उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती नायडू यांनी राज्यसभेत कार्यरत अधिकाऱ्यांची घेतली भेट, भविष्यात आनंदी जीवनासाठी त्यांना दिल्या शुभेच्छा
“तुमचे स्थान नेहमीच माझ्या हृदयाच्या अगदी समीप राहील,” - उपराष्ट्रपती राज्यसभेतील कर्मचाऱ्यांना म्हणाले
राज्यसभा कामकाजात कार्यरत अधिकाऱ्यांनी भावूक होऊन नायडू यांच्यासमवेत घालविलेल्या आठवणींना उजाळा दिला
उपराष्ट्रपतींनी संसद परिसरात सीता अशोक वृक्षाचे रोपटे लावले
Posted On:
10 AUG 2022 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी आज संसद भवनातील राज्यसभा सचिवालयात कार्यरत अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि गेल्या पाच वर्षांच्या काळात या अधिकाऱ्यांनी दिलेले प्रेम आणि पाठिंबा याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांच्या कामातील समर्पण वृत्ती आणि कर्तव्य भावना यांची प्रशंसा करत उपराष्ट्रपती नायडू यांनी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “तुमचे स्थान नेहमीच माझ्या हृदयाच्या अगदी समीप राहील,” ते राज्यसभेतील कर्मचाऱ्यांना म्हणाले.
राज्यसभेत कार्यरत असलेल्या सर्वात ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा नायडू यांच्या समवेत काम करत असतानाच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या तेव्हा तेथे उपस्थित सर्वच एकदम भावूक झाले. एकत्र काम करत असतानाच्या काळात नायडू यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभल्याबद्दल या अधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. मावळत्या अध्यक्षांसाठी त्यांनी आनंदी तसेच निरोगी आयुष्य चिंतले.
या कार्यक्रमापूर्वी, उपराष्ट्रपती नायडू यांनी संसद भवन परिसरात सीता अशोक वृक्षाचे रोपटे देखील लावले. आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन झाले पाहिजे यावर त्यांनी यावेळी बोलताना भर दिला. भारतीय परंपरेत, वृक्षाला अनेक पुत्रांच्या समान मानतात ही बाब अधोरेखित करत त्यांनी देशभरात वृक्षारोपणाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850498)
Visitor Counter : 178