माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सीबीसीच्या कलाकारांतर्फे कर्तव्य पथ येथे सादर होत असलेल्या विविधरंगी कार्यक्रमांमुळे या परिसराला भेट देणारे रसिक मंत्रमुग्ध

Posted On: 15 SEP 2022 4:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सीबीसी अर्थात केंद्रीय दूरसंवाद मंडळाने या महिन्यात दररोज जनतेसाठी संगीत,नृत्य, पथनाट्ये, प्रहसने तसेच विविध सादरीकरणे यांचे अनोख्या मिश्रण असलेले माहितीवजा मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी सादर केली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते कर्तव्य पथाचे उद्‌घाटन आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानिमित्त मंडळाच्या गीत आणि नाट्य विभागातील कलाकार याठिकाणी भेट देणाऱ्या सर्वसामान्य लोकांना दररोज त्यांच्या कलाविष्काराने मोहून टाकत आहेत.

स्टेप-प्लाझाच्या खुल्या रंगमंचावर सूर्यास्तानंतर सुरु होणाऱ्या आणि रात्री 8 वाजेपर्यंत चालणाऱ्या या मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी कोणतेही प्रवेशशुल्क नसून सर्व वयाच्या लोकांना या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी येथे मोफत प्रवेश दिला जात आहे.

शनिवार, रविवारी येथे भरविल्या जाणाऱ्या विशेष सांस्कृतिक मेळाव्यांमुळे येथील उत्साही वातावरणात अधिकच भर पडते. या मेळाव्यांमध्ये भारताच्या समृद्ध वारशासह आधुनिक सुधारणांची झलक दिसून येते.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांविषयीची माहिती सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोककेन्द्री संदेशांच्या रुपात प्रसारित करणे हे मनोरंजन आणि माहितीचा प्रसार यांचे अनोखे मिश्रण असलेल्या या कार्यक्रमांचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच देशात 17 सप्टेंबर 2022 रोजी साजऱ्या होत असलेल्या रक्तदान अमृत महोत्सवासारख्या (रक्तदान मोहीम) महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती देणाऱ्या विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन सीबीसी करत आहे.

कर्तव्य पथ परिसरातील खुल्या रंगमंचावर होणाऱ्या या सायंकालीन सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंडळाचे कलाकार गौरवशाली देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेली विविध राज्यांची लोकनृत्ये सादर करतात. प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण आणि मोहून टाकणारा अनुभव देण्यासाठी येथे कथक, ओडिसी इत्यादी शास्त्रीय नृत्यप्रकार देखील सादर केले जात आहेत. इंडिया गेट परिसराला भेट देणाऱ्या लोकांसाठी शास्त्रीय तसेच निम-शास्त्रीय वाद्यवादनाचे सांगीतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात येत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकार ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’चा संदेश देत आहेत.

या सर्व कार्यक्रमांमध्ये, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणानिमित्त नेताजींवर रचण्यात आलेली गीते हे मुख्य आकर्षण ठरत आहे. आपल्या देशाच्या या शूर नायकाला अभिवादनपर श्रद्धांजली म्हणून प्रत्येक कार्यक्रमाची सांगता बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे संचलन गीत असलेले कदम कदम बढाये जा ह्या गीताने केली जाते.

या संपूर्ण महिन्यात कलाप्रेमींसाठी कर्तव्य पथ परिसरात नेताजींचे आयुष्य आणि आदर्श यांच्यावर आधारित प्रहसने, पथ नाट्ये, नृत्य नाट्ये इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच ही कलाकार मंडळी यावर्षीच्या गांधी जयंती उत्सवाचा भाग म्हणून रसिकांसाठी अनेक विशेष कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येणार आहेत.

सर्व देशवासीयांनी  या भव्य कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन सीबीसीतर्फे करण्यात आले आहे.

 R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859571) Visitor Counter : 175