वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग क्षेत्रापुढे येत्या 5-6 वर्षात 100 अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य: गोयल
Posted On:
27 OCT 2022 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2022
कापड उद्योगांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कापसाची उपलब्धता सुनिश्चित करावी. याशिवाय कापूस उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्वांनी योग्य कापसाच्या उपलब्धतेचा शोध आणि कापूस उत्पादनांची चांगली किंमत सुनिश्चित करण्यासाठी, धोरणावर चर्चा करण्याकरता एकत्र यायला हवे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य तसेच उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी निर्यात संवर्धन परिषदेच्या सदस्यांबरोबर दूरदृश्य माध्यमातून संवाद साधताना हे मत व्यक्त केले.
वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत सर्व 11 निर्यात संवर्धन परिषदेच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत दूरदृश्य माध्यमातून बैठक बोलावली होती.
वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी नवीन कल्पनांवर चर्चा करण्याकरिता दोन दिवसीय बैठक आयोजित करावी, असे ते म्हणाले. यात सहभागींपैकी किमान 50% तरुण असावेत. सर्वसमावेशकतेसाठी भारतीय गुणवत्ता नियंत्रण (क्यूसीआय), वाणिज्य, डीपीआयआयटी, वित्त, बँकिंग निर्यात विमा यांचाही सहभाग असावा, जेणेकरून सर्वांगीण विषयांवर चर्चा करता येईल असे ते म्हणाले.
गेल्या वर्षी कापड निर्यात जवळपास 42 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती तर येत्या 5-6 वर्षात 100 अब्ज अमेरीकी डॉलर्सचे लक्ष्य गाठायचे आहे. हे साध्य केले तर या क्षेत्राचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे एकत्रित आर्थिक मूल्य 250 अब्ज डॉलर्स होईल असे त्यांनी नमूद केले.
वस्त्रोद्योग अभियानाअंतर्गत निधी उपलब्ध असून तो नव्या प्रकल्पांसाठी उपयोगात आणला पाहिजे. जी-20 मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राची क्षमता दर्शवता येईल, असे ते म्हणाले. अर्थमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या खरेदी महोत्सवात उद्योग प्रतिनिधींचा सहभाग वाढवता येईल, असे त्यांनी सांगितले.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1871265)
Visitor Counter : 195