संरक्षण मंत्रालय

‘पुनीत सागर अभियान’ला मिळाला जागतिक भागीदार : स्वच्छ जलाशयाचे सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांना समन्वयित करण्याकरिता एनसीसी आणि यूएनईपी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत केल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Posted On: 22 SEP 2022 3:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यामाध्यमातून प्लॅस्टिक प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण आणि जागतिक स्वच्छ जलस्रोतांचे, जलाशयांचे  लक्ष्य ठेवले आहे. 'पुनीत सागर अभियान' आणि 'टाइड टर्नर्स प्लास्टिक चॅलेंज प्रोग्राम' द्वारे ते साध्य केले जाणार आहे. एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग आणि संयुक्त राष्ट्र जागतिक खाद्यान्न कार्यक्रमाचे निवासी प्रतिनिधी बिशो पराजुली यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.  संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि यूएनईपीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

‘पुनीत सागर अभियान’ हा एक उदात्त उपक्रम असल्याचे सांगून संरक्षण सचिवांनी आपल्या भाषणात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी एनसीसीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. 1.5 दशलक्ष एनसीसी छात्रांमधे जगभरातील तरुणांच्या विचारसरणीवर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे आणि या मोहिमेला जनआंदोलन बनवण्यात ते मोलाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  भावी पिढ्यांना दीर्घायुषी आणि निकोप – निरामय जीवन जगता यावे यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगून एनसीसीला या मोहिमेसाठी पाठबळ दिल्याबद्दल डॉ. अजय कुमार यांनी यूएनईपीचे आभार मानले.

भारताच्या हवामान बदलाच्या संकल्पाचा  आधारस्तंभ स्कॉटलंड, ग्लासगो येथे 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 दरम्यान संयुक्त राष्ट्रांची 26 वी हवामान बदल परिषद कॉप 26 झाली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पना साकार करण्यासाठी सरकारने राबवलेल्या अनेक उपक्रमांपैकी 'पुनीत सागर अभियान' हा एक आहे. पंतप्रधानांनी याला 'पंचामृत' म्हणून संबोधले आहे. पंतप्रधानांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारताचे अभूतपूर्व योगदान म्हणून पाच अमृत घटक सादर केले होते.  हे आहेत:-

1. भारत 2030 पर्यंत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता 500जी डब्‍ल्‍यू वर नेईल.

2.  2030 पर्यंत भारत त्याच्या 50 टक्के ऊर्जा गरज अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल.

3. भारत 2030 पर्यंत एकूण अनुमानित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करेल.

4. 2030 पर्यंत, भारत आपल्या अर्थव्यवस्थेतील कार्बन तीव्रता 45 टक्क्यांहून अधिक कमी करेल.

5. 2070 पर्यंत, भारत शून्य कार्बन उत्सर्जन अर्थात नेट झिरोचे लक्ष्य गाठेल.

एनसीसीच्या छात्रांनी देशातले समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी 'पुनीत सागर अभियान' ही देशव्यापी मोहीम सुरू केली. सागरी  स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी जनजागृती करत,प्लॅस्टिक आणि इतर टाकाऊ पदार्थांपासून समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम सुरुवातीला केवळ एका महिन्यासाठी  सुरू केली होती. नद्या आणि इतर जलस्रोतांना देखील स्वच्छ करण्यासाठी या मोहीमेचा नंतर संपूर्ण भारतभर वर्षभरासाठी विस्तार करण्यात आला.

एनसीसी ,ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना,असून त्यांनी आपल्या छात्रांना प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करण्यासाठी एकत्रित कार्यरत केले. या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर प्रचंड गती, स्वीकृती आणि सहभागही  लाभला.पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, सैनिक स्कूल सोसायटी, आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी, सीमा रस्ते संघटना (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह विविध मंत्रालये आणि संस्थांनी एनसीसीच्या या उदात्त हेतूला समर्थन दिले आहे.

'पुनीत सागर अभियान' सुरू झाल्यापासून,12 लाखांहून अधिक एनसीसी छात्रांनी, तसेच माजी विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवकांनी मिळून सुमारे 1,900 ठिकाणांहून 100 टन प्लास्टिक कचरा गोळा केला असून यामुळे 1.5 कोटी लोकांना लाभ झाला आहे.संकलित केलेल्या सुमारे 100 टन प्लास्टिक कचऱ्यापैकी 60 टनांपेक्षा जास्त कचरा पुनर्वापरासाठी सुपूर्द करण्यात आला आहे.

‘पुनीत सागर अभियान’ – एक परिवर्तन  घडविणारी लाट

या मोहिमेला मिळालेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे आणि यशानंतर,युवा संघटनेच्या सामर्थ्याचा लाभ घेण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने  (UNEP) आपल्या 'टाइड टर्नर चॅलेंज प्रोग्राम' या उपक्रमाद्वारे,एनसीसी NCC सोबत सहयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.संयुक्त राष्ट् संघाकडे  (UN) प्लास्टिक प्रदूषणासह पर्यावरणाशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदेश आणि ज्ञानाचा आधार आहे आणि तरुणांना संलग्न करण्यासाठी उपक्रमही आहेत.

एनसीसी आणि यूनेप(UNEP)यांच्यातील सामंजस्य कराराचे उद्दिष्ट जलाशय, जलस्रोतांना स्वच्छ‌‌ करण्याच्या कार्याला सहयोग देत चालना देण्यासाठी, तरुणांना जोडून घेणे,हे आहे.माहितीची देवाणघेवाण आणि प्रशिक्षण उपक्रमांद्वारे अशा मोहिमांची क्षमता वाढवणे आणि पर्यावरणीय शाश्वततेबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा त्याचा उद्देश आहे. हा सामंजस्य करार, तीन वर्षांच्या कालावधीसाठी  आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रातील समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परस्पराचे सहकार्य वाढविणे आणि परिणामकारकतेसाठी त्यांना एकत्रित आणणे, विकसित करणे,हे या कराराचे उद्दिष्‍ट आहे.

 

 

 

 

S.Bedekar/Sampada/Vinayak/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1861484) Visitor Counter : 338