कृषी मंत्रालय
भारताकडे अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण असण्यासोबतच जगाच्या मोठ्या भागाची अन्नाची गरज भागवण्याची क्षमता आहे: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर
भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की) च्या 'लीड्स 2022' परिषदेला केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केले संबोधित
Posted On:
20 SEP 2022 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022
भारताकडे अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण असण्यासोबतच जगातील मोठ्या भागाची अन्नाची गरज भागवण्याची क्षमता आहे, असे मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केले. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) च्या 'लीड्स 2022' परिषदेला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून तोमर यांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. ‘फूड फॉर ऑल: फार्म टू फोर्क’ या विषयावरील सत्रात तोमर यांनी सहभाग घेतला.
भविष्यातील गरजा आणि आव्हाने लक्षात घेऊन देश धोरणात्मक योजना आखत पुढे जात आहे, असे ते म्हणाले. अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे असेल तर उत्पादकताही वाढवावी लागेल याची आम्हाला जाणीव आहे, असेही त्यांनी सांगितले. शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करून त्यात शेतकर्यांना त्यात सहभागी करुन घेतले आणि चांगल्या सिंचन पद्धतीमुळे कृषी उत्पादन खर्च कमी केला तर अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता वाढेल, असे तोमर पुढे म्हणाले. सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि आपल्याला देश आणि जगात अन्नसुरक्षा आणण्यात सहभागी होता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना महामारी असूनही, भारताच्या कृषी क्षेत्राने 3.9% विकास दराची लक्षणीय कामगिरी नोंदवली आहे. तसेच, आपल्या कृषी निर्यातीने 4 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, जो आपल्याला सतत वाढवायचा आहे, असे तोमर यांनी सांगितले. 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे 900 कोटी असेल, अन्नाची मागणी झपाट्याने वाढेल, परिणामी शेतजमीन, पशुधन आणि खते आणि जनुकीय सुधारित पिकांसाठी चराऊ जमीन यांची मागणी वाढेल, असे तोमर पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अलीकडच्या वर्षांत देशात कृषी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अन्न उत्पादक देश म्हणून उदयास आलो आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. भारताचा भूगोल, हवामान आणि माती खूप वैविध्यपूर्ण आहे, नैसर्गिकरित्या कृषी मालाच्या विस्तृत जातींचे,वाणांचे उत्पादन करण्यासाठी ही स्थिती उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन तोमर यांनी केले. आपण इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा जास्त पिके घेऊ शकतो, जगात सर्वाधिक पीक घनता भारतात आहे. चौथ्या तात्पुरत्या अंदाजानुसार, 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.72 मेट्रिक टन आहे.
भारताला स्वावलंबी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी सरकार लहान शेतकऱ्यांच्या वाढीसाठी सतत काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. अन्न प्रक्रियेसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन(पीएलआय) योजना पुढील 6 वर्षात 10,900 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनासह लागू केली गेली आहे. त्याच वेळी कृषी उडान योजनेंतर्गत हवाई वाहतुकीद्वारे कृषी उत्पादनांची ने आण करण्यासाठी सहाय्य आणि प्रोत्साहन दिले जात आहे. विशेषतः ईशान्य आणि आदिवासी भागांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती तोमर यांनी दिली.
R.Aghor /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860996)
Visitor Counter : 254