दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल विभाग आपल्या 1.5 लाख टपाल कचेऱ्यांच्या सर्वव्यापी नेटवर्कद्वारे "हर घर तिरंगा" कार्यक्रम देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवत आहे


टपाल विभागाने 10 दिवसांच्या अल्प कालावधीत 1 कोटीहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री केली

4.2 लाख टपाल कर्मचारी उत्साहाने "हर घर तिरंगा" हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत

Posted On: 11 AUG 2022 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022

 

1.5 लाख टपाल कचेऱ्यांच्या सर्वव्यापी नेटवर्कद्वारे टपाल विभागाने "हर घर तिरंगा" कार्यक्रम देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवला आहे. 10 दिवसांच्या अल्पावधीत भारतीय टपाल विभागाने टपाल कार्यालयांद्वारे तसेच ऑनलाइन पद्धतीने 1 कोटींहून अधिक राष्ट्रध्वज नागरिकांना विकले आहेत. हे ध्वज टपाल विभागाकडून 25 रुपये इतक्या  किफायतशीर किमतीत विकले गेले आहेत. टपाल विभागाने ऑनलाइन पद्धतीने विक्री केल्या जाणाऱ्या ध्वजांची देशभरातील कोणत्याही पत्त्यावर मोफत घरपोच वितरण सुविधा प्रदान केली असून ई पोस्ट ऑफिस सुविधेद्वारे नागरिकांनी 1.75 लाखांहून अधिक ध्वजांची ऑनलाइन खरेदी केली आहे.

देशभरातील 4.2 लाख समर्पित टपाल कर्मचाऱ्यांनी शहरे, गावे आणि खेडी, सीमावर्ती भाग, नक्षलग्रस्त जिल्हे, डोंगराळ आणि आदिवासी भागात "हर घर तिरंगा" संदेशाचा उत्साहाने प्रचार केला आहे. प्रभात फेरी, बाईक रॅली आणि चौक सभांच्या माध्यमातून भारतीय टपाल विभागाने हर घर तिरंगा हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला आहे. डिजिटली संपर्कात असलेल्या नागरिकांमध्ये कार्यक्रमाचा संदेश पोहोचवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकसारख्या समाज माध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. टपाल कचेऱ्यामधून राष्ट्रध्वजाची विक्री 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. नजीकच्या टपाल कचेरीमध्ये जाऊन किंवा इ पोस्ट ऑफिस (epostoffice.gov.in) ला भेट देऊन नागरिक राष्ट्रध्वज मिळवू शकतात आणि हर घर तिरंगा अभियानाचा भाग बनू शकतात. नागरिक ध्वजासह सेल्फी देखील घेऊ शकतात आणि  सेल्फी www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करून याद्वारे नव भारताच्या सर्वात मोठ्या उत्सवात त्यांचा सहभाग नोंदवू शकतात.

 

 S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850941) Visitor Counter : 187