आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. मनसुख मांडविय यांनी देशभरातील लाभार्थींशी साधला संवाद


आजारांवर उपचार करताना होणाऱ्या वारेमाप खर्चाच्या संकटापासून या  योजनेच्या माध्यमातून मुक्ती मिळाल्याची लाभार्थींची भावना

आयुष्मान भारत योजनेने सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सरकारच्या मिशनला दिले बळ

Posted On: 23 SEP 2022 8:36PM by PIB Mumbai

 

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब आणि वंचित कुटुंबांना रोकड रहित, कागदरहित आणि सहजसाध्य आरोग्य सेवा आणि उपचार प्रदान केल्यामुळे उपचारांवर आवाक्याबाहेर खर्च करण्याच्या त्रासातून, तसेच गंभीर आणि प्रदीर्घ आजारामुळे आणि महागड्या उपचारांमुळे येणाऱ्या आर्थिक दिवाळखोरीतून त्यांची सुटका झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटले आहे. या योजनेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी आज देशभरातील या योजनेच्या काही लाभार्थींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. तसेच गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल सुद्धा दूरदृश्य प्रणालीमार्फत या कार्यक्रमात सहभागी झाले.

लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आपले अनुभव कथन केले. आपल्याला झालेले गंभीर आजार, त्यावरचे न परवडणारे उपचार, त्यामुळे झालेला त्रास याबाबत त्यांनी माहिती दिली. त्या आजारांच्या उपचारांवर होणारा खर्च आपल्याला परवडणारा नव्हता, मात्र आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आपल्याला उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाले, तसेच या योजनेच्या नामिकेवर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार मिळू शकले, असे सांगत, त्यांनी समाधानाची आणि आनंदाची भावना व्यक्त केली.

 

डॉ. मनसुख मांडविय यांनी यावेळी या योजनेच्या विविध वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती दिली. ही योजना, सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सरकारच्या मिशनला  बळ देते आहे, असे ते म्हणाले. या योजनेत अद्याप सहभागी न झालेल्या राज्यांनी, नागरिकांच्या हितार्थ परवडण्याजोगी आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या या राष्ट्रीय मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या योजनेंतर्गत आतापर्यंत 19 कोटींपेक्षा जास्त AB-PMJAY कार्ड तयार करण्यात आली असून 3.8 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींनी मोफत उपचारांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) च्या ठळक वैशिष्ट्यांबाबत सांगताना, ABHA हेल्थ आयडीमुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडून येतील, असा विश्वास डॉ. मांडविय यांनी व्यक्त केला.

या योजनेने आरोग्य सेवा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले असून गरीब कुटुंबांसाठी उपचाराची दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी यावेळी सांगितले. आयुष्मान भारत योजना, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि महागडे उपचार न परवडणाऱ्या लाभार्थींना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यात यशस्वी ठरली आहे, असे त्या म्हणाल्या. ही योजना गरजूंना आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच, लाभार्थींना त्यांच्या आरोग्य सेवेच्या अधिकारांबद्दल शिक्षित करते. त्यामुळे सक्षम भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या पायावर उभारण्यात आलेल्या या योजनेची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

***

N.Chitale/M.Pange/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861838) Visitor Counter : 225