रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतमाला परियोजनेअंतर्गत आधुनिक मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) च्या जलद विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या
रस्ते, रेल्वे आणि देशांतर्गत जलमार्ग मालवाहतुकीसाठी जागतिक तोडीची स्थानके म्हणून मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क काम करणार
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2022 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2022
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांच्या उपस्थितीत भारतमाला परियोजनेअंतर्गत आधुनिक मल्टी मोडल

लॉजिस्टिक पार्क (MMLP) च्या जलद विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. मालवाहतूक एकीकृत करून केंद्रीकरण करणे आणि लॉजिस्टिक खर्च 14% वरून स्थूल राष्ट्रीय उत्पादना (GDP )च्या 10% पेक्षा कमी या आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने आणण्याच्या उद्देशाने देशभरात आधुनिक मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) विकसित करण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड (NHLML), भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) आणि रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) यांनी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होताना उपस्थित असल्याचा आनंद व्यक्त करत या करारामुळे वाहतुकीच्या रस्ते,रेल्वे आणि जल मार्ग यातून परस्पर मालाची चढ-उतार सहज शक्य होईल असे गडकरी यावेळी म्हणाले. जलमार्ग, समर्पित फ्रेट कॉरिडॉर आणि रस्ते मार्ग यांच्यात मालाची ने-आण आणि चढ-उतार सुरळीत शक्य होईल, याची ग्वाही आधुनिक मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क देतील,असे त्यांनी पुढे सांगितले. गतिशक्तीच्या माध्यमातून ही राष्ट्र उभारणी असल्याचे ते म्हणाले.

आम्ही देशभरात जलद, कार्यक्षम, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक लॉजिस्टिकसाठी भारतमाला परियोजनेचा मूळ उद्देश सर्वार्थाने अमलात आणण्याचा प्रस्ताव मांडणारा हा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. पंतप्रधान गती शक्ती योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि तिला उर्जा देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश आहे. हा करार हा या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी केलेला प्रयत्न आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.
मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क ही रेल्वे आणि रस्ते सुलभतेसह मालवाहतूक हाताळणी सुविधा असेल, ज्यामध्ये कंटेनर टर्मिनल, कार्गो टर्मिनल (बल्क, ब्रेक-बल्क), गोदामे, कोल्ड स्टोरेज, यांत्रिकी सामग्री हाताळण्यासाठी सुविधा आणि बॉन्डेड स्टोरेजसह कस्टम क्लिअरन्स यासारख्या मूल्यवर्धित सेवांचा समावेश असेल. यार्ड, क्वारंटाइन झोन, चाचणी सुविधा आणि गोदाम व्यवस्थापन सेवा, इतर संबंधित सुविधांसह ‘हब अँड स्पोक’ मॉडेल अंतर्गत विकसित केलेले, MMLP महामार्ग, रेल्वे आणि अंतर्देशीय जलमार्गांद्वारे मालवाहतुकीच्या अनेक पद्धती एकत्रित करेल.
MMLP प्रकल्प विविध प्रकारच्या वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक गोदाम सुविधा विकसित करण्यासाठी तयार आहे. मालवाहू वाहतुकीशी संबंधित गोदाम, कस्टम क्लिअरन्स, पार्किंग, ट्रकची देखभाल या सर्व सेवांचा त्यात समावेश आहे. MMLPs अत्याधुनिक मालवाहतूक व्यवस्थापन प्रणालीसाठी तंत्रज्ञान आधारित अंमलबजावणीवर भर देतील. या प्रकल्पांमध्ये पॅकेजिंग, रिपॅकेजिंग आणि लेबलिंगसारख्या अनेक मूल्यवर्धित सेवा उपलब्ध असतील.
NHLML हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) विशेष उद्देश कंपनी (SPV) आहे तर IWAI हे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक प्राधिकरण आहे.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1854150)
आगंतुक पटल : 241