विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अमेरिकेत पिट्सबर्ग येथे आयोजित ‘जागतिक स्वच्छ उर्जा कृती मंच - 2022’ कार्यक्रमात एकात्मिक जैवशुद्धीकरण मोहिमेच्या नवोन्मेषी पथदर्शी प्रकल्पाची भारताकडून घोषणा
भारताच्या ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय संयुक्त मंत्रालयीन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे डॉ जितेंद्र सिंग यांनी “शाश्वत जैव ऊर्जा आणि जैव- शुद्धीकरण” या विषयावरील पहिल्या गोलमेज परिषदेत केली घोषणा
पुढच्या पाच वर्षांमध्ये सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून ऊर्जा संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिके यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याबरोबरच वाढीव वित्तपुरवठा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे डॉ जितेंद्र सिंग यांचे प्रतिपादन
प्रतिदिनी दहा टन क्षमतेचा भारतातील पहिला इथेनॉल प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत हरियाणामध्ये पानीपत येथे उभारला जाणार
Posted On:
23 SEP 2022 12:51PM by PIB Mumbai
भारताच्या ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय संयुक्त मंत्रालयीन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे डॉ जितेंद्र सिंग यांनी अमेरिकेत पिट्सबर्ग येथे आयोजित ‘जागतिक स्वच्छ उर्जा कृती मंच - 2022’ कार्यक्रमात “इनोव्हेशन रोडमॅप ऑफ द मिशन इंटिग्रेटेड बायोरिफायनरीज” ची म्हणजेच, एकात्मिक जैवशुद्धीकरण मोहिमेच्या नवोन्मेषी पथदर्शी प्रकल्पाची घोषणा केली. भारताने ब्राझील, कॅनडा, युरोपीय देश आणि ब्रिटन यांच्या सोबतीने हा आराखडा तयार केला आहे.

पुढच्या पाच वर्षांमध्ये सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून ऊर्जा संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिके यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याबरोबरच वाढीव वित्तपुरवठा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे, डॉ जितेंद्र सिंग यांनी यावेळी सांगितले.
मिशन इनोव्हेशन (MI-7) आणि स्वच्छ उर्जा मंत्रालय (CEM13) यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित ‘जागतिक स्वच्छ उर्जा कृती मंच-2022’ कार्यक्रमात “शाश्वत जैव ऊर्जा आणि जैव-शुद्धीकरण” या विषयावरील पहिल्या गोलमेज कार्यक्रमात ते बोलत होते.
जैव-शुद्धीकरण क्षेत्रातील सध्याच्या मूल्यसाखळीमधील त्रुटी आणि आव्हाने ओळखून, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आवश्यक आठ महत्वपूर्ण बाबींना प्राधान्य देणे आणि मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोहिमेच्या वाटचालीला योग्य मार्गदर्शन करणे हा “इनोव्हेशन रोडमॅप ऑफ द मिशन इंटिग्रेटेड बायोरिफायनरीज” या आराखड्याचा उद्देश आहे, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंग यांनी दिली. धोरणे तयार करणाऱ्यांना पुढच्या पाच वर्षांसाठी संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिके यांच्याशी संबंधित धोरणात्मक आराखडा तयार करण्यास सहाय्य करण्याबरोबरच बायो-रिफायनरी तंत्रज्ञानाशी संबंधित विशिष्ट वित्तपुरवठा प्रस्ताव तयार करण्याच्या तसेच उपयुक्त सूचना प्रदान करण्याच्या दृष्टीनेही हा आराखडा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला उपस्थित असलेले मंत्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकेच्या उर्जा विभागातील तसेच नवोन्मेष अभियान सुकाणू समितीतील तसेच नवोन्मेष अभियान सचिवालयातील वरिष्ठ प्रतिनिधी, नवोन्मेष अभियानातील सदस्य देश तसेच भागीदार संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की, स्वच्छ उर्जा मंचाच्या या बैठकीमुळे भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना जगासमोर मांडण्याची उत्तम संधी मिळाली आहे. यशस्वी जागतिक हरित उर्जेसाठी जेथे जागतिक उर्जा समुदाय सहकार्य तसेच सहयोगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन कार्य करीत आहेत अशा मंचावर उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आपल्याला अत्यंत आनंद वाटतो आहे असे त्यांनी सांगितले.
