ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘‘मेरा राशन मेरा अधिकार’’ अंतर्गत 11 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 13,000 जणांनी केली सामायिक नोंदणी सुविधा केंद्रांमध्ये नोंद; नोंदणी 5 ऑगस्ट, 2022 पासून सुरू

Posted On: 01 SEP 2022 8:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

 

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली की, देशभरातल्या 11 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘‘मेरा राशन मेरा अधिकार’’ राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये 13,000 जणांनी सामायिक नोंदणी सुविधा केंद्रांमध्ये आपली नावे व्यक्तिगत स्वरूपात नोंदविली आहेत. या मोहिमेला देशात 5 ऑगस्ट, 2022 पासून प्रारंभ झाला आहे. देशातल्या चंदिगड, दिव आणि दमण, दादरा नगर हवेली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, तेलंगणा, पुडुचेरी, सिक्कीम, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अशाप्रकारची सामायिक नोंदणी सुविधा सुरू करण्यासाठी सज्जतेसंबंधीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या अभियानामध्ये सहभागी होवू इच्छिणा-या राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे एनएफएसए म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा- 2013 अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी संभाव्य लाभार्थींची नवीन माहिती जमा करण्यास मदत मिळणार आहे.

एनएफएसए अंतर्गत संबंधित नियमांअनुसार शिधा पत्रिका जारी करण्याआधी लाभार्थीच्या पडताळणीच्या प्रक्रियेची तपासणी करून राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी या सुविधेचा पूर्ण वापर करण्याची विनंती केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात आणि एनएफएसए अंतर्गत दिला जाणारा लाभ, योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना सुविधा देण्यासाठी सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांनी 5 ऑगस्ट, 2022 पासून 11 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘मेरा राशन, मेरा अधिकार’ ही वेबआधारित सामायिक नोंदणी सुविधा सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये आसाम, गोवा, लक्षव्दीप, महाराष्ट्र मेघालय, मिझोराम, नागालॅंड, पंजाब, त्रिपुरा आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. ही सुविधा एनआयसीने विकसित केली आहे. नागरिकांसाठी ही सुविधा https://nfsa.gov.in.वर उपलब्ध आहे. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही सुविधा सुरू झाल्यापासून अवघ्या 25 दिवसांमध्ये जवळपास 13,000 व्यक्तींनी त्यावर आपली नावे नोंदवली आहेत. अशा प्रकारे सामान्य नोंदणी सुविधेला मिळत असलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856147) Visitor Counter : 170