पोलाद मंत्रालय
चक्रीय अर्थव्यवस्था मॉडेलमध्ये धातू क्षेत्र आघाडीवर असणे आवश्यक : ज्योतिरादित्य एम. सिंधीया
उत्तम वृद्धीदर गाठण्यासाठी भारतातील खनिज आणि धातू क्षेत्र सज्ज : पोलाद मंत्री
Posted On:
26 AUG 2022 8:16PM by PIB Mumbai
आपली बहुतांश नैसर्गिक संसाधने मर्यादित असल्यामुळे जगाने या दुर्मिळ संसाधनांचा वापर करण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय पोलाद आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधीया यांनी सांगितले. भारतीय धातू संस्थेच्या दिल्ली विभागाने आयोजित केलेल्या 'चक्रीय अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमता' या विषयावरील आंतराराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

चक्रीय अर्थव्यवस्था हा संसाधनांचे जतन करण्याचा एकमेव मार्ग आहे यावर जगभरात एकमत दिसून आले आहे. मानवजातीचे भविष्य ‘ घेणे- तयार करणे -विल्हेवाट लावणे (टेक -मेक-डिस्पोज’) मॉडेलवर म्हणजेच एकरेषीय अर्थव्यवस्थेवर बांधले जाऊ शकत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे, हे सिंदीया यांनी अधोरेखित केले. कमी वापर करणे, पुनर्प्रक्रिया, पुनर्वापर , पुनर्प्राप्त करणे, पुन्हा आरेखन करणे आणि पुनर्निर्मिती या सहा तत्वांचे पालन करून, व्यवसाय मॉडेलमध्ये अनुकूल आणि स्वीकाररार्ह असलेल्या धातू क्षेत्राला ,धातूंच्या नैसर्गिक क्षमतेव्यतिरिक्त, त्याचा व्यापक वापर लक्षात घेता चक्रीय अर्थव्यवस्था मॉडेलमध्ये आघाडीवर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

धातू उद्योग हा अत्यंत ऊर्जा-केंद्रित उद्योग आहे आणि त्यामुळे होणारे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन जागतिक समुदायासाठी एक मोठे आव्हान आहे त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल, असे सिंधीया यांनी सांगितले. आपल्याला हे मान्य करावे लागेल की, तंत्रज्ञानाचे वर्चस्व असलेल्या आजच्या जगात, कोणतीही गोष्ट कचरा नाही आणि योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्व तथाकथित कचरा हा संपत्ती निर्मितीसाठी संसाधनांमध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो, असे मंत्री म्हणाले.

स्वयंचलन, पायाभूत सुविधा, वाहतूक, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या तेजीला पाठबळ देण्यासाठी मागणीत अपेक्षित वाढ लक्षात घेऊन भारताचे खाण आणि धातू क्षेत्र सुदृढ विकासासाठी सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताने आर्थिक वर्ष 2022 मध्ये पोलाद उत्पादनाची स्थापित क्षमता 50% ने वाढवून 155 दशलक्ष टन केली आहे, ही क्षमता आर्थिक वर्ष 2014 मध्ये सुमारे 100 दशलक्ष टन होती.या आठ वर्षांच्या कालावधीत पोलादाचा दरडोई वापर आज जवळपास 50% वाढून 77 किलो पर्यंत गेला आहे.देशाच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर सरकारने लक्ष केंद्रित करण्यासोबतच भारत सरकारच्या गुंतवणूकदारस्नेही धोरणांमुळे पोलाद उद्योग स्थिर विकासाच्या मार्गावर आहे. खनिज आणि धातू क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत आणि आज भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे, असेही सिंधीया यांनी सांगितले.
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1854744)
Visitor Counter : 244