संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस तारिणी ही भारतीय युद्धनौका निघाली गोवा ते म़ॉरिशसच्या सागरी मोहिमेवर

Posted On: 20 AUG 2022 2:25PM by PIB Mumbai

आयएनएस मांडवीचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर संजय पांडा यांनी आज पहाटे गोवा ते मॉरिशसमधल्या लुईस बंदरापर्यंतच्या नौकानयन मोहिमेचा ध्वज दाखवून प्रारंभ केला.   

ही मोहीम नौदल नौकानयन जहाज (आयएनअसव्ही) तारिणीतील सहा अधिकाऱ्यांच्या ताफ्याने (तीन महिला अधिकाऱ्यांसह) हाती घेतली आहे.

 एकेरी मार्गाने जवळजवळ 2500 नाॅटिकल मैल (अंदाजे 45000 किमी) अंतर या ताफ्याला पार करायला लागणार आहे.  20 - 21 दिवसांच्या कालावधीत त्यांना अत्यंत खराब हवामान आणि पावसाळ्यातील खवळलेला समुद्र अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीत नौकानयन करण्याव्यतिरिक्त, बोटीची, यंत्रसामग्रीची देखभाल आणि खाण्यापिण्याची सोय अशा पातळीवर  त्यांना कामं करायची आहेत.  भारतीय किनारा सोडला की त्यांना न थांबता मार्गक्रमणा करायची आहे.

भारतीय नौदलाकडे म्हादेई, तारिणी, बुलबुल, हरियाल, कडलपुरा आणि नीलकंठ ही सहा सागरी नौदल नौकानयन जहाजे (INSVs) आहेत. या नौका नियमितपणे नौदल कर्मचार्‍यांच्या लहान तुकड्यांसह सागरी मोहिमेवर जातात. समुद्रातील नौकानयनाचा पुरेसा अनुभव असणा-या स्वयंसेवकांमधून सागरी प्रवास करणारे कर्मचारी निवडले जातात.

ओशन सेलिंग ( सागरी नौकानयन) हा अत्यंत कठीण साहसी खेळ आहे. या महासागर नौकानयन मोहिमा साहसाची भावना विकसित करण्यात, जोखीम घेण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतात. नेव्हिगेशन, दळणवळण, इंजिन आणि जहाजावरील यंत्रसामग्रीचे तांत्रिक ऑपरेशन, इनमरसॅट उपकरणांचे ऑपरेशन, लॉजिस्टिक्स प्लॅनिंग इत्यादींसह आवश्यक सीमनशिप कौशल्यं वाढविण्यासाठी या सफरींचा उपयोग होतो. सागर परिक्रमा आणि केपटाऊन ते रिओ डी जनेरियो शर्यती, आयओएनएस आणि बंगालच्या उपसागराच्या नौकानयन मोहिमांमध्ये भाग घेतल्यामुळे जगभरात भारतीय नौदलाची क्षमता दाखविण्याची संधी मिळते. तारिणीने 2017 मध्ये सर्व महिला अधिकारी दलासह  जगाची 'नाविका सागर परिक्रमा' केली होती. त्यासाठीही तिला ओळखले जाते. सध्याच्या मोहिमेमध्ये  पुरूष आणि महिला अधिकाऱ्यांची संख्या समसमान आहे.  प्रत्येकी तीन पुरुष आणि तीन महिला अधिकारी मोहिमेत सहभागी आहेत. भारतीय नौदलातील सर्वात अनुभवी नौका कॅप्टन व्हीडी मेहेरिशी या जहाजाचे नेतृत्व करत आहेत. क्रू मेंबर्समध्ये कमांडर विकास शेओरान, लेफ्टनंट कमांडर पायल गुप्ता, लेफ्टनंट कमांडर कौशल पेडणेकर, लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांचा समावेश आहे.

****

M.Jaybhaye/P. Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1853291) Visitor Counter : 215