उपराष्ट्रपती कार्यालय
भारताचे 14 वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतीपदाची जगदीप धनखड यांनी घेतली शपथ
Posted On:
11 AUG 2022 3:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
जगदीप धनखड यांनी आज चौदावे उपराष्ट्रपती म्हणून तसेच राज्यसभेच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. प्रख्यात वकील आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभात पदाची शपथ दिली.
शपथ घेण्यापूर्वी धनखड यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. “पूज्य बापूंना आदरांजली वाहताना राजघाटाच्या निर्मळ सान्निध्यात भारताच्या सेवेत सदैव कार्यरत राहण्यास आशीर्वाद मिळाल्याचे, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक असल्याचे वाटले,” असे त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
जगदीप धनखड यांचा संक्षिप्त परिचय खालीलप्रमाणे आहे -
1. शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी
धनाखड यांचे प्राथमिक शालेय शिक्षण किठाणा गावातील शासकीय प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी घरधना इथल्या शासकीय माध्यमिक विद्यालय, आणि चित्तौडगडच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी, धनखड जयपूरच्या महाराजा महाविद्यालयात दाखल झाले आणि त्यांनी भौतिकशास्त्रात बी.एस्सी. (ऑनर्स) ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.
जगदीप धनखड यांनी व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात वकील म्हणून केली. पहिल्या पिढीतील व्यावसायिक वकील असूनही, ते देशातील सर्वोच्च कायदेतज्ज्ञांमध्ये गणले गेले. 1990 मध्ये, त्यांना राजस्थानच्या उच्च न्यायालयाकडून वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले गेले. जगदीप धनखड हे प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात कार्यरत होते . पोलाद, कोळसा, खाणकाम आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद या क्षेत्रातील खटले हे त्यांचे विशेषत्वाने कार्यक्षेत्र राहिले आहे. देशातील विविध उच्च न्यायालयातही त्यांनी खटले चालवले आहेत. 30 जुलै 2019 रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत ते सर्वाधिक ज्येष्ठ पदसिद्ध वकील होते. कायदेतज्ज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीत धनखड हे 1987 मध्ये राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशन, जयपूरचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले सर्वात सर्वात तरुण व्यक्ती होते. एका वर्षानंतर, 1988 मध्ये ते राजस्थान बार कौन्सिलचे सदस्यही बनले.
2 . राजकीय आणि सार्वजनिक जीवन
जगदीप धनखड हे झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून 1989 मध्ये भारतीय संसदेत निवडून आले होते. त्यानंतर, त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. 1993 मध्ये, ते अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेवर निवडून आले. कायदेमंडळाचा सदस्य म्हणून, धनखड यांनी लोकसभा आणि राजस्थान विधानसभेतील महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून काम केले. केंद्रीय मंत्री या नात्याने ते युरोपियन संसदेतील संसदीय गटाचे उपनेते म्हणून शिष्टमंडळाचे सदस्य होते.
जुलै 2019 मध्ये, धनखड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
3. वैयक्तिक माहिती
नाव : जगदीप धनकड
वडिलांचे नाव : दिवंगत गोकलचंद
आईचे नाव : दिवंगत केसरी देवी
जन्मतारीख : 18 मे 1951
जन्म ठिकाण : गाव किठाना, झुंझुनू जिल्हा, राजस्थान
वैवाहिक स्थिती : विवाहित (वर्ष, 1979)
पत्नीचे नाव : डॉ. सुदेश धनखड
अपत्य : एक मुलगी (कामना)
वाचनाची आवड असलेले धनखड हे क्रीडाप्रेमी देखील आहेत. ते राजस्थान ऑलिम्पिक असोसिएशन आणि राजस्थान टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष होते. संगीत ऐकणे आणि प्रवास करणे हे त्यांचे इतर छंद आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, हाँगकाँग, सिंगापूर, इ.सह अनेक देशांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे.
S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850871)
Visitor Counter : 4255