अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या गव्हर्नर मंडळाच्या 7व्या वार्षिक बैठकीला, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित

Posted On: 26 OCT 2022 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2022

 

केंद्रीय अर्थ आणि उद्योग व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन  आज नवी दिल्ली इथून आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके -AIIB)गव्हर्नर मंडळाच्या 7 व्या वार्षिक बैठकीला, दूरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थित होत्या. AIIB शी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर आणि भविष्यातील उपक्रमांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची दरवर्षी वार्षिक सभा होते.  भारत हा AIIB चा संस्थापक सदस्य आणि दुसरा सर्वात मोठा भागधारक आहे.  AIIB मध्ये सर्वात मोठे प्रकल्प समूह देखील (प्रोजेक्ट पोर्टफोलिओ) भारत राबवत आहे.  “सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर टूवर्ड अ कनेक्टेड वर्ल्ड”, अर्थात संपूर्ण जगाला जवळ आणणाऱ्या शाश्वत पायाभूत सुविधा, ही या वर्षीच्या वार्षिक सभेची संकल्पना होती. 

गव्हर्नरांच्या या गोलमेज (round table) चर्चेत, “आपत्तीप्रवण जगात पायाभूत सुविधांसाठी  वित्तपुरवठा” या विषयावर अर्थमंत्र्यांनी आपले विचार मांडले.   सभासदांना समर्पित भावनेनं मदत करण्यासाठीची बांधिलकी आणि विकासात्मक कामांसाठी सतत उच्च दर्जाचा वित्तपुरवठा करत असल्याबद्दल, अर्थमंत्र्यांनी आपल्या संबोधनात AIIB चं कौतुक केलं.   सीतारामन यांनी नमूद केलं की, बाहेरुन उत्पन्न होणारे धोके सतत भेडसावत असूनही, मुख्य संरचनात्मक सुधारणा आणि चांगल्या जागतिक व्यावसायिक ताळेबंदासह(एक्स्टर्नल बॅलन्स शीट) , भारतानं सुनियोजित उद्दिष्टांसाठी आखलेल्या विविध धोरणांच्या अनोख्या मिश्रणानं, AIIB ची वाढ लवचिक म्हणजेच सर्वसमावेशक राखण्यात मदत केली आहे.  आत्मनिर्भर अर्थात स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेच्या मार्गावर भारताची वाटचाल सुरु असून, त्यामुळे कोरोना महामारीचे  दुष्परिणाम शमवण्यात भारत यशस्वी ठरला आहे यावर अर्थमंत्र्यांनी आपल्या संबोधनात भर दिला.  सामाजिक सुरक्षितता आणि आर्थिक समावेशकतेला चालना देण्यासाठी, तंत्रज्ञानाचा वापर करून आखलेल्या डिजिटलीकरणाद्वारे भारतानं साध्य केलेली उल्लेखनीय प्रगती,  सीतारामन यांनी अधोरेखित केली. LIFE अर्थात 'पर्यावरणाला पूरक जीवनशैली' या सारख्या विविध कार्यक्रमांद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी,  हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांचं आघाडीवर राहून नेतृत्व करत असून, भारताचं समर्थ प्रतिनिधित्व करत आहेत, असंही सीतारामन यांनी ठासून सांगितलं.

अर्थपूर्ण परिणाम साध्य करण्यासाठी आणि साधनसंपत्ती अनेक क्षेत्रांमध्ये अनियंत्रित आणि असंतुलितपणे विखुरली जाऊन वाया जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी, AIIB नं ,स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रांवर प्राधान्यानं  विशेष लक्ष केंद्रित करून गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी शिक्षण आणि आरोग्य, तसच डिजिटल पायाभूत सुविधांवर, लक्षं केंद्रित करावं लागेल, अशी सूचना अर्थमंत्र्यांनी केली.

आपल्या सदस्यांच्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या गरजा भागवण्यासाठी सार्वजनिक साधनसंपत्ती अपुरी पडत असल्यानं, बँकेनं खाजगी क्षेत्रातील वैविध्यपूर्ण साधनसंपत्ती संकलित करण्यात केवळ उत्प्रेरकाची (वेग देण्याची) भूमिका बजावू नये, तर स्वतः साधनसंपत्ती शोधली पाहिजे, ती कशी वाढवता येईल याची यंत्रणा देखील शोधली पाहिजे, असा सल्ला सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिला. बहुस्तरीय विकास बँकेच्या(Multilateral development Bank-MDB)  भांडवल पर्याप्तता आराखड्या वर (capital adequacy framework-CAF),  G-20 राष्ट्रसमुहाच्या तज्ञ पॅनेलच्या अहवालानं केलेल्या शिफारसींवर लवकरात लवकर कार्यवाही होणं आवश्यक आहे असंही त्या म्हणाल्या.

AIIB नं  आर्थिक सहाय्य करण्याच्या त्यांच्या उपक्रमांपलीकडे  जाऊन, ग्राहकांना त्यांचं आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजनांमध्ये परिवर्तित  करता येईल असं वाढीव तांत्रिक सहाय्य पुरवण्यासारख्या, मध्य आणि उर्ध्वप्रवाह (Midstream and Upstream) व्यवहारांची व्याप्ती वाढवण्याच्या दिशेनं प्रयत्न करायला हवेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. बँकेनं सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये बॅंकेची कार्यालयं स्थापन करावीत, असंही सीतारामन यांनी शेवटी सुचवलं 

AIIB ला आपलं निर्धारित लक्ष्य यशस्वीपणे गाठता येण्यासाठी भारताकडून निरंतर सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.


* * *

S.Patil/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871080) Visitor Counter : 184