पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचे आयोजन


पीएम केअर्स फंडामध्ये मनापासून योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतातील जनतेचे केले कौतुक

देशात उद्भवणाऱ्या आकस्मिक आणि संकटकालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करताना, केवळ मदत सामग्री पुरवठ्याद्वारेच नाही तर, अशी संकटे कमी करण्यासाठी उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता उभारणीच्या व्यापक दृष्टीकोनातून पीएम केअर्स फंड काम करणार

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के. टी. थॉमस, माजी उपसभापती करिया मुंडा, आणि रतन टाटा हे पीएम केअर्स फंडाचे विश्वस्त म्हणून बैठकीत सहभागी

Posted On: 21 SEP 2022 2:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, दिनांक 20.09.2022 रोजी पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली.

या बैठकीत, 4,345 मुलांना आधार देणार्‍या बालकांसाठी पीएम केअर्स (PM CARES for Children) या योजनेसह पीएम केअर्स निधीच्या मदतीने हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांवर सादरीकरण करण्यात आले. देशासाठी महत्त्वपूर्ण काळात फंडाने बजावलेल्या भूमिकेचे विश्वस्तांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान केअर फंडात मनापासून योगदान दिल्याबद्दल देशातील जनतेचे कौतुक केले.

आपत्कालीन आणि संकटकालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करताना, केवळ मदत सामग्री पुरवठ्याद्वारेच नाही तर, अशी संकटे कमी करण्यासाठी उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढवणे या पीएम केअर्सच्या मुख्य उद्दिष्टाबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

पीएम केअर फंडाचा अविभाज्य भाग बनल्याबद्दल पंतप्रधानांनी विश्वस्तांचे अभिनंदन केले.

या बैठकीला पीएम केअर्स फंडाचे विश्वस्त, म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री तसेच पीएम केअर फंडाचे नवनियुक्त विश्वस्त उपस्थित होते:

  • न्यायमूर्ती के. टी. थॉमस, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
  • करिया मुंडा, माजी उपसभापती
  • रतन टाटा, एमेरिटस, टाटा सन्सचे अध्यक्ष

पीएम केअर फंडाच्या सल्लागार मंडळाच्या स्थापनेसाठी खालील नामांकित व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा निर्णय या बैठकीत विश्वस्त मंडळाने घेतला:

  • राजीव महर्षी, भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
  • सुधा मूर्ती, माजी अध्यक्ष, इन्फोसिस फाउंडेशन
  • आनंद शाह, टेक फॉर इंडियाचे सह-संस्थापक आणि इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी

नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडाच्या कार्यपद्धतीला व्यापक दृष्टीकोन मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.  नव्या सदस्यांचा सार्वजनिक जीवनाचा अफाट अनुभव, पीएम केअर फंडाला विविध सार्वजनिक गरजा पूर्ण करण्यासाठी तत्काल प्रतिसाद देणारी संस्था बनवण्यास हातभार लावेल, असेही ते म्हणाले.

 

S.Patil /S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1861097) Visitor Counter : 204