नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवाई वाहतूक क्षेत्रात  प्रगत  आणि शाश्वत  तंत्रज्ञान सहकार्यासाठी  भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि स्वीडन यांच्यात सामंजस्य करार


भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि LFV एअर नेव्हिगेशन सर्व्हिसेस ऑफ स्वीडन (LUFTFARTSVERKET) यांच्यात आज नवी दिल्ली येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयात सामंजस्य करार

Posted On: 26 AUG 2022 3:45PM by PIB Mumbai

 

या करारामुळे हवाई वाहतूक क्षेत्रातील भारत आणि स्वीडन हे  दोन सेवा प्रदाता एकत्र आले असून या क्षेत्रातील  नवनवीन आयाम शोधण्याच्या दृष्टीने   शाश्वत विमान वाहतूक तंत्रज्ञानाची भविष्यातील वाटचाल ठरवण्यासाठी  या दोन्ही राष्ट्रांनी  प्रत्यक्ष  कार्यान्वयन क्षमता दर्शवली  आहे. या करारान्वये दोन्ही देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचे आदानप्रदान शक्य होईल. तसेच भारतीय कंपन्यांना स्वीडनचे कौशल्य आणि संशोधनाचा लाभ घेऊन अधिक वृद्धी करता येईल. या करारामुळे दोन्ही देशातील कंपन्या परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य करू शकतील.

या करारावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सदस्य एम सुरेश (एअर नेव्हिगेशन सर्व्हिसेस) आणि LFV स्वीडनचे उपमहासंचालक  मॅग्नस कोरेल यांनी स्वाक्षरी केली. या कार्यक्रमाला एएआयचे अध्यक्ष  संजीव कुमार, स्वीडन सरकारच्या पायाभूत सुविधा मंत्रालयाच्या स्टेट सेक्रेटरी  मालिन सेडरफेल्ड ऑस्टबर्ग, स्वीडनचे भारतातील राजदूत  क्लास मोलिनआणि  स्वीडनमधील भारताचे राजदूत तन्मय लाल उपस्थित होते.

भविष्यात अत्याधुनिक आणि प्रगत विमानतळांच्या उभारणीसाठी  वेगवान  विकासाची आवश्यकता तसेच शाश्वत वाहतूक यंत्रणेची गरज यादृष्टीने सामंजस्य करारात खालील गोष्टींचा अंतर्भाव करायला दोन्ही राष्ट्रांनी सहमती दर्शवली.

  • हवाई वाहतूक तंत्रज्ञानातील आदानप्रदान आणि तांत्रिक देवाणघेवाण कार्यक्रम.
  • दोन्ही राष्ट्रांमधील दृढ आणि मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देणे.
  • विमानतळांमधील तांत्रिक सहकार्याचा विस्तार.
  • सुरक्षित, शाश्वत आणि कार्यक्षम विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासाठी सहयोग.
  • द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी सकारात्मक योगदान

AAI आणि LFV, या अनुक्रमे भारत आणि स्वीडनच्या दोन्ही सरकारी संस्था, खालील सहकार्य क्षेत्रांवर संयुक्तपणे सहकार्य करतील:

  1. हवाई वाहतूक व्यवस्थापन
  2. हवाई वाहतूक नियंत्रण
  3. दूरस्थ विमानतळ व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रण
  4. हवाईक्षेत्र (एअरस्पेस) आराखडा आणि नियोजन
  5. विमानतळाचा  आराखडा  आणि पायाभूत सुविधा
  6. डिजिटलीकृत विमानतळ आणि विमान वाहतूक
  7. क्षमता आणि प्रशिक्षण
  8. शाश्वत विमानतळ आणि विमान वाहतूक
  9. वैमानिकांसाठी कौशल्यवृद्धी
  10. एकंदर कौशल्यवृद्धी

दोन्ही देशांमधील हितसंबंधांच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कृतीगटाची स्थापना केली जाणार आहे.

***

R.Aghor/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854657) Visitor Counter : 247