ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
पोषण मूल्यवर्धित तांदूळ पुरवण्याच्या घोषणेस एक वर्ष
75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माननीय पंतप्रधानांनी भारत सरकारच्या प्रत्येक योजनेत पोषण मूल्यवर्धित तांदूळ पुरवण्याची केली होती घोषणा
Posted On:
11 AUG 2022 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
पोषण मूल्यवर्धित तांदूळ कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात, एकूण 151 जिल्ह्यांनी (24 राज्यांमधील) लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) अंतर्गत या आधीच पोषणमूल्य वर्धित तांदूळ उचलला आहे. 1 एप्रिल 2022 पासून सुरू झालेल्या टप्प्यांतर्गत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे सुमारे 6.83 लाख मेट्रिक टन पोषण मूल्यवर्धित तांदूळ वितरीत करण्यात आले आहे. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आणि प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत, राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी आतापर्यंत सुमारे 7.36 लाख मॅट्रिक टन पोषण मूल्यवर्धित तांदुळाची उचल केली आहे. सुमारे 52% जिल्ह्यांनी दुसऱ्या टप्प्यात धान्याची उचल केली आहे.
माननीय पंतप्रधानांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट, 2021) आपल्या भाषणात 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने देशभरात भारत सरकारच्या प्रत्येक योजनेत पोषण मूल्यवर्धित तांदूळ पुरवठा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात या उपक्रमाने चांगली प्रगती केली आहे.
या उपक्रमाचा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आणि प्रधानमंत्री पोषण योजनेचा समावेश असणारा टप्पा 2021-22 मध्ये लागू करण्यात आला होता, आणि राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 17.51 लाख मेट्रिक टन पोषण मूल्यवर्धित तांदूळ वितरीत करण्यात आले होते.
दरम्यान, 15 ऑगस्ट 2021 पर्यंत देशातील पोषण मूल्यवर्धित तांदूळ उत्पादनासाठी आवश्यक मिश्रित पायाभूत सुविधा असलेल्या तांदूळ गिरण्यांची संख्या 2690 होती ज्यांची एकत्रित मिश्रण क्षमता सुमारे 13.67 लाख मेट्रिक टन होती, आता मिश्रित पायाभूत सुविधा स्थापित असलेल्या तांदूळ गिरण्यांची संख्या 9000 हून अधिक झाली आहे. सध्याची एकत्रित मासिक उत्पादन क्षमता सुमारे 60 लाख मेट्रिक टन आहे, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 4 पटीने वाढली आहे.
प्रतिवर्तन काल (TAT) कमी असलेल्या आहारातील जीवनसत्त्वे आणि खनिज सामग्री वाढवण्यासाठी तांदळाचे पोषण मूल्यवर्धन हे एक किफायतशीर आणि पूरक धोरण असल्याचे आढळून आले आहे तसेच हे देशातील अशक्तपणा आणि कुपोषणाशी लढा देण्यात मदत करणारे आणि पोषण सुरक्षेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. ही रणनीती जगातील अनेक देशांत राबवली जात आहे.
S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851083)
Visitor Counter : 239