वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जग भारताकडे आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून पाहत आहे : पीयूष गोयल
2014 पूर्वी भारताविषयी साशंक असलेले विकसित देश आता भारताशी व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत : गोयल
Posted On:
09 AUG 2022 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022
जग आता भारताकडे आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून पाहत आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत व्यापारी उद्यमी संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.
2014 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक समजली जात होती आणि गुंतवणूकदार भारतासोबत व्यापार करण्याबाबत साशंक होते असे त्यांनी सांगितले. मात्र भारताने आता जगाचा विश्वास कमावला आहे यावर भर देत, विकसित देश आता भारतासोबत व्यापार करार करण्यास उत्सुक असल्याचे गोयल यांनी सांगितले.
कोणत्याही प्राधिकरणाकडून छळवणुक झाल्यास त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यापाऱ्यांना सरकार पूर्ण सहाय्य देईल असे, व्यापारी आणि उद्योजकांना आश्वस्त करत पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभतेच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
जनतेवरील आणि व्यवसायांवरील अनुपालन ओझे कमी करण्यासाठी सरकारसोबत काम करण्याचे आवाहन करतानाच नैतिक व्यापार पद्धतींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना त्यांनी व्यापाऱ्यांना केल्या.
भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे असे त्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. नवीन कल्पनांसह पुढे येऊन भारताच्या विकास गाथेला तरुणाईची ऊर्जा देण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
व्यापारी आणि उद्योजक बनण्यासाठी आपण अधिकाधिक महिलांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या दूरदर्शी कल्याणकारी धोरणांमुळे गरीबांना ग्राहक म्हणून उदयाला येण्यासाठी मदत होत असून लोकसंख्येचे भारताच्या सर्वात मोठ्या सामर्थ्यामध्ये यशस्वीरित्या परिवर्तन झाले आहे, असे सांगत गोयल यांनी या धोरणांची प्रशंसा केली.
पंतप्रधानांच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींसाठीच्या वस्तूंच्या मागणीचा फायदा व्यापारी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (एमएसएमई) झाला पाहिजे यावरही त्यांनी भर दिला. अधिकाधिक भारतीय उत्पादनांचा प्रचार करून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी छोट्या आणि मोठ्या अशा सर्व व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना केले.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1850340)
Visitor Counter : 173