संरक्षण मंत्रालय
डेफएक्स्पो 2022 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एचएएलद्वारे निर्मित एचटीटी-40 या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचे अनावरण केले
Posted On:
19 OCT 2022 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2022
गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरु असलेल्या 12 व्या डेफएक्स्पो प्रदर्शनातील भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 19 ऑक्टोबर 2022 रोजी एचटीटी-40 या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचे अनावरण केले. या विमानाची संकल्पना आणि विकसन एचएएल अर्थात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने केले आहे. या प्रसंगी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. एचटीटी-40 या विमानात अत्याधुनिक वर्तमानकालीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत आणि हे विमान वैमानिक-स्नेही असेल अशा रीतीने तयार करण्यात आले आहे. या विमानाच्या रचनेत कंपनीने तयार केलेल्या 60% भागांचा वापर तसेच काही प्रमाणात खासगी क्षेत्राच्या समन्वयातून निर्माण भागांचा वापर केला असून हे विमान म्हणजे ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेचे झळाळते उदाहरण आहे.
एचटीटी-40 हे विमान मुलभूत विमान चालन प्रशिक्षण, हवाई कसरती, विशिष्ट साधनांसह उड्डाण आणि क्लोज फॉर्मेशन उड्डाणांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच दिशादर्शन आणि रात्रीच्या वेळेतील उड्डाण करण्यासाठी दुय्यम वापराकरिता या विमानाचा उपयोग केला जाईल. भारतीय संरक्षण दलांच्या प्रशिक्षणविषयक प्राथमिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विमानाची रचना करण्यात आली आहे.
अत्यंत दक्षपणे तपासणी केलेल्या टर्बो-प्रॉप इंजिनाच्या सभोवताली उभारण्यात आलेल्या या विमानामध्ये अत्याधुनिक हवाई तंत्रज्ञान, वातानुकुलीत कक्ष आणि इजेक्शन सीट्स बसविण्यात आल्या आहेत. चालत्या विमानात वैमानिकांची अदलाबदल, इंधन पुनर्भरण आणि अत्यंत कमी वेळात मागे फिरण्याची क्षमता अशी अत्यंत विलक्षण वैशिष्ट्ये या विमानात उपलब्ध आहेत. या विमानाच्या पहिल्या उड्डाणापासून सहा वर्षांच्या विक्रमी वेळेत प्रमाणीकरणासाठी आवश्यक सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
एचटीटी-40 या विमानाने सर्व यंत्रणाविषयक चाचण्या, सर्व प्रकारची पीएसक्यूआर कामगिरी, गरम हवामान, समुद्र पातळी तसेच क्रॉस विंड चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. पावसाच्या माऱ्याला देखील सहन करण्याची विमानाची क्षमता सिद्ध झाली आहे. सैनिकी हवाई उड्डाण योग्यता आणि प्रमाणीकरण केंद्राकडून (CEMILAC). या विमानाला परिचालनासाठी प्राथमिक परवानगी मिळाली आहे.
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1869274)
Visitor Counter : 212