आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्करोगावरील उपचारासाठी दिशादर्शक उपचारपद्धती या विषयावरच्या कार्यशाळेला केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले मार्गदर्शन

Posted On: 23 AUG 2022 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022

 

भारताला  कोविड महामारीच्या विरोधातील लढ्यातून मिळालेलया धड्यांचा आणि अनुभवाचा कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांसाठीच्या  ध्येयधोरणांमध्ये पथदर्शक म्हणून लाभ होऊ शकतो. कर्करोग नियंत्रण आणि व्यवस्थापनाशी संबंधित कोणतेही उपक्रम एकहाती पूर्ण करणं अशक्य आहे, त्यासाठी संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी लागेल, महामारीचे व्यवस्थापन करतेवेळी आपण हेच शिकलो आहोत.  हा मुद्दा विविध सरकारी आणि गैर-सरकारी व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये अंतर्भूत आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कर्करोगावरील उपचारासाठी दिशादर्शक उपचारपद्धती या विषयावरच्या कार्यशाळेला संबोधित करताना सांगितले.

आरोग्य ही केवळ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची विशेष जबाबदारी नसून त्यात केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांचा देखील हातभार लागणं आवश्यक आहे, हे आपल्याला महामारीने शिकवले, असे ते म्हणाले. आरोग्य हा मुद्दा केवळ तृतीय श्रेणीच्या आरोग्य सेवा केंद्रांपर्यंतच मर्यादित  राहू शकत नाही, परंतु प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरही त्याचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवांचे वितरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यादृष्टीने आरोग्यसेवा क्षेत्राचे जाळे अधिक विस्तृत आणि शाश्वत करण्यासाठी कामगार, रेल्वे, पोलाद, ओएनजीसी, अणुऊर्जा इत्यादी मंत्रालयांच्या तृतीयक आरोग्य सुविधा एकत्रित केल्या जाऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत नुकत्याच झालेल्या बदलांवर  प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की या अंतर्गत सर्वसमावेशक वितरण सेवा सुनिश्चित करण्यासाठी केवळ प्राथमिक आणि माध्यमिक आरोग्यसेवाच नव्हे तर तृतीयक आरोग्य सेवांशी जोडणारे अनेक दुवे आता समाविष्ट करण्यात आले आहेत.

कर्करोग व्यवस्थापन क्षेत्रात अत्यंत जटिल देखभाल व्यवस्थापनासाठी रूपरेषा निश्चित करणे, ती एकमेकांशी सामाईक करणे आणि पुरावा आधारित सामान्य प्रमाणित प्रोटोकॉलचे पालन करणे यादृष्टीने राजेश भूषण यांनी मार्गदर्शन केले.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमाची  पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करताना  यामुळे  लाभ होईल, असे  त्यांनी नमूद केले. आसाम, पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार यासारख्या काही राज्यांमध्ये लागू केलेल्या विविध "हब आणि स्पोक" मॉडेलचे इतर राज्यांद्वारे अनुकरण केले जाऊ शकते, तसेच आरोग्य सेवा वितरणाच्या लहानमोठ्या नियोजनासह इतर सेवासुविधांचा तपशीलवार अभ्यास केला जाऊ शकतो, असे त्यांनी सुचवले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्रात खालील मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

i.कर्करोगावरील उपचार आणि देखभालीसाठी भारतातील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ

ii.कर्करोगावरील देखभाल परवडण्याची भारतात असलेली क्षमता

iii.कर्करोगावरील उपचार आणि देखभालीसाठी राज्यांकडे असलेल्या सर्वोत्तम पद्धती

iv.सध्या सुरु असलेले प्रकल्प आणि त्या संदर्भातील मुद्यांचा आढावा

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1853893) Visitor Counter : 152