माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केले 2020 सालासाठीचे विविध श्रेणींमधील पुरस्कार

Posted On: 30 SEP 2022 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात 2020 सालासाठीचे विविध श्रेणींमधील पुरस्कार प्रदान केले. यावेळी प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचीव अपूर्व चंद्रा, निवड समितीचे अध्यक्ष आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.  

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त आशा पारेख यांचे,  चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे महिला सक्षमीकरणाची ओळख असल्याचे सांगितले.

सर्व कला प्रकारांमध्ये चित्रपटांचा प्रभाव सर्वाधिक असतो, असे नमूद करून राष्ट्रपती म्हणाल्या की चित्रपट हा केवळ एक उद्योग नाही तर आपल्या मूल्य प्रणालीची कलात्मक अभिव्यक्ती आहे. सिनेमा हे राष्ट्र उभारणीचे प्रभावी साधन देखील आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य योद्ध्यांच्या जीवनावरील फिल्मी आणि बिगर फिल्मी चित्रपटांचे भारतीय प्रेक्षक स्वागत करतील. समाजातील ऐक्य वाढवणारे, देशाच्या विकासाच्या गतीला चालना देणारे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांना बळ देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती व्हावी, अशी प्रेक्षकांची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.

भारतीय सांगितला परदेशात मिळालेली ओळख अधोरेखित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की जागतिक स्तरावर भारताच्या सुप्त शक्तीचा प्रसार करण्याचे हे उत्तम माध्यम आहे. आता आपल्या देशाच्या  एका प्रदेशात बनवलेले चित्रपट अन्य प्रदेशांमध्ये देखील मोठी लोकप्रियता मिळवत आहेत. अशा पद्धतीने भारतीय सिनेमा सर्व देशवासीयांना एकाच सांस्कृतिक धाग्यात गुंफत आहे. या चित्रपट समुदायाचे भारतीय समाजासाठी मोठे योगदान आहे”, त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाला संबोधित करताना अनुराग ठाकूर म्हणाले की सिनेमाने आपल्या देशाचा विवेक, समाज आणि संस्कृती धरून ठेवली आहे आणि घडवली आहे.          

मंत्र्यांनी भारतीय चित्रपट कलाकारांना, महामारीच्या काळात त्यांनी दिलेल्या योगदानाचे श्रेय दिले आणि म्हणाले की कोविडचे भीषण वास्तव आणि जागतिक अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती, यामध्ये आपण दिलेले मनोरंजन आणि संदेश हाच आमच्यासाठी एकमेव आशेचा किरण ठरला.    

ठाकूर यांनी, 4 बालकलाकारांना आज सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अतीव आनंद व्यक्त केला, तसेच दिव्यांग बाल कलाकार दिव्येश इंदुलकर आणि आणखी एका कलाकाराचा विशेष उल्लेख केला.  

पुरस्कार समारंभात टेस्टीमनी ऑफ अॅना या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म पुरस्काराने तर सुराराई पोत्रू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुर्या आणि अजय देवगण यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर अपर्णा बालमुरली यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तान्हाजी: द अनसंग वाॅरियर चित्रपटाला, परिपूर्ण मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पाहता येईल.       

 

   

 

 

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863947) Visitor Counter : 294