देशातील एकूण उर्जा वापरात स्वच्छ उर्जा पर्यायांचा लक्षणीय प्रमाणात समावेश करून देशाच्या ऊर्जाविषयक चित्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने केंद्र सरकार सतत प्रयत्न करत आहे अशी माहिती उपस्थित प्रतिनिधींना देऊन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग पुढे म्ह्णले की, वर्ष 2030 पर्यंत देशाची गैर-जीवाश्म उर्जा निर्मिती क्षमता 500 गिगावॅटपर्यंत पोहोचविणे, देशाच्या उर्जेच्या एकूण गरजेतील 50% गरज पुनर्नवीकरणीय उर्जा स्त्रोतांमधून भागविणे, अंदाजित एकूण कार्बन उत्सर्जनाचे एक अब्ज टनांनी कमी करणे, अर्थव्यवस्थेतील कार्बन तीव्रता वर्ष 2005 च्या तुलनेत 45% नी कमी करणे आणि वर्ष 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठणे यादिशेने काम करण्याचा निश्चय देशाने केला आहे.
हरियाणातील पानिपत येथे प्रायोगिक तत्वावर प्रतिदिन 10 टनांची निर्मिती क्षमता असलेला एकात्मिक वितंचक निर्मिती कारखाना उभारण्यात आला आहे आणि डिसेंबर2022 पर्यंत त्याचे परिचालन सुरु होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी अत्यंत अभिमानाने उपस्थितांना दिली. हा स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रत्यक्ष वितंचक निर्मिती करणारा देशातील सर्वात पहिला कारखाना असेल. वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत सुरु होणाऱ्या प्रतिदिनी 100 केएल निर्मिती क्षमता असलेल्या व्यावसायिक 2जी इथेनॉलनिर्मिती उद्योगांना हे स्वदेशी एन्जाइम म्हणजेच वितंचक पुरविण्याचे नियोजन देखील भारतीय तेलमहामंडळाने केले आहे याकडे त्यांनी निर्देश केला. वाया जाणाऱ्या लीग्निन पासून मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्यासाठी लीग्निन मूल्यमापन प्रक्रिया देखील विकसित करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. या एककाचे यशस्वी सादरीकरण देशाला आणखी एक स्वदेशी तंत्रज्ञान अवगत करून देईल आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत योगदान देईल; तसेच वाहतूक क्षेत्रातून निर्माण होणारी कार्बनची पदचिन्हे देखील कमी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाहतूक क्षेत्रातून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात शाश्वत जैविक इंधने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, जैवतंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून भारत सरकार आधुनिक प्रकारची जैविक इंधने तसेच कचऱ्यातून ऊर्जानिर्मिती यांच्या तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास कार्याला पाठबळ देत आहे. भारताने 5 जैव उर्जा केंद्रांची स्थापना केली असून या केंद्रांमध्ये अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने प्रागतिक शाश्वत जैवइंधनांच्या निर्मितीवर एक आंतरशाखीय पथक काम करत आहे अशी माहिती त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिली.
भाषणाच्या शेवटी, केंद्रीय मंत्री म्हणाले की नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या नवोन्मेष अभियानाच्या संमेलनामध्ये, भविष्यात कार्बन उत्सर्जन कमी असेल अशा वातावरणनिर्मितीच्या उद्देशाने पुनर्नवीकरणीय इंधने, रसायने आणि इतर सामग्रीसंदर्भातील अभिनव संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने नेदरलँड्स, एकत्र येणारे महत्त्वाचे सदस्य, आंतरराष्ट्रीय संघटना, कॉर्पोरेट क्षेत्र, शैक्षणिक संस्था तसेच नागरी समाज यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन एकात्मिक जैवइंधने अभियानाची सुरुवात केली.
***
S.Bedekar/M.Pange/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861689)