विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
स्टार्ट अप्स, उद्योग, शिक्षणक्षेत्र आणि संशोधन मंडळांना एकात्मिक सहकार्यातून सहभागी करुन घेत राबवल्या जाणाऱ्या बायोटेक उपक्रमांसाठी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी जाहीर केलीत 75 ‘अमृत अनुदाने’
या अनुदान उपक्रमामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जय अनुसंधान’ आवाहनाला मिळणार चालना- डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
22 AUG 2022 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2022
देशातील स्टार्ट अप्स, उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, संशोधन मंडळे यांना एकात्मिक सहकार्यातून सहभागी करून घेत राबवल्या जाणाऱ्या बायोटेक उपक्रमांसाठी 75 ‘अमृत’ अनुदानाची घोषणा, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केली. जैव तंत्रज्ञान विभाग- जैव तंत्रज्ञान संशोधन सहाय्य परिषद 75 अमृत संघ अनुदान उपक्रमामुळे, पंतप्रधानांच्या ‘जय अनुसंधान’ म्हणजे, संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाला पाठबळ मिळेल, असे जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
75 आंतरशाखीय, बहु- संस्थात्मक अनुदाने, जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातील विशिष्ट क्षेत्रनिहाय अशा अत्यंत जोखीम असलेल्या, महत्वाकांक्षी आणि मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या सहकार्यात्मक संशोधनाला आधार देतील, असेही ते पुढे म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की, स्टार्टअप्स, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्था सार्वजनिक-खाजगी भागीदारी पद्धतीने एक ‘विज्ञान अनुदान चमू’ तयार करू शकतात ज्याद्वारे त्यांना आंतर-विद्याशाखीय, उच्च-गुणवत्तेच्या संशोधनासाठी दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत 10-15 कोटी रुपयांचे अनुदान मिळवता येईल.
जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताला एक अग्रणी देश म्हणून जागतिक स्तरावर पुढे नेण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय प्राधान्यक्रमांची आखणी करुन, त्यानुसार, आरोग्य, अॅग्रीबायोटेक (कृषी जैवतंत्रज्ञान), हवामान बदल, कृत्रिम जीवशास्त्र आणि शाश्वत जैव संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाईल, असे सिंह यांनी पुढे सांगितले.
या उपक्रमामुळे, भागीदारीचा एक भक्कम पाया उभारला जाईल, ज्यातून, नव्या आणि अभिनव संशोधन उपक्रमांना पाठबळ दिले जाईल. या संशोधनाचा उद्देश, भारताला जागतिक नेतृत्वस्थानी नेणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात अनुसंधान, म्हणजेच संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले होते, असेही सिंह यांनी यावेळी नमूद केले.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853685)
Visitor Counter : 205