रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मुंबई ते दिल्ली हा प्रवास 12 तासांत पूर्ण करु शकणाऱ्या आरामदायी इलेक्ट्रिक बसगाड्या निर्मितीची योजना आखावी —केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत अशोक लेलँड इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा शुभारंभ
Posted On:
18 AUG 2022 6:18PM by PIB Mumbai
मुंबई, 18 ऑगस्ट 2022
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, आज म्हणजे 18, ऑगस्ट 2022 रोजी मुंबईत स्विच ईआयव्ही 22 (Switch EiV 22) या नावाच्या अशोक लेलँड कंपनीच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा शुभारंभ करण्यात आला. या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करतांना, नितीन गडकरी म्हणाले, “ दीर्घकालीन दृष्टिकोन लक्षात घेता, देशाच्या वाहतूक व्यवस्थेत परिवर्तन करण्याची गरज आहे. शहरी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देत, आम्ही कार्बन उत्सर्जन कमीत कमी असेल तसेच जास्त प्रवासी क्षमता असलेल्या एकात्मिक इलेक्ट्रिक वाहनांची वाहतूक व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत.”
ग्राहकांकडून हरित (पर्यावरणस्नेही) वाहतूक साधनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे, हे बघता, केंद्र सरकारची दूरदृष्टी आणि धोरणे इलेक्ट्रिक वाहनांचा अंगीकार करण्याला प्रोत्साहन देणारी आहेत” असे त्यांनी पुढे सांगितले.
अशोक लेलँड कंपनीच्या स्विच ईआयव्ही 22 ही देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बस आहे, ज्याची संरचना, विकास आणि उत्पादन भारतातच झाले आहे. स्विच ईआयव्ही 22 ह्या बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक डिझाईन, सर्वोच्च सुरक्षितेता आणि आरामदायी वैशिष्ट्ये आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
यावेळी, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाविषयीची आपली संकल्पना सांगतांना नितीन गडकरी म्हणाले, “नरिमन पॉइंट ते दिल्ली जोडण्याची माझी योजना आहे आणि त्याचे 70 टक्के काम याआधीच पूर्ण झालेले आहे.” यावेळी, वाहन उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देत, गडकरी यांनी त्यांना आवाहन केले, की “मुंबईहून दिल्लीला केवळ 12 तासांत पोहोचता येईल, अशी क्षमता असणाऱ्या आरामदायी बसेसची निर्मिती करावी.”
वाहनांसाठी विजेचा इंधन म्हणून वापर होणे, हे डिझेलसारख्या इतर इंधनांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. “कच्च्या तेलाची आयात हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. तसेच, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर देखील वीजेचा खर्च कमी करण्यात मोठा हातभार लावतो आहे.” असे त्यांनी सांगितले.
वीजेचा वापर पर्यायी इंधन म्हणून व्हायला हवा, यासाठी प्रोत्साहन देतांना ते म्हणाले, आज देशातील 35 टक्के प्रदूषण केवळ डिझेल आणि पेट्रोलच्या वापरामुळे होते. याच संदर्भात, गडकरी यांनी, आयातीला पर्यायी ठरेल अशा परवडणाऱ्या, प्रदूषण मुक्त आणि भारतीय उत्पादनांवर भर दिला. “भारताने, आपल्या वाहनउद्योग क्षेत्रासाठी वीज, इथेनॉल, मिथेनॉल, जैव-इंधन, जैव-सीएनजी, जैव- एलएनजी आणि हरित हायड्रोजन सारख्या पर्यायी इंधनाचा जास्तीत जास्त वापर सुरु करण्याची हीच वेळ आहे,” असे गडकरी म्हणाले.
वाहन उद्योग क्षेत्रासाठी, आपल्या योजना सांगतांना, गडकरी म्हणाले, “देशातील सध्याचा वाहन उद्योग, 7.5 लाख कोटी रुपयांचा असून, 2024 च्या अखेरीपर्यंत हा उद्योग, 15 लाख कोटींपर्यंत वाढवण्याचे माझे स्वप्न आहे.” असे सांगत, हे ध्येय साध्य करण्यासारखे आहे, असे ते पुढे म्हणाले. या क्षेत्रात रोजगाराच्या सर्वाधिक संधी असून, केंद्र आणि सरकारला सर्वाधिक करमहसूल मिळवून देणारेही हे क्षेत्र आहे, असेही त्यांनी नमूद केले.
स्विच ईआयव्ही 22 बसेसविषयी माहिती (अशोक लेलँड नुसार)
सिंगल डेकर (साध्या) बसेस च्या तुलनेत, स्विच डबल डेकर बसमध्ये दुप्पट प्रवासी प्रवास करु शकतात, विशेष म्हणजे यासाठी गाडीच्या निव्वळ वजनात (प्रवाश्यां विना) (कर्ब वेट) केवळ 18 टक्के वाढ झाली आहे.
आधुनिक संरचना आणि अंतर्बाह्य आरामदायी सुविधा आणि आकर्षक स्वरुप असलेल्या ह्या डबल डेकर बसेस मध्ये, पुढचा आणि मागचा असे दोन्ही दरवाजे विस्तीर्ण आहेत, दोन्हीकडे पायऱ्या आहेत तसेच, आधुनिक सुरक्षा सुरक्षा मानकांची पूर्तता करणारा आपत्कालीन सुरक्षा दरवाजा आहे., भारताच्या उष्ण हवामानासाठी या बसमध्ये प्रभावी वातानुकूलित व्यवस्था आहे. यांची आसन क्षमता 65 इतकी असून, अशा प्रकारच्या रचनेतील बसेस मध्ये ही सर्वाधिक आसनक्षमता आहे.
प्रत्येक खुर्चीला हलक्या वजनाची कुशन्स लावली आहेत, आणि आसनांची अंतर्गत रचना कारसारखी आरामदायी आहे. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस, शहरातील प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती देणारी आदर्श सार्वजनिक वाहने आहेत, कारण, त्यांना रस्त्यावर तसेच टर्मिनल आणि डेपो मध्ये जागा कमी लागते.
राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन विषयी इंडिया सायन्स टीव्ही ने तयार केलेली माहितीपर चित्रफित इथे बघा.
https://www.indiascience.in/videos/national-electric-mobility-mission-e-1
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1852930)
Visitor Counter : 215