आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रक्तदान अमृत महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित रक्तदान शिबीराचे डॉ. मनसुख मांडविय यांनी केले उद्घाटन
मांडवीय यांनी याप्रसंगी केले रक्तदान, सेवा आणि सहयोग भावनेने समृद्ध सांस्कृतिक मुल्यांचे अनुसरण करत या राष्ट्रव्यापी मोहीमेत स्वेच्छेने रक्तदान करण्याचे देशवासीयांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2022 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2022
रक्तदान हे सर्वोत्तम दान आहे. आपली समृद्ध संस्कृती तसेच सेवा आणि सहयोगाची परंपरा लक्षात घेत, सर्व नागरिकांना रक्तदान अमृत महोत्सव या देशव्यापी ऐच्छिक रक्तदान मोहिमेत स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवियायांनी केले आहे. रक्तदान केल्याने केवळ राष्ट्राची गरज पूर्ण होते असे नाही तर ही समाज आणि मानवतेचीही मोठी सेवा आहे, असे प्रतिपादन मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करताना केले.


ऐच्छिक रक्तदानाचे महत्त्व सांगताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, “रक्तदान अमृत महोत्सव हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मोठ्या आयोजनाचा एक भाग आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट नियमित, विनामोबदला, ऐच्छिक रक्तदानाबद्दल जागरूकता वाढवणे आणि रक्त किंवा त्याचे घटक (संपूर्ण रक्त/ पॅक केलेल्या लाल रक्तपेशी/ प्लाझ्मा/ प्लेटलेट्स) किफायतशीर आणि सुरक्षित रुपात उपलब्ध आहेत याची खात्री करणे हा आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार, भारताची वार्षिक गरज सुमारे 1.5 कोटी युनिट्स आहे. दर दोन सेकंदात, भारतात कोणालातरी रक्ताची गरज असते आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येक तीन व्यक्तीपैकी एकाला रक्ताची गरज भासते, असे ते म्हणाले. “तांत्रिक प्रगती साधली असूनही रक्ताला कोणताही पर्याय नाही आणि 1 युनिट रक्त तब्बल तीन जीव वाचवू शकते’, डॉ मांडविय म्हणाले.

रक्तदानासंबंधीचे गैरसमज दूर करत डॉ. मांडविय यांनी सांगितले की, "एखाद्या व्यक्तीच्या शरीरात 5 - 6 लिटर रक्त असते आणि कोणतीही व्यक्ती दर 90 दिवसांनी (3 महिन्यांनी) रक्तदान करू शकते." शरीर खूप लवकर रक्ताची पुनर्निर्मीती करू शकते; 24 - 48 तासांच्या आत रक्तातील प्लाझ्मा, लाल रक्तपेशी सुमारे 3 आठवड्यात आणि प्लेटलेट्स आणि पांढऱ्या रक्त पेशी काही मिनिटांत नव्याने तयार होत असतात.
या राष्ट्रव्यापी मोहिमेला केंद्रीकृत रक्त बँक व्यवस्थापन माहिती प्रणाली, ई-रक्त कोश पोर्टलद्वारे नियंत्रीत असून हे पोर्टल रक्तदात्यांच्या माहितीचे राष्ट्रीय भांडार म्हणून काम करेल. हे पोर्टल रक्तदात्यांची नोंद सुनिश्चित करेल त्यामुळे गरज असेल तेव्हा रक्त जलद उपलब्ध होईल.
ई-रक्त कोश पोर्टलची लिंक:
https://www.eraktkosh.in/BLDAHIMS/bloodbank/transactions/bbpublicindex.html
डॉ. मांडविया यांनी भारताच्या आरोग्य सेवेत सफदरजंग हॉस्पिटलचे योगदान दर्शविणारे "फुटप्रिंट्स ऑन द सॅन्ड्स ऑफ टाईम" या पुस्तकाचे प्रकाशनही केले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860235)
आगंतुक पटल : 349