासाठी अधिकाधिक जागरूकता कार्यक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले जेणेकरून त्यांचे संरक्षण आणि सशक्तीकरण होईल.

भारत एक विकसित राष्ट्र, एक विश्वगुरू बनण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलण्यास सज्ज आहे यावर त्यांनी भर दिला. “भारत हे आज अमाप संधी असलेले जगातील एकमेव ठिकाण आहे. जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असे ते पुढे म्हणाले. विकसित देश आता भारतासोबत मुक्त व्यापार करार करू इच्छित आहेत असे सांगून ते म्हणाले की जगातील सर्वात वेगवान मुक्त व्यापार करार भारत आणि युएई मध्ये अवघ्या 88 दिवसात पार पडला . आखात सहकार्य परिषदेचे -जीसीसीचे उर्वरित सदस्य देश देखील भारतासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी पुढे येत आहेत असे गोयल म्हणाले.

सामाजिक भेदभाव संपुष्टात आणण्याचे आवाहन करत नवभारतात फुटीरतावादी प्रवृत्तींना स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

***

NilimaC/S.Kane/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1871774) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu